आज अम्मांचा वाढदिवस !
सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, लताने ( हिचा वाढदिवस उद्या आहे) सुरु होणारे मंगेशकर घराणे ( दीनानाथांना आमच्या पिढीने पाहिले नाही), स्वामी चिदानंद सरस्वती आणि अम्मा यांच्या काळात जन्मलो, त्यांना पाहिले /अनुभवले हा आमचे जीवन परिपूर्ण करणारा अनुभव आहे.
१९९५-९६ साली पुण्यात आलेल्या अम्मांची ओळख श्री श्रीनिवासन आणि माझे श्वशुर श्री भ. रा. नाईक यांनी आम्हांला करून दिली. तेव्हापासून सातत्याने अम्मांना आम्ही भेटतोय. खरं तर त्यांचं लौकिकार्थाने दर्शन घेतोय असा सूर मी लावला असता तर ते अधिक उचित ठरले असते. स्वामी चिदानंद आणि अम्मा या काळाने आमच्या पदरात टाकलेल्या विभूती आहेत. त्यांच्या सान्निध्यात सगळं सार्थक होतं. पण अम्मा “भेटतात”, कुशीत घेतात-मातृरूपाने ! विश्वभर त्या Hugging Saint म्हणून प्रसिद्ध आहेत.
मी त्यांना पुण्यात, मुंबईत आणि चक्क त्यांच्या केरळमधील आश्रमात भेटलोय. त्यांच्या कार्याचा आवाका माझ्या शब्दांना बापुडवाणा करणारा आहे, त्यामुळे मी त्या फंदात पडणार नाही. माझ्या पत्नीने मराठीत त्यांचे चरित्र ” जगन्माता ” लिहून हा प्रयत्न केलाय. सदर चरित्र सलग दोन दिवस अम्मांच्या हस्ते प्रकाशित झालं. आदल्या दिवशी निगडीतील त्यांच्या आश्रमात-आमच्या हट्टाखातर आणि दुसऱ्या दिवशी मुंबईला शिवाजी पार्कवर दिमाखात आणि अम्मांच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार !
या फोटोत अम्मांसोबत मी,माझी पत्नी, तत्कालीन उपमुख्यमंत्री श्री भुजबळ आणि प्रसिद्ध सिने कलावंत स्मिता जयकर आहेत.
ओम अमृतेश्वर्यै नमः !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply