होतो शोधित तुजसी मी, जीवनांच्या मार्गावरी,
होता मनीं विश्वास, भेटणार तूं, मजसी कोठेतरी ।
तुझी आहेस तूं माझी, जरी सोडलेस मजवार्यावरी,
चालून चाल, दमलो, तरळत वाट होती अधांतरी ।।
वाटे परी, वेळी कातर अशा, असावीस तूं जवळी,
असावीस तूं जवळी ।।१।।
काय मारिले घोडे तुझे मी, ठरविलेस मजसी वेडे,
आठवती दिन ते गोड गोड, आकृष्ट होतीस मज कडे ।
काय झाले तुज न कळे, विश्वासास गेले कसे तडे,
रडे कोसळणे ही थांबले, इतके चारिलेस तूं खडे ।।
वाटेपरी, वेळी कातर अशा, असावीस तूं जवळी,
असावीस तूं जवळी ।।२।।
डगमगणे ठअवूक न मज, आहे तसा मी बेरड,
नाही वधणार मी, असेल व्यर्थ, सारी तुझी ओरड ।
आहे मोहीत तुजवरी, बसविलीस नजरेची जरब,
ध्यानीं तुझी मनीं ही तूं, जरी जगणे तुजसेव अवघड ।।
वाटे परी, वेळी कातर अशा, असावीस तूं जवळी,
असावीस तूं जवळी ।।३।।
होता न कधी मना सारखे, चढे सणसणीत तव पारा,
वेळी अशा, प्रियमज, धरणेहातीं, धग धगला निखारा ।
होऊनि केवीलवाणा मी, शोधितो तव प्रीतिचा किनारा,
देखूनि रोख तव नजरेचा, पसंत मज करणे पोबारा ।।
वाटेपरी, वेळी कातर अशा, असावीस तूं जवळी,
असावीस तूं जवळी ।।४।।
माडा परी उंच मी ताड, शिजली न तुज पुढे डाळ,
होती फटकारीत तूं, समजूनि मज सान बाळ ।
हळूवार केलास सांभाळ, नाही झाली कधी अबाळ,
जाणिले अंती एकमेकां आपलं म्हणूनि सौख्याचा सुकळ ।।
वाटे परी, वेळी कातर अशा, असावीस तूं जवळी,
असावीस तूं जवळी ।।५।।
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply