साम, दाम, दंड आणि भेद या आयुधांवर आधारित असलेलं राजकारण हे एका कालचक्रा प्रमाणे आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीचा ठपका पुसण्यासाठी राजाश्रय हे एक पूरक आणि पोषक साधन असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक राजमार्गाची कास पकडतात. खून, हाणा-मारी, बलात्कार, भ्रष्टाचारासारख्या अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारीने बरबटलेले एका मागून एक असे रोज नविन, नवखे नेते उदयास येऊन विविध पक्षांमध्ये वावरतांना दिसतात. राजकीय पक्षसुद्धा आपली ध्येय,धोरणे आणि नितीमुल्ल्यांकडे दुर्लक्ष करून केवळ सोयीस्कर राजकारणासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पक्षामध्ये प्रवेश देत असतात. मग काय, अशा प्रवृत्तीचे नेते एक मेकांवर शिरजोरी करतात. स्वार्थापोटी कुटनीती, सुड्बुद्धीचे राजकारण खेळतात. वाट्टेल ते करतात आणि स्वत:ची खुर्ची टिकवतात. शरीराने, माल्मत्तेने व धनाने वाढतात अन् वेळ पडल्यास निरपराधांचे बळी सुद्धा घेतात आणि सत्तारूढ होतात.वास्तविक राजकीय जीवनात असुशिक्षित, असुशील व गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले नेते, ज्यांना समाजसेवेची ओढ,आवड अथवा समाजाशी कसलीही बांधिलकी नाही आणि जनतेच्या अडी-अडचणी,दैनंदिन समस्या,सामाजिक प्रश्नांची जाण व समज नसलेले नेते जनतेचे नेतृत्व करण्यास लायक असतील का?
आजच्या नेत्यांना देशाच्या, राज्याच्या व जनतेच्या कृषी विषयक, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, रोजगारी, स्वयंरोजगार, हिंसाचारी, गुन्हेगारी, आत्महत्या सारख्या जटील समस्यांबाबत काही पडलेले नाही किंवा त्यावर उपाय-योजना,तजवीज किंवा विचार करायला कुणालाही वेळ नाहीच नाही पण त्यांची इच्छाशक्तीही नाही.त्यांची वृत्ती प्रभोधनकारी नसून प्रलोभनकारी झालेली आहे. उदा. चारा घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, आदर्श घोटाळा, २जि स्पेक्ट्रम घोटाळा, तेलगी घोटाळा अश्या अनेक घोटाळ्यांतून प्रलोभने दिसून येतील. जो तो स्वार्थ व खुर्चीच्या शोधात आहे. जनतेची सामाजिक व विधायक कामे करण्याकडे कुणाचा कल अथवा मानस दिसत नाही.जनता हैराण,परेशान झालेली आहे.शेतकरी कर्जबाजाराने बेजार होऊन आत्महत्या करत आहेत.आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांनासुद्धा त्यांच्या न्यायिक मागण्यांकरिता रस्त्यावर उतरून आंदोलने करावी लागतात. आंतरराष्ट्रीय बाजारात देव-देवतांच्या दुर्मिळ मुर्त्यांना मागणी असल्याने आता तर मंदिरांमधून देव-देवतांच्या मुर्त्या, दाग-दागिने, दानपेटीतील पैशांची चोरी सुद्धा दरोडेखोर करू लागलेत. त्यामुळे कायदा व सुव्यावस्थेची उणीव मानवा बरोबरीने देवांनासुद्धा भासू लागलीय. सत्ताधाऱ्यांनी एकदा का मनात आणलं तर धर्माच्या, जातींच्या नावांवर होणारे दंगे, दहशतवाद, आतंकवाद, मोडून काढता येतील आणि अश्या प्रकारची कृत्य करण्याची कुणाची हिम्मत होणार नाही.परंतु सोयीस्कर राजकारणासाठी अशाप्रकारच्या सर्व भानगडींकडे असलेलं राजकारण्यांचं दुर्लक्ष,कृपादृष्टी तसेच त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे अश्याप्रकारच्या कृत्यांना खतपाणी मिळून एक प्रकारे सर्वसामान्य जनतेची आर्थिक, मानसिक व शारीर िक पिळवणूकच केली जात आहे असे जर कुणी म्हटले तर वावगे ठरेल का?. म्हणून राजकारणात गुन्हेगारांच्या प्रवेशामुळे राजकारणातील गुन्हेगारी वाढू नये म्हणून गुन्हेगारी प्रवृत्तीला लगाम लावून राजकारणातील गुन्हेगारीची नाकाबंदी करण्यासाठी खालील उपाय सूचित करावेसे वाटतात.
१.कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा निवडणूक आयोगाने कोणत्याही राजकीय पदांच्या निवडणूकीच्या उमेदवारीसाठी कमीतकमी १०वी उत्तीर्ण अटीसहित पोलिसांकडून त्याच्या ‘चांगल्या चारित्र्याचा दाखला’ सादर केल्या शिवाय त्यांची निवडणूक उमेदवारी जाहीर करून उमेदवारीला मान्यता देऊ नये.
२.राजकीय आंदोलनातील गुन्हे वगळता इतर भ्रष्टाचार, बलात्कार, चारित्र्य हनन, सामाजिक दंगे, सदोष मनुष्यवध, हाणा-मारया, चोरी, दरोडे, शारीरिक अपहरण, आर्थिक अफरातफर व घोटाळे आदींसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांचे दोषारोप असलेल्यांना आणि त्यातून निर्दोषत्व सिद्ध झाल्याशिवाय आणि/किंवा अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सजा भोगलेल्या कोणत्याही इसमांना राजकारणात प्रवेश देऊ नये.त्यांच्या राजकारणातील प्रवेशाच्या नाकाबंदिसाठी निवडणूक आयोगाने तसा सक्तीचा मनाई कायदा करावा.
३.मतदारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना निवडून देऊ नये.उमेदवार निवडतांना उमेदवाराचे चारित्र्य, स्वभाव, केलेलं कामकाज व कार्यक्षमता वगळता त्याची जात, प्रांत आणि धर्माशी नातेसंबंधित बांधिलकी ठेवून मतदान करू नये जेणेकरून चुकीचा उमेदवार निवडून येणार नाही.यासाठी मतदारांमध्ये प्रभोधन करणे आवश्यक आहे.
४.राजकीय निवडणुकीत प्रचारा दरम्यान आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये उमेदवाराला स्वतंत्रपणे खर्च करू देऊ नये. यासाठी होणारा आवश्यक खर्च उमेदवाराने निवडणूक आयोगाकडे जमा करावा व उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी निवडणूक आयोगाने घ्यावी जेणेकरून उमेदवाराचा निवडणुकीवर पर्यायाने मतदारांवर होणारा अफाट पैशांचा वापर होणार नाही आणि झालेला अफाट खर्च वसूल करण्यासाठी निवडून आलेला उमेदवार भ्रष्टाचाराचा मार्ग अवलंबणार नाही.
ज्यांना समाजकारणाची, राजकारणाची आवड आहे. ज्यांना समाजासाठी काहीतरी करायचे आहे. परंतु त्यांना व्यासपीठ मिळत नाही,अशा महत्वाकांक्षी सुशिक्षित व चारित्र्य संपन्न असलेल्या लोकांनाच राजकारणात सामावून घेतलं पाहिजे. पण असे होतांना दिसत नाही. कारण सुशिक्षित व स्वच्छ चारित्र्याचे लोक आपल्याला वरचढ होऊ नयेत म्हणून धूर्त व गुन्हेगारी प्रवृत्तीचे राजकारणी अशा लोकांना बाजूला व लांब ठेवतात.त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या राजकारण्यांना आता सुज्ञ मतदारांनी घरीच बसविले पाहिजे. त्यांच्या कोणत्याही अमिषाला बळी पडून त्यांना निवडून देऊ नये.असे जर झालं आणि सुशिक्षित व स्वच्छ चारित्र्य संपन्न असलेले तरुण व तरुणी जर प्रत्यक्ष राजकारणात आले तर धोरणात्मक दूरदृष्टी, निर्णायक क्षमता व प्रबळ इच्छाशक्ती असलेलं सक्षम तरुण नेतृत्व महाराष्ट्राला व देशाला मिळेल आणि आपल्या खालील अपेक्षा पूर्ण होतांना दिसतील;
१) भ्रष्टाचार, हिंसाचार, बेकारी-बेरोजगारमुक्त महाराष्ट्रासहित भारत देश पहायला मिळेल;
२) महिला, शेतकरी व आत्महत्याग्रस्तांच्या विधवा, कामगार, मजदूर, परिवहन, रिक्षा-टक्सी वाहक, व्यापारी, विध्यार्थी, यांना संरक्षण, न्याय व हक्क मिळावेत म्हणून हिंसा अथवा अहिंसेच्या मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलने करावी लागणार नाहीत.
३) महाराष्ट्रातील जनतेला भेडसावणाऱ्या अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, विद्युत, संरक्षण यासारख्या ज्वलंत समस्यांच्या व अडचणींच्या मुळापर्यंत जाऊन त्या सोडविण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न होतांना दिसतील;
४) महाराष्ट्रासहित भारत देश संपूर्णतः साक्षरप्रधान होण्यासाठी,शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी, महाराष्ट्राच्या/देशाच्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन व शुशोभीकरण करण्यासाठी, महाराष्ट्र व देशातील पर्यटन स्थळे निर्माण करण्यासाठी व पर्यटन स्थळांना भेट देण्याऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्णायक व महत्वाची पावले उचलली जातील;
आणि मगच या सर्व सोयी-सुविधांनीयुक्त २१व्या शतकाकडे वाटचाल करत असलेला महाराष्ट्रासहित संपूर्ण भारत देश ‘राष्ट्रगीतात’ वर्णन केल्याप्रमाणे सुजलाम, सुफलाम व समृद्दीमय होऊन, आपला देश जगातील महासात्ताधीश झालेला आपल्याला पाहायला मिळेल यात तीळ मात्र शंका नाही.
सुभाष रा. आचरेकर, वांद्रे(पूर्व), मुंबई-५१.
ई-मेल:
— सुभाष रा. आचरेकर
Leave a Reply