नवीन लेखन...

इन्सीनरेटर

जहाजावर इन्सीनरेटर नावाचे एक युनिट असतं. यामध्ये एक अशी मशीनरी असते ज्यामध्ये जहाजावरील वेस्ट ऑईल जाळले जाते. जहाजावर इंजिन , जनरेटर, फ्युएल प्यूरीफायर, फ्युएल फिल्टर आणि ईतर मशीनरी मधुन लीक झालेले फ्युएल ऑइल, डिझेल , मुदतबाह्य किंवा खराब झाल्याने चेंज करावे लागणारे ल्युब्रीकेटिंग ऑईल या सर्वांचा समावेश वेस्ट ऑईल मध्ये होतो. प्रत्येक जहाजावर कधी कधी महिन्याला हजारो लिटर अशा प्रकारचे वेस्ट ऑईल निघत असतं, ज्याचा वापर जहाजावर कुठेही करता येत नाही.

ऑईल पोल्यूशन रोखण्याच्या कडक निर्बंधांमुळे समुद्रात जहाजावरुन कुठल्याही प्रकारचे ऑईल सोडता येत नाही. लिटर भर जाऊ द्यात पण थेंबभर सुद्धा ऑईल थेट समुद्राच्या पाण्यात सोडता येत नाही. काही उपकरणे आहेत ज्याच्याद्वारे ठराविक समुद्रातील ठराविक भागातच एका लिटर पाण्यात 0.0015% एवढ्या कमी प्रमाणात ऑईल सोडता येते.

काहीवेळा जहाज महिनो न महिने असल्याने ऑइल समुद्रात सोडता येउ शकत नाही अशा भागात असते.

अशा वेळेला काही पोर्ट मध्ये जहाजावरील हजारो लिटर ऑइल तिथल्या स्थानीक लहान लहान बोटींमध्ये ट्रान्स्फर केले जाते. जहाजावर वेस्ट ऑइल किती प्रमाणात जमा होते, ते कोणत्या टाक्यांमध्ये साठवले जाते तसेच एखाद्या टाकीतून दुसऱ्या टाकीत ट्रान्स्फर केले त्याची क्वांटिटी आणि वेळ या सर्वांची नोंद ठेवली जाते तसेच जहाजावरुन पोर्ट मध्ये दिले तरी त्याची नोंद आणि ज्याला दिले त्यांच्याकडून त्यांना मिळाल्याची पावती घेतली जाते.

रशियन,युरोपिअन व अमेरिकन पोर्ट मध्ये हे वेस्ट ऑइल रिसिव्ह करणारे जहाज कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात पैशांचा मोबदला घेतात. तर ब्राझील सारख्या देशात या वेस्ट ऑइल च्या बदल्यात जहाज कंपनीला पैसे देतात, हे वेस्ट ऑइल त्याच्यातील पाणी आणि ईतर कचरा काढून बहुतेक करुन जाळण्यासाठी वापरले जाते.

परंतु जेव्हा जहाज खोल समुद्रात जमिनीपासून दूर असते तेव्हा या वेस्ट ऑइलची जहाजावरच विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला जातो. समुद्रात सोडता येत नसल्याने अशा वेस्ट ऑईलची विल्हेवाट लावण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या ऑईलला जहाजावरच नियंत्रित पद्धतीने जाळणे.

जहाजाच्या इंजिन रुम मध्ये इन्सीनरेटर नावाचे जे युनिट असतं त्यातच या वेस्ट ऑईलला जाळले जाते. हे वेस्ट ऑईल जाळणे अत्यंत कठीण असते सुमारे 600° C ते 800° C तापमानाला हे ऑईल पेट घेत असल्याने इन्सीनरेटर मध्ये तशी सोय केलेली असते. इन्सीनरेटर हे ऑटोमॅटिक असल्याने त्याच्यात तापमान नियंत्रक, टेंप्रेचर सेंसर्स आणि टेंप्रेचर अलार्म असतात. कारण वेस्ट ऑईल या इन्सीनरेटर मध्ये जास्त प्रमाणात आले तर संपूर्ण इन्सीनरेटर युनिट च जळण्याचा धोका असतो.

एकदा आमच्या जहाजावर वेस्ट ऑईल मोठ्या प्रमाणात जमा झाले होते , इन्सीनरेटर सूरू व्हायचा पण दहा मिनिटात ट्रीप होउन बंद पडायचा. दुपारी दोन वाजल्यापासून सेकंड इंजिनीयर आणि मी इन्सीनरेटर सुरु करण्याचा प्रयत्न करत होतो. दुपारी तीन वाजता चीफ इंजिनिअर चहा प्यायला इंजिन कंट्रोल रुम मध्ये आला असता सेकंड इंजिनिअर ने त्याला इन्सीनरेटर विषयी सांगितले , चीफ इंजिनिअरने त्याला काही सूचना करून त्याप्रमाणे काम करायला सांगितले. परंतु संध्याकाळचे सात वाजले तरी इन्सीनरेटर सुरु होत नव्हता. बरोबर सात वाजून पाच मिनिटांनी इंजिन रुम मध्ये फोनची रींग वाजली. कंट्रोल रुम मध्ये जाऊन फोन उचलला, पलीकडून चीफ इंजिनिअर विचारू लागला, काय झाले तुम्ही सगळे अजून खाली काय करताय, जेवायचे नाहीये का तुम्हाला. सात वाजून गेले चीफ कुकने तुमचे जेवण बाजूला काढायला घेतले आहे. रात्री इन्सीनरेटर सूरू ठेवू नका, उद्या सकाळी पुन्हा प्रयत्न करा आता सगळे वर जेवायला या मी वाट बघतोय तुम्हा सर्वांची.

डिझेल आणि वेस्ट ऑईल मध्ये काळे कुट्ट झालेले हात धुवून आम्ही खराब झालेले बॉयलर सुट चेंज करून दहा मिनिटात मेस रुम मध्ये पोचलो. चीफ इंजिनिअर आणि कॅप्टन दोघेही त्यांच्या भरलेल्या प्लेट समोर मांडून आमची वाट बघत होते.

May be an image of 9 people and people standingइकडच्या तिकडच्या गप्पा मारता मारता जेवणं आटोपली. जेवणं झाल्यावर कॅप्टन ने त्याच्या सोबत घडलेल्या एका प्रसंगाविषयी सांगायला सुरुवात केली. काही वर्षांपूर्वी तो एका जहाजावर चीफ ऑफिसर होता. त्याच जहाजावर त्याच्या शहरात राहणारा आणि जुनी ओळख असलेला सेकंड इंजिनिअर होता. त्यांचे जहाज ग्रीक कंपनीकडून चालवले जात होते. जहाजावर ते दोघंच भारतीय होते, कॅप्टन रशियन तर चीफ इंजिनिअर इटालियन , ईतर अधिकारी आणि इंजिनिअर्स रोमानियन असे मिक्स होते तर खलाशी हे फिलिपीन्सचे नागरिक ज्यांना फिलिपिनो क्रू असं बोलले जातं ते सगळे होते.

इटालियन चीफ इंजिनिअर खुप कडक आणि शिस्तप्रिय होता. फिलिपिनो खलाशांना शिपिंग कंपन्या प्राधान्य देण्याचे कारण म्हणजे फिलिपाईन्स बेटं ज्यामुळे तिथल्या लोकांचा प्रत्यक्ष समुद्राशी असलेला संबंध, त्यांची जहाजावर कोणतेही काम करण्याची लवचिकता , सक्षमता तसेच इंग्रजी भाषा अवगत असल्याने जहाजावरील प्रॉपर कम्युनिकेशन . असं असले तरी त्यांच्यात एक मोठा दुर्गुण आहे , जर ते दुखावले गेले तर कोणत्याही थराला जातात प्रसंगी जहाजावरुन कोणाला समुद्रात फेकुनही देतात , डोक्यात मिळेल त्या वस्तूने प्रहार करतात किंवा सरळ चाकूने भोसकतात.

अशा खलाशांसोबत काम करणे हे एक मोठे चॅलेंज असते. त्यांच्यासोबत त्यांच्या कलाने आणि मोठ्या संयमाने काम करावं लागतं.

इटालियन चीफ इंजिनिअर शिस्तप्रिय होता, एखादे काम वेळेत झाले नाही तर तो शिव्या देऊन अंगावर खेकसायचा. फिलिपिनो खलाशी चोवीस तासातील वीस वीस तास कामं करायला मागे पूढे बघत नसतं पण त्यांना जेवणासाठी वेळेवर सोडावे लागते, सोडले नाहीतरी ते स्वतः हातात कितीही अर्जंट काम असेल तर ते तसेच टाकून जेवणासाठी निघून जातात. इटालियन चीफ इंजिनिअरला त्यांची ही गोष्ट खुप खटकायची. जहाजावर पहिले प्राधान्य इमर्जन्सी ला दिले पाहिजे ते सुद्धा सुरक्षेचे सर्व नियम पाळून अशी त्याची धारणा होती.

ते जहाज यु एम एस क्लास म्हणजेच अन अटेंडेड मशिनरी स्पेस किंवा थोडक्यात एवढं अत्याधुनिक होते की सलग आठ ते दहा तास इंजिन रुम मध्ये कोणीही इंजिनिअर किंवा मोटारमन यांच्याशिवाय ते चालायचे. सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सगळेच इंजिनिअर आणि मोटरमन दिवसभर काम करायचे संध्याकाळी पाच वाजता जहाज यू एम एस मोड मध्ये टाकले जायचे रात्री दहा ते अकरा या एक तासात त्या रात्री चा ड्युटी इंजिनिअर आणि मोटरमन सगळं चेक करण्यासाठी इंजिन रूमचा राऊंड घेऊन पुन्हा सकाळी सात वाजेपर्यंत यू एम एस मोड मध्ये टाकायचा. जर एखाद्या मशिनरी किंवा इंजिन व जनरेटर मध्ये काही प्रॉब्लेम आला तर तसा अलार्म ड्यूटी इंजिनिअर च्या रुम मध्ये आणि नेवीगेशनल ब्रीज वर वाजायचा. मग ड्यूटी इंजिनिअर येऊन काय प्रॉब्लेम असेल तो दूर करून निघून जातो.

शनिवारी रात्री जहाज यू एम एस मोडवर होते. रविवारी सकाळी अकरा वाजता चीफ इंजिनिअर कुठे गेला म्हणून जहाजावर शोधाशोध सुरु झाली. सकाळी दहा वाजता खाली इंजिन रुम मध्ये चहा प्यायला येणारा चीफ इंजिनिअर रविवार असल्याने कदाचित आला नाही म्हणुन कोणाला काही वाटले नाही. परंतु ऑफिस कडून आलेल्या एका ई- मेलचा रिप्लाय देण्याकरिता कॅप्टन चिफ इंजनिअर ला शोधत होता, शिप ऑफिस मध्ये सकाळपासून आला नसल्याने कॅप्टन ने त्याच्या केबिन मध्ये फोन केला पण तिथून प्रतिसाद न आल्याने कॅप्टन ने इंजिन कंट्रोल रुम मध्ये फोन केला सेकंड इंजिनिअरने कळवले चीफ इंजिनिअर खाली सुद्धा आला नाहीये. रात्री साडेदहा वाजता ड्यूटी इंजिनिअर ला त्याने फोनवर काही सूचना केल्या होत्या त्यानंतर कोणाचाही चीफ इंजिनिअरशी संपर्क झाला नसल्याचे स्पष्ट झाले. स्टिवर्ड ने सांगितले की चीफ इंजिनिअर ची केबिन उघडीच होती त्याने नेहमीप्रमाणे रुम सकाळी क्लीन करून बंद केली.
कॅप्टनला चीफ इंजिनिअर चा शिस्तप्रिय स्वभाव माहिती असल्याने त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती.

तरीपण चीफ इंजिनिअर च्या नावाची जहाजाच्या पब्लिक अड्रेस सिस्टीम वरून अनाउन्समेंट करून दहा मिनिटे वाट बघितली आणि जनरल अलार्म वाजवून जहाजावरील प्रत्येकाला क्रु स्मोक रुम मध्ये जमायला सांगितले.

तत्पूर्वी सकाळी आठ वाजता खाली आल्यावर सेकंड इंजिनिअर इन्सीनरेटरच्या जवळ ऊभा राहून इन्सीनरेटर युनिट गेल्या आठ दिवसांपासून बंद असूनही आता अजूनही गरम का आहे. इन्सीनरेटर कोणी आणि कधी सुरू केला, त्याने रात्री ड्यूटी वर असलेल्या रोमानियन थर्ड इंजिनिअर ला बोलावले आणि विचारले त्याने , मला काय माहीत बोलुन हात झटकले. त्याच्यासोबत नाईट ड्यूटी ला असलेला फिलिपिनो खलाशाला इन्सीनरेटर सुरु करता येणे शक्य नव्हते, मग इन्सीनरेटर कोणी चालू केला असावा या विचारात असताना जनरल अलार्म वाजला आणि सेकंड इंजिनिअर वर निघून आला. सगळे जण स्मोक रुम मध्ये जमा झाले. चीफ ऑफिसर आणि सेकंड इंजिनिअर दोघेही एकमेकांच्या बाजूला बसले होते.

जहाज हाँगकाँग पोर्ट मध्ये दोन दिवसांनी पोचणार होते, कॅप्टन ने चीफ इंजिनिअर बद्दल विचारणा सुरु केली परंतु रात्री साडेदहा वाजता थर्ड इंजिनिअर सोबत झालेले बोलणे इथपर्यंतच चीफ इंजिनिअर जहाजावर शेवटचं असल्याचे दिसतं होत त्यानंतर काय झालं तो कूठे गेला या सगळ्यांवर मोठं प्रश्नचिन्ह बनून राहिले होते.

चीफ इंजिनिअरची केबिन सुस्थितीत असल्याची माहिती स्टीवर्ड ने दिली, तिथं कोणतीही झटापट झाल्यासारखं काहीच नसल्याचे त्याने स्पष्ट केलं.

चीफ ऑफिसर सेकंड इंजिनिअर ला कानात कुजबुजून विचारू लागला, रात्री इंजिनचा स्पीड वाढवायचा होता परंतु थर्ड इंजिनिअरने वाढवण्यास नकार दिला. थर्ड मेट ने मला फोन केला आणि मी साधारण दहा वाजता चीफ इंजिनिअरला फोन केला.

सुमारे अर्ध्या तासात मेन इंजिनचा स्पीड वाढल्याचे थर्ड मेट ने पुन्हा फोन करून सांगितलं. मला तर थर्ड इंजिनिअर वर संशय येतोय तो नक्कीच काहीतरी खोटं बोलतोय. ज्याप्रमाणे तो सांगतो की चीफ इंजिनिअर ने त्याला साडे दहा वाजता फोन वरुन सूचना केल्या त्याऐवजी नक्कीच दुसरं काहीतरी घडलं असणार.

सेकंड इंजिनिअरला सकाळी सकाळी बघितलेला इन्सीनरेटर आणि त्यावर थर्ड इंजिनिअर ने दिलेली उडवाउडवीची उत्तरं आठवली, ती उत्तरं देताना त्याची उडालेली घाबरगुंडीसुद्धा त्याच्या नजरेने पकडली होती. परंतु त्यावेळी त्याने एवढ्या गंभीर पणे विचार केला नव्हता.

चीफ ऑफिसर आणि सेकंड इंजिनिअर दोघेही काय समजायचे ते समजले पण स्मोक रुम मध्ये सगळ्यांच्या समोर काहीही न बोलण्याचे त्यांनी दोघांनीही ठरवलं.

कॅप्टन ने चीफ इंजिनिअर मीसिंग असल्याचा लांबलचक रिपोर्ट ऑफिस आणि हाँगकाँग मधील पोर्ट अथॉरिटीला पाठवला.

दोन दिवसांनी जहाज हाँगकाँग पोर्ट मध्ये पोहचले. तिथले स्थानीक पोलिस , डॉग स्क्वाडसह एका लहानशा बोटीत जहाज नांगर टाकण्याची वाट बघत थांबले होते. जाहाजाने नांगर टाकला आणि दहा पोलिस आणि दोन लॅब्राडोर कुत्रे जहाजावर चढले. सगळ्यांना एका लाईनीत उभे करून पासपोर्ट बघून ओळख करून घेतली. त्यानंतर सगळ्यांना स्मोक रुम मध्ये बसवले सगळ्यात पहिले कॅप्टनला बोलावून त्याचा जबाब नोंदवून घेतला. एक एक करून जहाजावरील प्रत्येकाला एका बंद खोलीत नेउन प्रश्न विचारण्यात आले.

सेकंड इंजिनिअर ने मागील दोन दिवसांत इन्सीनरेटरचे इतरांच्या नकळत निरीक्षण केले असता त्याला मागील बाजूला रक्ताचे काही थेंब दिसले ,तसेच थर्ड इंजिनिअर च्या वागण्यातील बदल आणि चीफ इंजिनिअर मिसिंग होता त्या दिवशीच्या घटना हे सगळं त्याने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी थर्ड इंजिनिअर आणि सगळ्या खलाशांच्या जबान्या नोंदवल्या. सुमारे तीन तासांनी दोन्ही लॅब्राडोर कुत्र्यांना चीफ इंजिनिअर च्या केबिन मध्ये नेण्यात आले तिथून हुंगत हुंगत दोन्ही कुत्रे एका मागोमाग इंजिन रुम कडे जाऊ लागले आणि इंजिन रुम मध्ये गेल्यावर कंट्रोल रुम आणि तिथून बाहेर पडून इन्सीनरेटर युनिट जवळ जाऊन इशारा करू लागले. पोलिसांनी सेकंड इंजिनिअर ने सांगितल्या प्रमाणे रक्ताचे डाग शोधले. पोलिसांसोबत फक्त कॅप्टन गेला होता इकडे सगळे अधिकारी आणि खलाशी स्मोक रुम मध्ये एकमेकांकडे संशयाच्या नजरेने बघत होते. फक्त चीफ ऑफिसर आणि सेकंड इंजिनिअर दोघेही निश्चिंत होते.

खाली पोलिसांनी इन्सीनरेटरचा इन्स्पेक्शन डोअर उघडला , त्यात जमा असलेली राख फॉरेन्सिक डिपार्टमेंट च्या अधिकाऱ्याने प्लास्टिक च्या पिशवीत भरून घेतली.

पोलिसांनी वर येऊन थर्ड इंजिनिअर आणि त्याच्यासोबत त्या रात्री ड्यूटी वर असलेल्या मोटारमन ला ताब्यात घेतले आणि हातात बेड्या घालून त्यांच्या सोबत नेले. कॅप्टन ला नेमक काय घडलं ते कळलं नाही त्याच्यासह सेकंड इंजिनिअर आणि चीफ ऑफिसर सोडुन ईतर सगळे जण शॉक लागल्या सारखे स्तब्ध झाले होते. दोन दिवसांनी जहाजावर हाँकाँग पोलिसांचा रिपोर्ट आला, चीफ इंजिनिअर रात्री सव्वा दहा वाजता इंजिन कंट्रोल रुम मध्ये थर्ड मेट च्या तक्रारी नंतर गेला होता. थर्ड इंजिनिअर ला स्पीड वाढवला असता तर आणखीन तासभर थांबावे लागले असते म्हणुन त्याने spid वाढवण्यास नकार दिला होता. याबद्दल त्याची चीफ इंजिनिअर कडे तक्रार होइल अशी त्याला कल्पना नव्हती. त्यामुळे त्याने चीफ इंजिनिअर चा स्पीड का वाढवत नाही असा फोन आल्यावर , स्पीड वाढवण्यासाठी चा सिग्नल इंजिनला जात नाहीये असं उत्तर दिलं. नेमकं काय झालेय ते बघायला चीफ इंजिनिअर स्वतः खाली इंजिन रुम मध्ये गेला. त्याने इंजिन चा स्पीड वाढवला आणि थर्ड इंजिनिअर ला पुन्हा असं करु नको म्हणून वॉर्निंग दिली. तो पुन्हा वर जाणार तोच खालच्या मजल्यावरील जनरेटर जवळुन फिलिपिनो ड्युटी मोटरमन ऐटीत तोंडात पेटलेली सिगारेट धरून चालताना दिसला. चीफ इंजिनिअर पुन्हा कंट्रोल रुम मध्ये माघारी फिरला रागाने लालबुंद होउन त्याने ड्यूटी मोटारमन साठी असलेल्या तिन बेल दाबल्या, मोटारमन धावत धावतच कंट्रोल रुम मध्ये आला, त्याच्या तोंडात पेटलेली सिगारेट तशीच होती. चीफ इंजिनिअर त्याच्यावर खेकसला आणि त्याला शिव्या देऊ लागला. तुला पुढल्या पोर्ट मध्ये घरी पाठवतो, इंजिन रुम मध्ये सिगारेट ओढतोस , स्वतःला कोण समजतो का वगैरे वगैरे. बोलुन झाल्यावर चीफ इंजिनिअर वर जाऊ लागला , मोटरमनला काय करावं ते सुचत नव्हतं तो चीफ इंजिनिअर च्या मागे गेला , जाताना त्याच्या हाताला कंट्रोल रुम मध्ये असलेल्या इलेक्ट्रिक ऑफिसरच्या टूल बॅगेतील मोठा स्क्रू ड्रायव्हर लागला. चीफ इंजिनिअर जिना चढत असताना त्याच्या पाठीत मागून येणाऱ्या मोटारमन ने स्क्रू ड्रायव्हर खुपसला. चीफ इंजिनिअर अनपेक्षित हल्ल्याने खाली कोसळला. तो उताणा पडला आणि मोटारमन त्याच्या उरावर बसून बेभानपणे छातीवर स्क्रू ड्रायव्हरने एका मागो माग एक असे निर्घृण वार करत होता. रोमानियन थर्ड इंजिनिअर पुतळ्यासारखा समोरचे दृष्य बघत होता. चीफ इंजिनिअर रक्ताच्या थारोळयात पडला आणि काही मिनिटातच त्याची तडफड थांबून तो गतप्राण झाला. एवढा वेळ त्याच्या छातीवर स्क्रू ड्रायव्हर भोसकणारा मोटारमन भानावर आला, त्याचे लाल भडक डोळे थर्ड इंजिनिअर कडे वळले होते. थर्ड इंजिनिअर थर थर कापत होता. अकरा वाजायला आले होते. यू एम एस राऊंड संपला असं कळवून इंजिन रुम यू एम एस मोड मध्ये टाकण्यासाठी नेवीगेशनल ब्रीज वर सांगायला पाहिजे होते. मोटार मन ला या गोष्टीची जाणीव झाली त्याने थर्ड इंजिनिअर ला रक्ताळलेला स्क्रू ड्रायव्हर दाखवून ब्रिजवर फोन करायला सांगून यू एम एस मोड टाकायला सांगितला, त्याच्या नजरेत अशी जरब होती की थर्ड इंजिनीअर ने निमूटपणे त्याने सांगितलेले ऐकले.

मोटारमन ने थर्ड इंजिनिअर ला इन्सीनरेटर सुरु करायला सांगितला , त्याच्याकडे थर्ड इंजिनिअर ने प्रश्नार्थक नजरेने पाहिले खरे पण रक्ताळलेले लाल डोळे पाहून थर्ड इंजिनिअर इन्सीनरेटर कडे वळला, त्याने इन्सीनरेटरचे सर्व अलार्म बंद केले आणि सुरु केला हळू हळु इन्सीनरेटर चे तापमान वाढू लागले चारशे , पाचशे ,सहाशे , सातशे अंश सेल्सिअस चे रीडिंग डिजिटल इंडिकेटर वर दिसू लागले.

मोटारमनने चीफ इंजिनिअर चे प्रेत ओढत ओढत इन्सीनरेटर जवळ आणले. इंजिन रुम च्या एन्ट्रीसाठी असलेल्या जिन्यापासून ते इन्सीनरेटर पर्यंत फ्लोअरवर रक्ताचा सडा पडला होता. सहा फूट उंची असलेल्या चीफ इंजिनिअर चे प्रेत इन्सीनरेटर मध्ये घुसवणे शक्यच नव्हते. मोटारमन ने इलेक्ट्रिक ग्राईंडर च्या साहाय्याने प्रेताचे कमरेच्या वर कट घेउन दोन तुकडे केले तसे करताना ग्राईंडर च्या कापण्याने रक्ताचे अनेक थेंब ईकडे तिकडे उडाले.

प्रेताचे दोन्ही तुकडे एका मागोमाग एक टाकले प्रेत जळल्याचा उग्र वास आला. थर्ड इंजिनिअर अजूनही थरथरत होता. प्रेत पुर्ण जळल्याची खात्री झाल्यावर मोटारमन ने त्याला इन्सीनरेटर बंद करायला सांगितला. आता जे काही घडले त्याबद्दल एक शब्दही कोणाजवळ बोललास तर तुझीसुद्धा हीच अवस्था करेन असा सज्जड दम त्याने थर्ड इंजिनिअरला दिला. मी आता सगळी साफ सफाई करून येतो, तू निमूटपणे जाऊन झोप आता, असं थर्ड इंजिनिअर ला सांगुन त्याने वर पाठवले.

पोलिसांकडून आलेला हा थर्ड इंजिनिअरचा जबाब ऐकून जहाजावर एक स्मशान शांतता पसरली. सगळ्यांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली.

इन्सीनरेटर म्हणजे भस्मक ज्यामध्ये काही टाकल तर ते भस्म होणार. स्मशानात ज्या विद्युत किंवा गॅस वर चालणाऱ्या शवदाहिनी असतात त्या सुद्धा एक प्रकारच्या इन्सीनरेटर युनिट्सच असतात.

घरापासून लांब राहिल्याने माणसांची अवस्था कशी विचित्र होते ,रागावर नियंत्रण ठेवता आले नाही तर ते कोणत्या थराला जाऊ शकतात याचा प्रत्यय, काल रात्री कॅप्टन कडून ऐकलेला किस्सा दुसऱ्या दिवशी इन्सीनरेटर वर काम करताना एकसारखा डोळ्यासमोर उभा राहत होता.

— प्रथम रामदास म्हात्रे.
मरीन इंजिनिअर,
B.E.(mech), DME, DIM.
कोन , भिवंडी, ठाणे.

प्रथम रामदास म्हात्रे
About प्रथम रामदास म्हात्रे 186 Articles
प्रथम म्हात्रे हे मरिन इंजिनिअर असून मर्चंट नेव्हीमध्ये आहेत. ते एका ऑईल टॅंकरवर असतात आणिेील जीवनावर लेखन करत असतात..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..