होत चालणे सरळ मार्गीं, जगींच्या वाकप्या मार्गांवरी ।
चालतांना मार्गीं, ना दिले लक्ष, जनांच्या बेरक्या नजरांवरी ।।
देऊनि बगल, तिरकस विचारांना, टाळले तयां वरचेवरी ।
राहूनि निरलसपणे, लाभली मज, सुखी जीवनाची लॉटरी ।।
लाभली मज, सुखी जीवनाची लॉटरी ।।१।।
साधेपणाने देखूनि अमुचा, ठरविले तयांनी आम्हां सांब भोळा ।
घेतले ऐकूनि सारे, नाही केले, मनीं तयांचे, ते विचार गोळा ।।
शांत चित्ते, पटले मनांस, तयांच्या मते, जरी ठरलो खुळा ।
राज हंसापरी, आहे तेवीत मी, या सौख्य सागराच्या गोरसा ।।
या सौख्य सागराच्या गोरसा ।।२।।
नव्या युगाची, नव संकल्पनांची, आहे नांदी कॉम्प्युटर ।
नवनव्याचा ध्यास, अमुच्या उरीं, फुरफुरतो अपार ।।
करण्या अंगीकार सुधारणांचा, आहोत सदा, आम्ही तत्पर ।
हळूच भार्या म्हणे, द्या, आतांतरी, मुलांना संधी थोडी फार ।।
द्या, आतांतरी, मुलांना संधी थोडी फार ।।३।।
ऐकून घेतले नित्याप्रमाणे तिचे, वृत्तीत बदल माझ्या केला ।
सांधा जरी बदलला, स्वभावांत माझ्या, फरक फारसा न पडला ।।
जाणूनि होतो सत्य, चालवूनि डोके अपुले, भार्ये आज्ञेच वागणे ।
मर्म सुखी जीवनाचे, खाऊनि ठोकरा अनेक, जरा उशिराच उमगले ।।
खाऊनि ठोकरा अनेक, जरा उशिराच उमगले ।।४।।
साथीस असतां घरचीच बाईल, धरिला न हातीं मोबाईल ।
बायडीच असतां, जवळी फीमेल, बाळगलान आयडी ई-मेल ।।
जरी नव्हते क्रेडिट, तसे नव्हते डएबीटही, भासली न गरज कार्डाची ।
आहे सदैव कृपा मजवरी, मझ्याच, प्रिय माऊली गाडीची ।।
मझ्याच, प्रिय माऊली गाडीची ।।५।।
वाचाळपणांतुनि अमुच्या, होत होती अमुची कुचंबणा ।
न वाटला खेद कधी, नाही वाटला तयाचा जराही अचंबा ।।
राहूनि सरल, साध्या विचारांत, जोपासले मस्तीत माझ्याच छंद ।
कृपेने माऊलीच्या, आला भरुनि स्वनंदे, हा जीवनाचा तुंबा ।।
आला भरुनि स्वनंदे, हा जीवनाचा तुंबा ।।६।।
होते बोलणे तसे स्पष्ट, येतातबोलते, हृदयांतुनि झाले ।
वाटले तयांना, परखडपणांतुनि, आगोत आम्ही विकृत मनाचे ।।
अद्वा तद्वा घेतले बोलून, न उरले भान तयां कशाचे ।
न घेतले कधी मनां, ते बोल होते, सारे तयांच्याच मनाचे ।।
ते बोल होते, सारे तयांच्याच मनाचे ।।७।।
नवनव्याच्या ध्यासापायीं, उडविली तयांनी आमुची खिल्ली ।
नाही डगमगलो कधीही, जगलो निर्भयतेने, होऊनि एक वल्ली ।।
निरागस अमुच्या वृत्तीची, उडवली सदा तयांनी टर ।
असतां नामांत, प्रसन्न चित्ते, नाही बिघडले अमुचे खेटर ।।
जगी नाही बिघडले अमुचे खेटर ।।८।।
वागण्यांतुनि, आहोत सदा, मिष्किल नि अवखळ ।
वाटला कैकांना, आहे उतारवयांतला, अमुचा पोरखेळ ।।
भावुकता मनांत होती सुप्त, जागृत बोलणे जरी फटकळ ।
निर्मल अंतराची होती, निखळ निरामय, ती खळखळ ।।
निखळ निरामय, ती खळखळ ।।९।।
साधेपणा, कपड्यांतुनि ज्ञात होता जगाला ।
दुर्लक्षितां, जनांच्या पुटपुण्याला, लाभली शांती मनमनाला ।।
ध्यान देतां वसनांवरीं, द्यावी न तिलांजली आत्मीयतेला ।
खंत नसावी उपेक्षांची, देतां आधार, सत् संकल्पनेला ।।
देतां आधार, सत् संकल्पनेला ।।१०।।
तिजवाटे, कुठे काय बोलावे, हे कळत नाही मजसी ।
अन्
मज वाटे कुठे काय बोलू नये, हे कळत नाही तिजसी ।।
खळाळली जीवन गाथा, शब्दांच्या अशा या घोळांपायीं ।
सानंदे साधले सारे, सदा घेऊनि लीन, गुरुमाऊलीपायीं ।।
सदा घेऊनि लीन, गुरुमाऊलीपायीं ।।११।।
गुरुदास / सुरेश नाईक
१० फेब्रुवारी २०११, गुरुवारराधा-निवास
मुलुंड (पू) मुंबई ४०००८१
“सुमनांजली” या काव्यसंग्रहातून…
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply