महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांचा जन्म १० जानेवारी १९०० रोजी झाला.
पाचेक वर्षांपूर्वी त्यांच्या मूळगावी स्मारक उभारण्याची चर्चा सुरू होती. यासंबंधीची फाईल मंत्रालयात अडकली होती. यावर विचारणा करायला गेलेल्यांना अधिकाऱ्यांनी सवाल केला, कोण बरं हे कन्नमवार? यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर मारोतराव कन्नमवार उपाख्य दादासाहेब कन्नमवार यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सांभाळलं.
सरकारी कर्मचाऱ्यांची सोय व्हावी म्हणून त्यांच्या काळातच मुंबईतल्या विक्रोळीत वसाहत उभारण्यात आली. तो सगळा भाग आता कन्नमवार नगर म्हणून ओळखला जातो.
विदर्भातले ते एक लोकप्रिय नेते होते. तुकडोजी महाराजांच्या नेतृत्वात ते चले जाव आंदोलनात आघाडीवर होते. ते १९५२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मूळसावली मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे पहिल्यांदा आमदार झाले.
दळणवळण, सार्वजनिक बांधकाम आणि आरोग्य खाती (महाराष्ट्र राज्य). आरोग्य (१९५२ ते १९६० मध्य प्रांत) त्यांनी सांभाळली होती. १९६२ च्या युद्धानंतर यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले. त्यानंतर कन्नमवार यांच्याकडे महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद आलं. त्यांच्या आवाहनावरून १९६२ च्या युद्धात देशाला मदत म्हणून चंद्रपूरकरांनी मुंबईनंतर सर्वाधिक सोनं गोळा केलं होतं. २०-११-१९६२ ते २४-११-१९६३ या काळात मुख्यमंत्री पदावर राहिले.
मुख्यमंत्री पदावर असताना राष्ट्रीय संरक्षण निधी उभारणे, कापूस एकाधिकार योजना या क्षेत्रात त्यांनी भरघोस कामगिरी केली. मुख्यमंत्री पदावर असतानाच मारोतराव कन्नमवार २४ नोव्हेंबर १९६३ रोजी निधन झाले.
ते एवढे नि:स्पृह आणि निष्कलंक होते की, त्यांनी मंत्रीपदाचा वापर करून मालमत्ता कमावलेली नव्हती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर उपजीविका कशी करावी, असा प्रसंग आला. असे सांगतात की, त्यांच्या पत्नी माई कन्नमवार यांनी उपजीविकेसाठी नागपूरमध्ये चहाची टपरी सुरू केली होती.
कन्नमवार यांच्या स्मारकाचे लोकार्पण या वर्षी ४ एप्रिल २०१९ रोजी करण्यात आले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply