म्हणे मायबोली किती वेगळी आमुची
कीर्ती किती सांगू सर्वांना तयाची
आता मुखी शब्द तिचा हो धरेना
मराठीतून शुद्ध कोणीही वदेना…
आता काम सांगे भाषा कोणती
आता दुःख बोले जे शब्द नसती
आता कुणा सांगू मी मराठी भाषा
पुसुनी स्वतःस ठरवावी योग्य दिशा!!
अर्थ–
म्हणे मायबोली किती वेगळी आमुची,कीर्ती किती सांगू सर्वांना तयाची,आता मुखी शब्द तिचा हो धरेना,मराठीतून शुद्ध कोणीही वदेना
(जास्त काही बोलायची गरज आहे असे नाही, पण जेवढे शक्य आहे तेवढे आपल्या मायबोलीतून बोलले तरी खूप फरक पडेल. केवळ एक दिवस, 24 तास आपल्या मराठीचा झेंडा व्हाट्सएप आणि फेसबुक वर फडकावून नंतर दुसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग चा मेसेज पाठवणार असाल तर कशाला अट्टाहास करायचा एक दिवस तरी. दर बारा मैलांवर बदलणारी आपली मराठी आता दिवसातले बारा क्षण ही आपण नीट बोलत नाही याचं वाईट जास्त वाटतं.
शाळेत शिकायला इतर भाषिक स्कुल मधे पाठवुन आपला मुलगा किंवा मुलगी फार काही वेगळं करतील असे वाटत असेल तर यासारखा गोड गैरसमज अजून काही नसेल.)
आता काम सांगे भाषा कोणती, आता दुःख बोले जे शब्द नसती, आता कुणा सांगू मी मराठी भाषा,पुसुनी स्वतःस ठरवावी योग्य दिशा!!
(इतर भाषिक जास्त प्रमाणात झाल्यामुळे आता आपली मायबोली मागे पडत चालली, काय करू यार तो ऑटो वाला समझ ताही नहीं हैं, महाविद्यालयात गेलं की I like my mother टंग असं अभिमानाने बोलताना काहीच कसं वाटत नाही. एक अभिमान मात्र खुप हो काय तर म्हणे आमच्या मराठीत जितक्या शिव्या आहेत ना च्यायला दुसऱ्या कोणत्याच भाषेत नाहीयेत, काय मग भे××××× असे म्हणून नाक्यावर चकाट्या पिटायला मात्र आपल्याला मराठीच लागते. अगणित साहित्याने फुललेली, सुंदर शब्दांनी सजलेली, विविध अलंकारांनी सजलेली आपली माय मराठी आता मात्र केवळ आम्ही जातो आमुच्या गावा म्हणण्यासारखी राहिली आहे. विचार आणि कृती स्वतःपासून व्हायला हवी मग अपेक्षा दुसऱ्यांकडून करावी.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply