सारी पटावर संसाराच्या, भाग्य-रेखा, सुखवी मनाला ।
मार्ग चालतां, नाही कळले, “आशा” आली केव्हां, एकसष्टीला ।।
“आशा” आली केव्हां, एकसष्टीला ।।धृ।।
चापल्य विजेचे कार्यांमध्ये, उधाण अंगी उत्साहाचे ।
मना पासुनि, व्यस्त राहुनि, कसब आगळे, नाते जपण्याचे ।।
देह झिजवुनि, सकलांसाठी, कौशल्य, अपुलसे करण्याचे ।
परखड बोल बोलुनि, ध्येय, सर्वां, समजुनि घेण्याचे ।।
स्पष्ट वाणींची, स्वच्छ मनाची, अशी ही आहे सरला ।
मार्ग चालतां, नाही कळले, “आशा” आली केव्हां, एकसष्टीला ।।
“आशा” आली केव्हां, एकसष्टीला ।।१।।
पणास लाविले, कौशल्य अवघे, चालविण्या मुक्तांगण ।
राहुनि वक्तशीर, स्वानंदे खुलविले, स्नेहभरे बालांगण ।।
धुरा वाहुनि पाव शतकीं, भूषविले, ते विद्येचे प्रांगण ।
शैशव आपुले, सदैव जपुनि, फुलविले बालांचे मधुरांगण ।।
काळ असा हा कर्तृत्वाचा, बहरुनि मजेत सरला।
मार्ग साचतां, नाही कळले, “आशा” आली केव्हां, एकसष्टीला ।।
“आशा” आली केव्हां, एकसष्टीला ।।२।।
टीप-टीप अन् नीट-नेटकेपणा, अंगी भिनलेला ।
तसूं भरही, जीवनीं, नव्हती जागा, ओंगळपणाला ।।
मान राखूनि ताठ, सदा उभी ही अपुल्या कर्तव्याला ।
राहुनि ऐटित, सरसावली, जीणे “देखणे” करण्याला ।।
आवेशाचा आवेग देखुनि, कौतुक वाटते मनाला ।
मार्ग चालतां नाही कळले, “आशा” आली केव्हां, एकसष्टीला ।।
“आशा” आली केव्हां, एकसष्टीला ।।३।।
आयुष्याच्या, शांत नि सुरेल ऐशा या वळणावरती ।
हलकेच वळविली नजर, अध्यात्माच्या मार्गावरती ।।
ध्यानीं नसतां मनीं, ध्यान लागले, शशि-चरणांवरती ।।
निश्चये होईल गुरुकृपा, ठेवितांच श्रद्धा, नामावरती ।।
स्पर्श लाभू दे मायेचा हीच “आस ” या गुरुदासाला ।
मार्ग चालता, नाही कळले, “आशा” आली केव्हां, एकसष्टीला ।।
“आशा” आली केव्हां, एकसष्टीला ।।३।।
-गुरुदास / सुरेश नाईक
१ नोव्हेंबर २०११ मलुंड (पू), मुंबई ४०००८१
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply