संकल्प आणि विकल्प करणाऱ्या अंत:करण वृत्तीला शास्त्रात मन असे म्हणतात.तर निश्चय करणाऱ्या वृत्तीला बुद्धी असे म्हणतात.
वैचारिक परिपक्वतेचा परिणाम असतो निश्चय. अशा नि:संदेह शाश्वतेवर शिक्कामोर्तब म्हणजे बुद्धी.
एकदा आपला विचार असा सुनिश्चित असला की पुढचा टप्पा म्हणजे त्याची अभिव्यक्ती.
केवळ विचार उपयोगी नसतात ते प्रगट होणे आवश्यक आहे. समोरच्याला समजावून सांगणे किंवा त्या विचारांच्या आधारे वागणे या दोन अर्थाने हे प्रगटीकरण होत असते.
व्यक्ती त्याच वेळी निसंदिग्ध व्यक्त होऊ शकते ज्यावेळी त्याचे स्वतःचे विचार पूर्णपणे ठाम असतात. अशावेळी त्या विचारांच्या प्रगटीकरणाचे माध्यम असते वाणी.
शास्त्रात वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा अशा चार वाणींचे वर्णन केलेले असते.
या चार वाक् अर्थात वाणींची स्वामिनी या अर्थाने देवी बुद्धीला वागीश्वरी असे म्हणतात.
अशी देवी वागीश्वरी म्हणजे अभिव्यक्त होणारी बुद्धी ज्यांच्या चैतन्य शक्तीच्या आधारे प्रगट होते त्या आत्मरूप भगवान श्रीगणेशांना, त्या वागीश्वरी चे संचालक या अर्थाने वागीश्वरीश असे म्हणतात.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply