भारतात १९५२ पासून वन्यजीव सप्ताह साजरा केला जात आहे. नामशेष होत चाललेल्या वन्य पशुपक्ष्यांबाबत जागृती निर्माण करणे हा त्यामागील हेतू आहे. आता या मूळ हेतूचा काळानुसार विस्तार झाला आहे. वन्यजीवांनी मानवी आयुष्यात प्रवेश करण्यामागची कारणे समजावून दिली जात आहेत. वन्यजीवनाचं महत्त्व माणूस नामक प्राण्याला कळावं, डोक्यात शिरावं आणि मनात कायम रहावं या उद्देशाने अनेक जाणीव जागृतीचे कार्यक्रम केले जातात. बरेचदा, त्यातही केवळ उपचार पार पाडल्याचं समाधान मिळतं.
पण ज्या उद्देशाने हा सप्ताह साजरा करण्याचं ठरवलं गेलं, तो किती साध्य होतो?
नागरी वसाहतीत शिरकाव करणाऱ्या वन्य प्राण्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. खरे तर कोणताही वन्यजीव स्वत:हून माणसांवर हल्ला करत नाही. परंतु त्यांच्या राहण्याच्या क्षेत्रावर ( अधिवासावर) शेती, रस्ते वा बांधकामाच्या रूपाने होणारे मानवी आक्रमण मर्यादेपलीकडे गेले की ते जंगलाच्या सीमेवरील खेड्यांत घुसून मुख्यत: पोटासाठी गाई गुरे मारतात व त्यातून मानव- वन्यजीव असा लढा उद्भवतो. भारतासहित जगातील इतरही पुरातन संस्कृतींमध्ये सांगितल्याप्रमाणे मानव आणि वन्यजीवात मैत्री असणे ही संपूर्ण पृथ्वीची गरज आहे, कारण वन्यजीवांखेरीज मानव सुखाने राहूच शकणार नाही. ही जागृती रुजवण्यासाठी भारत सरकारने ‘इंडियन बोर्ड ऑफ वाईल्डलाईफ’ ची स्थापना पूर्वीच केली आहे.
माणसाने एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. माणूस निसर्गात केवळ एक ग्राहक आहे, उत्पादक नाही. अन्नासाठी, प्राणवायूसाठी तो निसर्गावर पूर्णपणे अवलंबून आहे. जोपर्यंत माणूस वनस्पतींप्रमाणे स्वत:चं अन्न स्वत: तयार करू शकत नाही, किमान तोपर्यंत तरी, अगदी स्वार्थ म्हणूनही, वन्यसंपदेचं, जीवनाचं, पर्यायाने निसर्गाचं रक्षण आणि जतन करणं आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन योग्य दिशेने प्रवास सुरू केला तर अजुनही बऱ्याच गोष्टी वाचवता येतील.
वन्यजीव सप्ताहाच्या हार्दिक शुभेच्छा!
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
GADAMALAK ⚜️