कधी भेटशील का रे तू?
येशील तर सोनचाफा घेऊन ये,
मोगरा आणलास तर तो मोहर
आसमंत खुलून जाऊ दे..
कधी भेटशील का रे तू?
आलास तर रातराणी घेऊन ये,
तू गेल्यावर बहर तो रातराणीचा
तुझ्या जाण्याची खूण ओंजळीत अलगद उमलू दे..
कधी भेटशील का रे तू?
तुझ्या मिठीची आस अलवार अशी,
त्या मिठीत मला हलकेच मिटू दे
हलकेच मज तू तेव्हा टिपून घे..
कधी भेटशील का रे तू?
आलास तर केवडा गंधित घेऊन ये,
जातांना मी अलवार लाजेल
ते लाजणे तू तारकांत गुंफून घे..
कधी भेटशील का रे तू?
कितीक गोड आर्जव मी करावी,
आलास तर चाफ्याची फुले तू आणावी
घेता मला मिठीत दरवळ अधिक मोहरावी..
कधी भेटशील का रे तू?
वाट मी अशीच पाहावी,
अलवार चांदण बरसात
त्या चांदण्यात मी गंधाळावी..
कधी भेटशील का रे तू?
मोहात तुझ्या मी अलगद फसली,
बंध गोड मोहक तुझे अबोल जरी
वेल्हाळ मी अशीच एक वेडी बावरी..
कधी भेटशील का रे तू?
माझी आठवण तू अवचित काढावी,
बावरे मोहक क्षण धुंदीत अबोलसे
मोहक मधुर माझ्या शब्दांची तू सय जपावी..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply