रवींद्र ने सांगितलेली प्रत्येक गोष्ट ताईच्या डोक्यात खोलवर गाडल्या गेलेल्या गोष्टींना चिथावणी देत होती. पुष्करणी, पाणी, भैरोबा, लहानसा जीव या गोष्टींनी तर तिला आतून पूर्णपणे हादरवून टाकले होते. तिच्या डोळ्यांसमोर एकदम ५० वर्षांपूर्वी च्या घडामोडी जशाच्या तश्या धावू लागल्या. तिला कळत नव्हतं रवी ला याच गोष्टींचा समावेश असलेले स्वप्न का पडत होते. पुष्करणी, पाणी त्याचाच तर संबंध होता या गोष्टींशी पूर्णपणे. ताईला आता रवी एका वेगळ्याच दृष्टीने दिसू लागला. जरी तो तिचा सख्खा भाऊ नव्हता तरी आयुष्यभर तिने रवीवर सख्ख्या भावा एवढेच प्रेम केले होते. त्याची काळजी घेतली होती आणि त्यांचं नातं हे खुप घट्ट, प्रेमाचं आणि बांधिलकी विणलेल होतं. तिच्या समोर अचानक युगानुयुगे पडलेलं कोडं उलगडल्या सारखं समोर आलं होतं. लहानपणी तिने अण्णांना रवी च्या अश्या पद्धतीने मिळण्या बद्दल विचारले होते, पण अण्णांनी तिला नशिबात जे लिहिले आहे ते घडणारच या तत्वावर गप्प केलं होतं शिवाय रवीला कधीही त्याच्या अशा प्रकारे आपल्याला सापडण्याचा पत्ता लागता कामा नये असेही बजावून सांगितले होते.
रवीच्या अशा मिळण्याचा पत्ता गावातल्या लोकांना लागला नव्हता कारण अण्णा होते पुजारी आणि संध्याकाळच्या वेळी अंधार पडल्यावर हा मुलगा अण्णांना सापडला होता त्यामुळे त्यावेळी तेथे कोणी असणं अशक्यच. पण गावात कळणारच की पुजाऱ्याच्या घरी बाळ आहे ते , तेही अचानक कसे आले, यावरही अण्णांनी तोडगा काढला होता. बायकोच्या बहीणीचा मुलगा आहे असे सांगून विषय निकालात काढायचा असे ठरले आणि गावातले त्याला फसलेही. पण त्याने मुख्य प्रश्न कधीच सुटणार नव्हता घरातल्या तिघांसाठी आणि तो म्हणजे हे बाळ कोणी आणून ठेवले तेथे आणि त्याला आपण घरी तर आणले पण पुढे काय? त्याचा सांभाळ आपण करायचा ? आपली परिस्थिती काही फार चांगली नाही, आपल्याला हे झेपेल का? उद्या याचे पालक जर आले शोधत तर काय उत्तर देणार आपण सर्वांना. सारेच अवघड होते. पण अण्णांनी त्याचा सांभाळ करायचे ठरवले आणि भैरोबा पाहून घेईल म्हणून ते बाळ आपल्यात सामावूनही घेतले. ताईला सगळ काही आठवत होतं आणि तिची चांगलीच तंद्री लागली होती पण रवींद्र च्या हाकेने ती मोडली.
“ताई….. ताई…. अगं ऐकत्येस ना? कुठे हरवलीस तू? लक्ष कुठे तुझं? ताई…….”, रवी तिला हाक मारत होता.
“अं…… हो…हो….ऐकत्ये ना मी, बोल तू, अण्णांची आणि आईची आठवण आली एकदम म्हणून जरा….” ताईने वेळ मारून नेली.
“हम्म मला पण अण्णांची कित्येकदा आठवण येते, आई न मी परवा पर्यंत होतो एकत्र पण अजूनही आई नाहीये आता हे मनाला पटतच नाहीये ग, असं वाटतंय की अत्ता आतून ओरडेल माझ्या नावाने, भात झाला का रे, गिळायला दे आता….” रवीने तिघांचे कप उचलत म्हटले.
“मला तर पाहता ही आलं नाही रे तिला शेवटचं…. म्हणजे जिवंत असताना, माझ्यासाठी खूप कष्ट केलेत दोघांनी, मला शिकवायचं म्हणून दिवसरात्र कष्ट केलेत अण्णांनी, भिक्षुकी करून आजूबाजूच्या गावात मुलांना वेद- मंत्र शिकवायला जायचे, भिक्षुकी साठी लांब जायचे असले तरी चालत जायचे का तर बैल गाडीला ५ पैसे द्यावे लागतील म्हणून, सगळं केलं ते मुलीला शिकवायचं यासाठी स्वतः नेहमी २ जोड धोतर आणि २ अंगरखे बस पण मुलीला वर्षाला निदान एक ड्रेस तरी मिळण्यासाठी त्यांची धडपड असायची. खूप कष्ट करून, स्वतः उपाशी राहून, वेळ पडली तर मला ओरडून त्यांनी मला घडवलं पण कधी हात नाही पसरले त्यांनी कधी कोणापुढे. आणि आई ने ज्या परिस्थितीत घर सांभाळले ते सांगायला शब्दच नाहीत माझ्याकडे. त्यांनी शिकवले म्हणून आज मी एक चांगले, सुखी आयुष्य जगू शकत्ये. आज आमच्या कडे काय नाहीये? सर्व काही आहे पण आई- अण्णा नाहीत याच फार वाईट वाटतं”, ताईने उठत आपले डोळे पुसले.
“तुम्ही बायका ना ,सदैव नुसतं रडगाणं सुरू असत तुमचं. तुला शिकायला तरी पाठवलं त्यांनी माझं काय? मला आजपर्यंत कितिदा त्यांनी गावाच्या बाहेर नेलंय सांग ना”, रवीने गॅस वर भाता साठी आधण ठेवत ताईला विचारले.
“अरे असं कसं बोलतोस तू की तुझ्या साठी काय केलं म्हणून? वाडी, शेत सगळं तर तूच सांभाळलेस की तू. जितकं त्यांनी माझ्यासाठी केलं तितकंच तुझ्यासाठी देखील केलंच की. उलट तुला त्यांचा सहवास जास्त मिळाला याचा मला कधी कधी हेवा वाटतो. हे सगळं तुझंच आहे की आता, मला यातलं काही नकोय, तुझं आणि माझं असं काही नाही माझं, सगळं तुझंच आहे आणि मी जरी मुलगी असले तरी यावर मी हक्क ही सांगणार नाही. आज मी एक सुखी, समाधानी आयुष्य जगत्ये त्यामुळे तुझ्या साठी जे सर्वस्व आहे, तू जे इतकी वर्षे राखून ठेवलंयस त्यात मी माझा हक्क सांगून तुझ्या कष्टांवर द्वेषाची सावली पडू देणार नाही. हे सगळ तुझं आहे आणि तुझंच राहील.” ताईने त्याला त्याच्या बोलण्यापासून परावृत्त करायचा प्रयत्न केला.
“ताई, उगाच ना विषयाला फाटे फोडूच नकोस, मी काय बोलतोय, तू विषय कुठे नेत्येस, काही संबंध तरी आहे का दोन्हीचा. आणि राहता राहिला प्रश्न या घराचा, वाडीचा, शेताचा तर हे काही माझं एकट्याच नाही आणि कधीची नव्हतं. मी काही लुबाडणाऱ्यातला नाही. आजकाल शहरात गेलेल्या लोकांचा हा एक ग्रह निर्माण होतो की गावचा भाऊ, काका, चुलता सगळं हडप करेल पण की तसा नाही हो, आणि सगळं घेऊन मी करू तरी काय, अगं एकटा आहे की, एकटाच राहणार आहे. काय करायचंय मला हे सगळं घेऊन, तू माझी मोठी बहीण आहेस, हे आपल्या दोघांचं आहे आणि शेवटपर्यंत दोघांचच राहील. आता मी विचारलं त्याच उत्तर दे, मला कधी गावा बाहेर जाऊ का नाही दिलं अण्णांनी?” रवी परत त्याच्या मुद्द्यावर आला.
“असं काही नाहीये रवींद्र की अण्णांना तुला बाहेर न्यायचं नव्हतं, खरंच असं नाहीये. त्या दोघांना तू नेहमी जवळ हवा होतास, त्याची काय कारणं असतील हे मला माहित नाही पण त्यांना वाटायचं की तू जवळ राहावंसं. आणि त्यांनी तुला सुद्धा बाहेर शिकायला किंवा कामासाठी पाठवायचे प्रयत्न केले नाहीत असही नाही. तुला आठवतंय का, अण्णा एकदा तुला घेऊन रत्नागिरीस गेले होते एका यज्ञा साठी ४ दिवस, पण तिकडे जाऊन तू तापाने फणफणला होतास. अण्णांना निघावं लागलं होतं तिकडून यज्ञ सोडून, तू २ दिवस तापाने अक्षरशः लालेलाल झाला होतास. येताना औषध आणलं तिकडच्या डॉक्टरांचं पण तुझा ताप काही उतरेना. शेवटी तुम्ही परत आलात घरी आणि चमत्कार घडावा तसा तुझा ताप अर्ध्या दिवसात गेला होता. अण्णांना फार चिंता लागली होती तुझ्या तब्येतीची पण अचानक ताप गेला आणि तेही अचंबित झाले. तिकडे तू असा काही गळफटला होतास की ज्याचं नाव ते पण इकडे आल्यावर एकदम टूणटूणीत झालास. हे जितकं चमत्कारिक होतं तितकंच काळजी करण्या सारखही होतं याचा प्रत्यय आम्हाला परत एका वर्षांनी आला. तू शाळेच्या सहलीला प्रतापगड ला गेला होतास तेही एकदिवसा साठी. पण त्यावेळी ही तुला ताप भरला होता आणि अख्खा दिवस तू बस मधे झोपून काढला होतास. तुझे शिक्षक दिवसभर तणावाखाली होते. ना तू काही खाल्लस ना काही बोललास. पण जसे तुम्ही परत आलात पुढच्या ३ तासात तू ठणठणीत झाला होतास. त्या घटने नंतर मात्र अण्णांना तुझी जास्त काळजी वाटायला लागली आणि मग मात्र त्यांनी तुझं गावा बाहेर जाणं बंद केलं. शेवटी बाप काळजी पोटी काही कठीण निर्णय घेतोच आपल्या मुलाच्या बाबतीत. त्यात त्याची चूक ती काय?” ताईने काही आठवणींना उजाळा देत रवींद्रची समजूत काढायचा प्रयत्न केला.
काही वेळ त्या स्वयंपाक घरात शांतता पसरली. ताई, रवींद्र आणि ते स्वप्न आता एका गूढ अशा वलयात सामावले गेले होते. काही गोष्टी का घडल्या त्यामुळे रवी ला आयुष्यभर गावात राहावं लागलं होतं. पण त्यामूळे त्याचं नुकसान झालं होतं का? की त्यातच त्याच्या आयुष्याचं खरं कारण दडलं होतं? या सगळ्याचं मूळ नक्की कुठवर रुजलं होतं हे कळणं त्याच्या साठी अत्यंत महत्वाचं होतं आणि त्यासाठीच तो आता त्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणार होता. तो आज रात्री एकटाच वाडीत जाणार होता कोणालाही न कळू देता.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply