चित्रपटाच्या श्रेयनामावलीमधील एक नाव वाचण्यासाठी मी नेहमीच अधीर असतो, ते म्हणजे कॅमेरामनचं नाव!! मग ते मराठी, हिंदी किंवा इंग्रजी कोणत्याही भाषेच्या चित्रपटातील असो, ती व्यक्ती माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची असते. आपण चित्रपट आपल्या कानाने ऐकतो आणि कॅमेरामनच्याच डोळ्याने पाहतो..
आजपर्यंतच्मा प्रत्येक कॅमेरामन बद्दल मी वाचून, ऐकून जाणून घेतलेलं आहे. चित्रपट जाहिरातींच्या क्षेत्रामुळे अनेक कॅमेरामन माझ्या संपर्कात आले, त्यांच्याशी थोडंफार बोलता आलं, हे माझं भाग्य आहे..
‘लाखाची गोष्ट’ चित्रपट करणारे बाळ बापट काही कामाच्या निमित्ताने घरी आले होते. त्यांचेच शिष्य, दत्ता गोर्ले हे अरविंद सामंतांचे कॅमेरामन. त्यांनी ‘पाठलाग’, ‘मधुचंद्र’ सारखे अनेक उत्तम चित्रपट केले.
दादा कोंडके यांचे कॅमेरामन अरविंद लाड, हे एकदा सामंत यांच्या ऑफिसवर आले होते. त्यांना मी आदरपूर्वक माझ्या ऑफिसवर घेऊन आलो, त्यांच्याशी गप्पा मारल्या. दादांचा पहिला चित्रपट, ‘सोंगाड्या’ मधील ‘माळ्याच्या मळ्यामंदी कोण गं उभी..’ हे गाणं त्यांनी त्यावेळी एका दिवसात शुट केलं होतं. त्यानंतर दादांचे अनेक रौप्यमहोत्सवी चित्रपट त्यांनी केले.
‘सूडचक्र’ चित्रपटाचे वेळी राम आल्लम नावाचे ‘उपकार’ चित्रपटासाठी, काम केलेले कॅमेरामन होते. त्यावेळी त्यांच्या एरिफ्लेक्स कॅमेऱ्यातून डोकावण्याची मला नेहमीच उत्सुकता असायची.
‘पैंजण’ चित्रपटाचे वेळी चारुदत्त दुखंडे कॅमेरामन होता. तो बोलका नसल्यामुळे त्याच्याशी मैत्री अशी झालीच नाही. ‘वाजवू का’ चित्रपटाच्या निमित्ताने गिरीश कर्वे हे ग्रेट कॅमेरामन भेटले. त्यांना मी गुरुस्थानी मानून, त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकून घेतल्या. त्यांनी ‘मुगल-ए-आझम’ चित्रपटासाठी सहायक म्हणून काम केले होते.
जब्बार पटेल यांचे कॅमेरामन, राजन किणगी एकदा सुहास जोग यांचेकडे भेटले होते. ‘तू तिथं मी’ च्या निमित्ताने हरीष जोशी हे कॅमेरामन संपर्कात आले. त्यांचं लाईटींग फार उत्तम असायचं.
रोज सकाळी चित्रपटाचं शुटिंग सुरु होण्याआधी कॅमेऱ्याला हार घालून, पहिला शाॅट ‘ओके’ झाल्यावर कॅमेऱ्यापुढे नारळ फोडून त्याचा प्रसाद संपूर्ण युनिटला वाटला जात असे. ही एक प्रकारची श्रद्धाच असायची की, जेणेकरून कोणत्याही अडचणीशिवाय शुटींग पार पडावं…
मला अशा कॅमेरामनबद्दल सांगायचं आहे की, ज्यांनी आपल्या अनुभवाने अनेक उत्तम चित्रपटांचे चित्रीकरण केले.. ई. महंमद नावाचे कोल्हापूरचे कॅमेरामन होते, त्यांनी शुटींगचे वेळी लाईट मोजण्यासाठी कधीही मीटर वापरला नाही. ते उजव्या हाताची मूठ डोळ्यावर धरुन कॅमेऱ्याला कोणतं अॅपर्चर ठेवायचं हे अचूक सांगत असत.. त्यांनी ‘चोरीचा मामला’ व असे अनेक कृष्णधवल चित्रपट केलेले आहेत..
तसंच काम करणारे, ईशान आर्य हे हुशार कॅमेरामन होते. त्यांना एका मराठी निर्मात्याने चित्रपटासाठी नक्की करण्याच्या आधी विचारले की, तुम्ही याआधी किती चित्रपट केले आहेत? त्यावर त्यांच्याबद्दल एका जाणकाराने निर्मात्याला सांगितले की, त्यांना याआधी दक्षिणेकडील बावीस चित्रपटांसाठी पुरस्कार मिळालेले आहेत!
इतक्या मोठ्या अनुभवी कॅमेरामनने मराठीत मोजकेच चित्रपट केलेले आहेत. ‘शापित’, ‘आज झाले मुक्त मी’, ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटांतून त्यांची कलात्मक कामगिरी दिसून येते.
त्यांनीदेखील लाईट मोजण्यासाठी कधीही मीटरचा वापर केला नाही. ते आपल्या उजव्या हाताचा पंजा उलटा सुलटा लाईटसमोर धरुन अॅपर्चर किती ठेवायचं हे अचूक सांगायचे. त्यांनी रिफ्लेक्टरचा वापर फार कमी वेळा केला.
‘शापित’ हा चित्रपट त्यांनी ‘ओरवो’ कंपनीची फिल्म वापरुन केला. त्या फिल्मचा त्यांनी सर्वोत्तम रिझल्ट पडद्यावर दाखविल्याबद्दल ओरवो कंपनीने त्यांना पुरस्कार देऊन गौरविले.
ईशान आर्य यांच्या हाताखाली बाबा आझमी, शंकर बर्दन तयार झाले. त्यांचा मुलगा सागर आर्य, याने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत शहारुख खानच्या ‘कोयला’ सारखे अनेक यशस्वी हिंदी चित्रपट केलेले आहेत..
ईशान आर्य यांची पत्नी, सुलभा आर्य यांनी कित्येक चित्रपटात व सिरीयल्समध्ये आईची भूमिका साकारलेली आहे. ‘आधार’ चित्रपटाचं काम करीत असताना माझा त्यांच्याशी संपर्क आला होता. त्यावेळी त्यांच्याच तोंडून ईशान आर्य यांच्याबद्दल मी ऐकलं होतं..
एक काळ असा होता की, चित्रपटाचं शुटिंग म्हटलं की, त्या ठिकाणी कॅमेरा, कॅमेरामन, डायरेक्टर, कलादिग्दर्शक, ध्वनीमुद्रक, नृत्यदिग्दर्शक, स्थिरचित्रण करणारा, माईक धरणारा, मेकअपमन, लाईटमन, रिफ्लेक्टर्स, हेअरड्रेसर, स्पाॅटबाॅईज, सर्व तंत्रज्ञांचे सहायक व कलाकार अशांची ‘जत्रा’ असायची.. आता आधुनिक डिजिटल छोटे कॅमेरे आले, साऊंड साठी डिजिटल माईक आले. फिल्मच्या रिळांऐवजी चीपवरती शुटींग रेकाॅर्ड होऊ लागलं. पुढचे सर्व सोपस्कार हे काॅम्प्युटरवरच केले जाऊ लागले..
थोडक्यात आता तंत्रज्ञान खूपच सुधारलेलं आहे. शुटींगची मजा निघून गेली आहे.. जसं एकेकाळी सात्त्विक जेवणानं पोट भरायचं तसं आत्ता न होता.. चमचमीत फास्ट फूड खाऊन फक्त पोट भरलं जातं.. परंतु त्या खाण्यानं समाधानाचा किंवा तृप्तीचा ढेकर मात्र येत नाही…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१६-९-२१.
Leave a Reply