ज्येष्ठ कवी वसंत बापट यांचा जन्म २५ जुलै १९२२ रोजी झाला.
वसंत बापट तरुण वयातच भारताच्या स्वांतत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. `माझीया जातीचे मज भेटो कोणी, ही माझी पुरवून आस, जीवीचे जिवलग असे भेटला की दोघांचा एकच श्वास’ अशी कवितेवर निष्ठा असणारा कवि म्हणून वसंत बापट ओळखले जातात. राष्ट्रसेवादलाच्या मुशीत घडलेल्या वसंत बापट यांचा `बिजली’ हा पहिला काव्यसंग्रह सेतु, अकरावी दिशा, सकीना, मानसी हे त्यांनंतरचे. त्यांच्या प्रतिभेची विविध रुपे रसिकांनी, वाचली, अनुभविली.
लहानपणापासून बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले. शेवटपर्यंत ते राष्ट्रसेवा दलाशी संलग्नर होते. ‘बिजली’ ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर ह्या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. ‘अकरावी दिशा’, ‘सकीना’ आणि ‘मानसी’ हे त्यांचे ’बिजली’नंतरचे काव्यसंग्रह होते.
त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहिल्या. वसंत बापट १९८३ ते १९८८ या काळात साधना नियतकालिकाचे संपादक होते. पौराणिक व ऐतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्यनाट्येही प्रभावी ठरली. ’केवळ माझा सह्यकडा’ ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली. ‘गगन सदन तेजोमय’ सारखे अप्रतिम प्रार्थनागीत त्यांनी लिहिले. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली. त्यांची ’सकीना’ उर्दूचा खास लहेजा घेऊन प्रकटली आणि, ’तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा, कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा’, सांगून गेली. पु.ल. यांनी एकदा वसंत बापट यांना, `बापट, बापट रोज गाणं थापट’ म्हटलं पण वसंत बापटांनी मात्र आपलं गाणं `थापटत’ असतांना कधी-कधी `थोपटलं’ ही आहे असं म्हणंत. ते म्हणंत, नव्या कवितेतून गाणे हरविले आहे, तरुणाईने गाणी गुंफायला हवेच.
बापट हे केशवसुतांच्या मालिकेतील कवी होते. देशात घडणार्या घटनांची दखल घेऊन मत मांडले पाहिजे असे मानणारे ते कवि होते. कवींच्या संस्कृति समृध्दीमुळे त्यांच्या कवितेत भाववलयं उठत राहतात. माणसांबद्दलचे प्रेम आणि सामाजिक जिव्हाळ्यातून बापट यांचे मन घडले होते. त्यांच्या कवितेला अनेक घुमारे आहेत. रचनाशुध्दता, विलक्षण शब्दचापल्य हेवा वाटावा अशी शैली ही बापट यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होत. अंतर्गत लय सांभाळून त्यांनी अनेक रचनाप्रकार हाताळले.
१९९९ मध्ये मुंबई येथे झालेल्या ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. युगोस्लोव्हियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणूनही ते सहभागी झाले. चंगा मंगा, अबडक तबडक, आम्ही गरगर गिरकी, फिरकी, फुलराणीच्या कविता आणि परीच्या राज्यात हे त्यांचे बालकवितासंग्रह आहेत, तर बालगोविंद हे बालनाट्य त्यांनी लिहिले.
त्यांच्या मनमोकळ्या स्वभावामुळे त्यांना अनेक मित्र मंडळी होती. तीही वेगवेगळ्या स्तरांतली, त्यांच्या मित्र मंडळीत पं. भीमसेन जोशी, पं. कुमार गंधर्व, जेष्ठ नेते नाथ पै, मधु दंडवते, एस. एम. जोशी, ना. ग. गोरे असत. महाराष्ट्र्सेवादलातल्या सर्वांना, `साधने’त त्यांच्याबरोबर काम करणार्या सहकार्यां नाही ते आपले वाटतात. त्यांचे मराठी, संस्कृत भाषेवरचे प्रभूत्व आणि प्रेम तर सर्वश्रुतच होते. पण त्यांचे इंग्रजीवरही प्रभूत्व होते. `शतकाच्या सुवर्णमुद्रा’ हे त्यांचे अखेरचे पुस्तक.
वसंत बापट यांचे १७ सप्टेंबर २००२ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply