इस्लामपूरला असताना गॅदरिंग /मॅगेझीन इंचार्ज म्हणून काम करताना स्वतःचे काही “हुनर ” दाखवायची संधी क्वचित मिळाली. दरवेळी इतरांसाठी सारं संयोजन-पडद्यामागे !
एका वर्षी अचानक गळा “गरम “करून घेण्याची आणि स्टेजवर प्रकाशात येण्याची संधी मिळाली. देसाई मॅडम इंग्लिशच्या फॅकल्टी होत्या. त्यांना एकदा गॅदरिंग मध्ये गायचे होते. परगावहून येत असल्याने त्या कॉलेज सुटल्यावर संध्याकाळी मुलांबरोबर गॅदरिंगची प्रॅक्टीस करण्यासाठी थांबू शकत नव्हत्या. आणि कॉलेजच्या वेळात प्रॅक्टीसला प्राचार्यांकडून सक्त मनाई होती.
त्या माझ्याकडे आल्या आणि आपली इच्छा त्यांनी बोलून दाखविली.
“मॅडम, कोणतं गाणं गायचंय तुम्हांला?”
“प्रोफेसर मधील- आवाज़ देके हमें तुम बुलाओ, मोहब्बत में इतना ना हमको सताओ!! “
“व्वा” नकळत माझी प्रतिक्रिया.
माझ्या मनात एक विचार आला-
“मॅडम, मी आपणाबरोबर गाईन. शक्य असेल तेव्हा आपण प्रॅक्टीस करत जाऊ.”
त्या तयार झाल्या. गाणे मिळवले, पण दोघांच्याही बिझी शेड्युल मुळे कसेबसे दोन वेळा गायलो. तेही कोठल्याही साथीशिवाय. काय करायचे, प्रश्न पडला. जाहीरात (माऊथ पब्लिसिटी) झाली होती- विद्यार्थ्यांनी कल्चरल इव्हिनिंग च्या यादीमध्ये हे गाणे टाकले होते. पहिल्यांदाच कॉलेजच्या स्टेजवर दोन प्राध्यापक चक्क एक हिंदी गाणे गाणार होते. उत्सुकता तर होतीच. आमच्या स्टाफ कॉलनी मध्येही चर्चा होती.
गॅदरिंग सुरु झाले. कल्चरल इव्हिनिंग सुरु झाली. आमची तयारी शून्याच्या आसपास. स्टेज जवळच्या इलेक्ट्रिकल प्रयोगशाळेत मी आणि मॅडम गंभीर चेहेऱ्याने बसलो होतो, विचार करीत होतो. शेवटी अजून दोनदा प्रॅक्टीस केली आणि ठरविले तसेच स्टेजवर जायचे. मुद्दाम यादीतील आमच्या गाण्याचा क्रम उशिरा ठेवला आणि नांव जाहीर झाल्यावर आम्हीं नव्या अनुभवाला सामोरे गेलो. माझ्या आयुष्यातील स्टेजवर गाण्याचा हा पहिला प्रसंग (मॅडमचे माहित नव्हते). समोर मोठा समुदाय, रात्रीचे दहा वाजून गेलेले, प्रेक्षकांमध्ये आम्हां सगळ्या प्राध्यापकांचे कुटुंबीय होते.
गेलो, जमेल तसे गायलो आणि परतलो.
त्यानंतर आजवर असा प्रयोग केलेला नाही.
गाणे बरे जमले असावे असे अजूनही वाटते आहे.
मी गाणे शिकलेलो नाही. मॅडम थोडेफार शिकल्या होत्या.
आयुष्याने अचानक या गाण्याशी (आणि आठवणींशी) माझी काल गाठ घालून दिली.
– शंकर /जयकिशनच्या “शिवरंजनी “रचना ऐकत होतो. एकदम कानी आले – “आवाज़ देके हमें तुम बुलाओ, मोहब्बत में इतना ना हमको सताओ!! “
ही शिवरंजनी या माझ्या आवडत्या रागातील रचना आहे हे आत्ता कळले. काय धाडस केले होते एके काळी, हे जाणवून धस्स झाले.
आजतागायत माझी आवडती तीनच गाणी या रागातील आहेत हे मला वाटायचे- “जाने कहाँ / ओ मेरे सनम आणि कई सदियोंसे ” ( तिन्ही ठिकाणी मुकेश आणि आणि दोन ठिकाणी एसजे). त्यामुळे माझी समजूत -शिवरंजनी हा फक्त दुःख, विरहाचे प्रतीक आहे.
” आवाज़ देके ” मध्ये प्रेम आणि आर्त भेटीची विनवणी आहे.
कार्यक्रमातील दुसरे गाणे – ” बहारो फूल बरसाओ “. इथे वेगळीच भावना भेटली.
तिसरे गाणे- ” दोस्त दोस्त ना रहा “. हा माझ्यासाठी बॉम्ब होता. “संगम ” मधील एकच गाणे या रागातील मी समजून चाललो होतो- “ओ मेरे सनम” ” दोस्त दोस्त ” संयत विरह आहे- जखमी विरह ( ओ मेरे प्रमाणे) नाही. एकाच भावनेच्या दोन छटा एकाच चित्रपटात आणि एकाच गायकाकडून.
नंतर तू नळीवर या रागावर आधारीत सगळ्या ज्ञात -अज्ञात गाण्यांचा शोध घेतला. अनेक भावना या रागात गुंफता येतात हे नव्याने कळले. मी मात्र एकच शिक्का मारून चाललो होतो.
अज्ञानाच्या किती गोणी वाहात होतो मी आजवर ?
–डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply