जे न देखिले कैसें
तया मानून सत्य जैसें
मते बनूनी चर्चा करीतसे
पारावरी मर्कटे!!
अर्थ–
भिंतींनाही कान असतात म्हणे, जरा हळू बोलावे असे म्हणणारे पेपर मधे कोण ड्रग्स घेतो, कोण पैसे खातो, कोण कोणाच्या आड येतो या विषयांवर मात्र संध्याकाळी पारावर बसून जोरदार भाषण देत असतो. मुळात आरोपी आणि दोषी यातला फरक जो पर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत हे चर्चा सत्र असेच चालत रहाणार.
कोणाविषयी काही ऐकले की आपण त्याची शहानिशा न करता त्या व्यक्तीला दूषणे देऊन आपल्या कडून त्याला शिक्षा देऊनही टाकतो. पण जर कधी आपल्या मित्राकडून किंवा नात्यातल्या व्यक्तीकडून आपल्या बद्दल काही वेडेवाकडे बोलले गेले तर मात्र आपण एकदा खरं काय आहे ते जाणून घ्यायचेस अथवा कोणावरही विश्वास ठेवून माझ्या बद्दल काही मत करून कसे घेतलेस? असे ठोकून बोलतो.
मत ठरवणे आणि मत व्यक्त करणे यात खूप मोठी भिंत असते. स्वतः पाशी मत ठरवून ते मनात ठेवणे केव्हाही योग्य पण तेच उघड्यावर चारचौघात बोलणे त्यावरून वाट्टेल ते बोलणे आणि सर्वात महत्वाचे वृत्तपत्र या गोष्टीलाच प्रमाण मानूणे हे साफ चुकीचे आहे.
माकडाचा माणूस जेव्हा झाला तेव्हा माकडांच्या काही सवयी या पूर्णतः संपुष्टात आल्या. पण अजूनही काही अंशी माकड हे माणसात दिसून येते आणि त्यातले आपण नाही ना? हे असे काही वागताना स्वतः स पुसणे महत्वाचे आहे.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply