भाषेबद्दल शिक्षकास पत्र (सुधारित) – (अब्राहम लिंकनची माफी मागून)
आदरणीय गुरुजी…
मला माहित आहे की या जगातील सर्वच भाषांचे साहित्य सकस आणि वास्तववादी नाही. माझ्या मुलालाही भाषेचे हे मर्म शिकण्याची गरज आहे. पण तुम्ही त्याला सांगा की प्रत्येक भाषेच्या हृदयाचे स्पंदन किती जीवनदायी असते. प्रत्येक मोहक भाषेमध्ये यथार्थ आश्वासक जीवन जगण्याची क्षमता असते. माझी इच्छा आहे की तुम्ही त्याला शिकवावे की त्याच्या मातृभाषेत मित्र बनण्याची अधिक शक्ती व क्षमता आहे. या गोष्टी शिकायला त्याला वेळ लागेल, मला माहीत आहे.
पण तुम्ही त्याला शिकवा की तुमच्या भाषेत कमावलेला एक पैसा हा रस्त्यावर सापडलेल्या विदेशी शंभर रुपयांच्या नोटेपेक्षा जास्त मौल्यवान आहे.
तुम्ही त्याला सांगा की इतरांच्या भाषेबद्दल मत्सराची भावना बाळगू नको. त्याच वेळी, उन्मुक्त हसताना सुद्धा आपल्या भाषेत सभ्यता जोपासणे हे किती महत्वाचे आहे हे सुद्धा त्याला शिकवा.
मला विश्वास आहे की तुम्ही त्याला सांगाल की इतरांच्या भाषेला धमकावणे आणि तिला तुच्छ लेखणे ही चांगली गोष्ट नाही. त्याने भाषा द्वेषा पासून दूर राहिले पाहिजे. त्याला शिकवा की प्रत्येक भाषा ही कुणा एका लेकराची मातृभाषा आहे,तिचा अपमान हा एका मातेच्या हृदयाचा सुद्धा एक अपमान आहे.
तुम्ही त्याला मातृभाषेतील पुस्तकं वाचायला सांगा, पण त्याच वेळी आकाशात विहार करणाऱ्या विविध आकार,विविध स्वरांच्या पक्ष्याची बोली त्याने ध्यानपूर्वक ऐकावी . भर उन्हात हिरव्यागार शेतातील फुलांवर बागडणाऱ्या प्रत्येक भाषेच्या फुलपाखरांना पाहण्याची त्याला आठवण करून द्या.
भाषा आणि शब्दांच्या यात्रेला जाणे किती पवित्र असते हे त्याला शिकवा. मला वाटते की या गोष्टी त्याच्यासाठी अधिक उपयुक्त आहेत.
मला मान्य आहे की शालेय दिवसातच त्याला हे शिकावे लागेल की परदेशी भाषेचे अनुकरण करून यशस्वी होण्यापेक्षा अपयशी होणे चांगले आहे. आधी त्याने मातृभाषेचा अंगीकार करावा व नंतर अनेक भाषेशी मैत्री करावी. कोणत्याही भाषेच्या बाबतीत अनेक लोकांचे अनेक अभिप्राय असतील,ते तुमच्या भाषेला गावंढळ म्हणतील, परंतु आपल्या मातृभाषेला चिकटून राहण्याचे कौशल्य त्याच्याकडे असले पाहिजे.
त्याला शिकवा की तुमच्या भाषांबद्दल दयाळूपणे वागणार्या परकीय लोकांशी नम्रपणे वागले पाहिजे.जे लोक तुमच्या भाषेबद्दल वाईट बोलतात त्यांच्याशी कठोरपणे वागले पाहिजे. इतर भाषांतील ज्ञान ग्रहण करताना आपल्या भाषेचा सर्वांगीण विकासासाठी त्याने चार गोष्टी शिकून घ्याव्यात.
त्याला समजावून सांगा की जंगलातील सर्व झाडांच्या भूमिगत मुळ्या प्रत्येक झाडाला जोडलेल्या आहेत.हे उदाहरण भाषांनाही लागू होते. बहुभाषिक असल्याने आपण प्रत्येक संकटाचा, वादळाचा सामना करू शकतो. बहुभाषा ज्ञानाची मशाल हाती घेऊन जंगलातील वाट सापडते.
जिभे वरील शब्दां मुळे दुःखाचे आनंदात कसे रूपांतर होऊ शकते हे त्याला सांगण्यास विसरू नका. आणि त्याला हेही सांगा की जेव्हा जेव्हा त्याला आपल्या देशाच्या, आपल्या कुटुंबाच्या आणि आपल्या भाषेच्या आठवणीने रडावेसे वाटेल तेव्हा त्याला रडायला लाज वाटू नये. त्याला परदेशी भाषेत हसायला शिकवा, पण त्याला हे पटवून द्या की मातृभाषेत रडायला त्याने कधीही संकोच करू नये. मला वाटतं त्याचा स्वतःच्या मातृभाषेवर आणि इतरांवरही विश्वास असायला हवा. तरच तो एक चांगला माणूस बनू शकेल.
हे माझे पत्र जरा लांबलचक झाले आहे. पण तुम्ही त्याला जितके जास्त सांगू शकता तितके त्याच्यासाठी चांगले होईल. आता माझा मुलगा खूप लहान आहे आणि खूप गोंडस आहे.
तुमचा
अब्राहम लिंकन
~ विजय प्रभाकर नगरकर
अहमदनगर – 414003
महाराष्ट्र
vpnagarkar@gmail.com
09657774990 / 09422726400
Leave a Reply