काही वर्षांपूर्वी ” नायक -द रिअल हिरो ” हा दाक्षिणात्य चित्रपट (अनिल कपूरचा) येऊन गेला. तो एका तमिळ चित्रपटाचा हिंदी अवतार होता. एका दिवसाचा मुख्यमंत्री ( शिवाजीराव गायकवाड- हे मराठी नांव त्याला का दिले होते,कळले नाही). पण सगळं बदलण्याच्या घाईत असलेला हा तरुण सी एम, धडाक्याने कामाला लागतो. मारामाऱ्या करतो, चुलबुल्या राणीबरोबर प्रेम करीत झाडांभोवती फिरतो (झाडांच्या नशिबात कोठे सी एम ने त्यांच्याभोवती घिरट्या घालणे असते? अर्थात दक्षिणेकडील जयललिता आदी कलावंत खरेखुरे सी एम झाडाभोवती फिरत गायचे हा भाग वास्तव म्हणून वेगळा! पण सी एम बनण्यापूर्वी. इथे आपण चित्रकथेबद्दल बोलतोय.) आणि नंतर टिपिकल मार्गाने जाऊन संपतो.
“एका चांगल्या माणसाला तुम्ही तुमच्यासारखं (खराब) केलंत रे ” अशी अनिलची व्यथा मात्र भिडून जाते. मिरासदारांच्या कथेतील (व्यंकूची शिकवणी ) शिक्षकच विद्यार्थ्यांसारखी तंबाखू चोळू लागतो, तसं हे काहीसं. पिटातल्या प्रेक्षकांसाठी असलं स्वप्नाळू रंजन मस्त. आपल्या सारख्या सामान्यजनांना जे जे करावंसं वाटतं, ते एकेकाळी अमिताभ करायचाच की ! सध्याच्या उबग आणणाऱ्या यंत्रणेविरुद्ध, मदमस्त राजकारण्यांविरुद्ध त्यांच्यातीलच एक शड्ड ठोकतो,हे काल्पनिक चित्र मोहक वाटतं. प्रत्यक्षात असं कधी होणार नाही याची आमूलाग्र खात्री पटली असली तरी चित्रपटगृहातील तीन तास स्वप्नरंजनात मस्त जातात. नेहेमीप्रमाणे हाती काहीच लागत नाही आणि भ्रमनिरास होऊन आपण चित्रपटगृहातून बाहेर आलो होतो त्यावेळी.
२०१३ साली अशा समांतर कथेवरचा एक सर्वांगसुंदर चित्रपट मराठीत आला – ” आजचा दिवस माझा ” ! चंद्रकांत कुळकर्णीने दिग्दर्शीय हाताचा परीस या कथेवर मनसोक्त फिरवला आहे. ही तर एका रात्रीची कथा ! पण सुरुवातीला “सिंहासन “जवळ जाणारा हा चित्रपट एकाएकी एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचतो. चवीला राजकारण जरूर आहे पण ही एका मुख्यमंत्र्याच्या “आतील ” मानवाचे हृद्य दर्शन घडविणारे कथानक आहे. स्वतःच्या आतील माणसाला उत्तर देणे हे कोणालाही टाळता येत नाही, पण इथे तर सचिन खेडेकर आपल्या पत्नीला त्याचं अट्टाहासामागचं खरं कारण सांगतो.
रात्रभर जागून अजाणता आपल्या पूर्वसुरींच्या हातून झालेली चूक एका रात्रीत दुरुस्त झालीच पाहिजे अशा जिद्दीने हा माणूस सगळ्या यंत्रणेला कामाला लावतो. (इतरवेळी यंत्रणा सामान्य माणसाला वेठीस धरत असतात.)
सामान्य माणसाचं काम झालंच पाहिजे हे निब्बर कातडीच्या प्रशासनाला तो ठणकावून सांगतो. आणि हे काम कसं होत नाही,हे मी बघतोच असा इरेला पडतो.
यशवंतराव चव्हाणांचं वाक्य ऐकवतो- ” आम्ही राजकारणी लोकांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि प्रशासनाने होय ! “
ऐकायला किती छान वाटतं -आपलं महत्व अचानक वाढविणारं चव्हाणांचं हे वाक्य त्यांच्याबद्दलचा आदर वाढविणारं आहे.
मुख्य सचिवांना वठणीवर आणणारं आणि त्यांना त्यांचं काम शिकवणारं वर्तन मुख्यमंत्री स्वतःच्या उदाहरणाने शिकवितात.
सगळ्यात सुंदर प्रसंग ऋषिकेश जोशीच्या अजरामर अभिनयाने चिरंतन होतो आणि डोळे धूसर करतो.
परीक्षेत उत्तुंग यश मिळालेल्या रुसून बसलेल्या मुलाला भेटता येत नाही म्हणून अपरात्री त्याला फोन करून हा बाप त्याला थोडक्यात पूर्ण लांबीचं आयुष्य शिकवतो.
” अरे बाळा, तुझी आज्जी सायंकाळी गावाबाहेरच्या मंदिरात जाऊन दिवा लावून येत असे- ते गावासाठी किंवा देवासाठी नसे. तिला कोठेतरी उत्तर द्यावं लागणार आहे याची जाणीव असल्याने ती एकटी जाऊन दिवा लावून येत असे.”
असा दिवा हा चित्रपट आपल्या मनाच्या गाभाऱ्यात नकळत लावून जातो.
भल्या पहाटे हा “मानव “असलेला मुख्यमंत्री मंत्रालयात जाऊन आपल्या सहकाऱ्यांसोबत चहा घेतो आणि फोटो काढतो आणि त्यांना स्वतःमधील हरवलेलं माणूसपण भेटवून देतो.
“हाती घ्याल ते तडीस न्या ” या माझ्या सोलापुरातील हरिभाई देवकरण शाळेचं ब्रीदवाक्य सचिन खेडेकर सत्यात उतरवतो. चक्क महेश मांजरेकर गुर्मी आणि सत्तेचा रुबाब दाखविणारा मुख्य सचिव मस्त चितारतो. श्रेय -दिग्दर्शकाचं ! अन्यथा महेश ही व्यक्ती डोके उठाड आहे.
शेवट पुन्हा आपले आणि मुख्यमंत्र्याचेही पाय जमिनीवर आदळतो. एक काम झालं पण सभोवताली पसरलेली अफाट कामे सचिनला भानावर आणतात आणि पुन्हा ” मातीचा ” करतात.
कोठल्याही चांगल्या कलाकृतीचे हेच काम असते.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply