संजय ऑफिसमधून सुटला की, तीन किलोमीटर अंतरावरील त्याच्या घरी जाताना त्याला एका मोठ्या सिग्नलला रोज थांबावच लागायचं. सकाळी त्या चौकात सामसूम असायची आणि संध्याकाळी मात्र सहा वाजल्यापासून रात्री नऊपर्यंत दुचाकी, चारचाकी गाड्यांच्या रांगाच लागायच्या..
सिग्नलला गाडी थांबवली की, काही लहान मुलं, कडेवर मूल घेतलेली बाई, एखादी चौदा पंधरा वर्षांची डस्टबीनच्या पिशव्या विकणारी मुलगी, पिवळ्या चाफ्यांच्या फुलांची वेणी विकणारा तरुण मुलगा हे आळीपाळीने जवळ यायचे. सिग्नल सुटला की, रस्त्याच्या कडेला जाऊन ते पुन्हा उभे रहायचे..
संजय रोज त्यांना पहात होता. कधी खिशात चिल्लर असेल तर, त्या मूल घेतलेल्या बाईच्या हातावर, ती किती आहे ते न पाहता, ठेवत होता. घरी त्याच्या पत्नीनं, संगीतानं डस्टबीनच्या पिशव्या आणायला सांगितल्यावर, त्याही एकदा त्यानं त्या मुलीकडून खरेदी केल्या होत्या.
एकदा त्या चाफ्याची वेणी विकणाऱ्या तरूण मुलाकडे संजयचं सहजच लक्ष गेलं.. त्या मुलाच्या पायात साधी चप्पलही नव्हती.. तो अनवाणी हिंडत होता. त्याला आठवलं आपल्याकडे एक बुटांचा जोड पडून आहे. तो याला दिला तर, किमान तो अनवाणी तरी हिंडणार नाही.. संजय त्याच्याशी बोलणार तेवढ्यात, सिग्नल पडला..
दुसऱ्याच दिवशी सिग्नलला संजयला तो दिसला. त्याने नजरेनेच बोलवल्यावर तो जवळ आला. संजयने त्याला त्याचं नाव विचारलं, त्यानं ‘सय्यद’ असं सांगितलं. त्याला, उद्या तुझ्यासाठी बुट घेऊन येतो असं सांगून संजय निघाला.. तेवढ्यात सय्यदने हातातील वेण्यांच्या तारेतून, चाफ्याची एक वेणी ‘भाभी के वास्ते’ असं सांगत संजयच्या हातात दिली. सिग्नल पडला व संजय घराच्या दिशेने वळला..
संजयची रविवारी हक्काची सुट्टी असल्याने तो संध्याकाळी फिरायला संगीतासह बाहेर पडला. संगीताने ती चाफ्याची वेणी केसात माळल्यामुळे त्याची श्याम ‘सुगंधी’ झाली होती. शहरात फिरुन झाल्यावर परतताना सिग्नलवर सय्यदला देण्यासाठी बुटाचा जोड संजयने गाडीच्या डिकीत ठेवलेला होता. सिग्नलला दोघेही थांबून सय्यद दिसतोय का, हे पाहू लागले, मात्र तो काही दिसला नाही.. दोघेही घरी परतले..
चार दिवस रोजच संजय, सय्यद दिसतोय का ते पहात होता. मात्र तो काही त्याच्या नजरेस पडला नाही. शेवटी त्यानं त्या डस्टबीनच्या पिशव्या विकणाऱ्या मुलीला त्याच्याबद्दल विचारलं. तेव्हा तिनं तो पलीकडच्या झोपडपट्टीत राहतो, असं सांगितलं. संजयने गाडी बाजूला पार्क केली व तिला त्याचं घर दाखवायला सांगितलं. दोघेही पलीकडच्या झोपडपट्टीतील एका ताडपत्री लावलेल्या झोपडीसमोर पोहचले. त्या मुलीनं ‘सय्यदभैय्या’ अशी हाक मारल्यावर, आतून सय्यदनं ‘ओ’ दिली.. ‘देख तुझे मिल्ने के वास्ते कौन आया है’ असं तिने बोलल्यावर आतून एक दाढीवाला म्हातारा बाहेर आला.. त्याने संजयला आत यायला खुणावले. संजय आत गेल्यावर पाहतो तो सय्यदच्या पायाला मोठं प्लॅस्टर लावलेलं. सय्यद सांगू लागला, ‘साब, आप से मिल्ने के दुसरेही दिन, एक कारने मुझे ठुकराया. गल्ती तो मेरी नहीं थी, फिर भी मेरे पैर की हड्डी टूटी. चार लोगोंने उसको पकड के रखा, तभी उसने ये खर्चापानी किया. अब दो महिने, मुझे घर में ही रहना पडेगा..’ संजय त्याला पाहून खूप दुःखी झाला. त्याने ते बुटांचे जोड त्याच्या हातात दिले. सय्यदला बुट आवडले, मात्र आता किमान दोन महिने तरी, तो ते बुट वापरु शकणार नव्हता.. त्याने संजयची अब्बाजानशी, त्याच्या वडिलांशी ओळख करुन दिली. संजय त्याच्या वडिलांना नमस्कार करुन निघाला.
चार दिवसांनंतर संजय सिग्नलला थांबल्यावर वाहनांच्या गर्दीतून अब्बा जवळ आले व चाफ्यांच्या फुलांची एक वेणी त्याच्या हातात दिली. ‘मेरे बेटेने, उसकी भाभी के वास्ते दी है, लेलो..’ संजयने खिशात हात घातला तेव्हा अब्बांनी पैसे घेण्यास नकार दिला. तो पर्यंत सिग्नल पडला.. अब्बांना रस्ता ओलांडला संजयने पाहिलं, त्यानं दिलेले बुट अब्बाजानच्या पायात होते व चाफ्याचा दरवळ आसमंतात भरुन राहिला होता…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
९-९-२१.
Leave a Reply