व्याकुळल्या भावनांना काव्याचा
मोहर हलकेच अंतरी फुलला
तो बहर अवचित गंधित तुझा
अन जीव माझा धुंद झाला..
ती सांज ओढ कातर क्षणाची
जीव तुझ्यात नकळत धुंदावला
आरक्त लोचनात थेंब अश्रूचा
अलगद दुःख मिटवून गेला..
का बहरल्या दग्ध चेतना
प्राजक्त हलकेच होरपळला
न फुलल्या कळ्या काही
वेदना मनात अबोल उरल्या..
काव्यांचे प्रेम शब्दांवर सजले
काव्यांत जीव आल्हाद गुंतला
हा वडनवाळ उध्वस्त एकाकी
भावना करपून खेळ संपला..
ही कातर संध्या गूढ अशी
देहाचा पाला पाचोळा झाला
आलास तू जीवनात अनामिक
अबोध वाटा तुझ्यात हरवल्या..
न उमलले फुल गंधित मोहित
पश्चिमेचा वारा स्तब्ध झाला
गेले दुःख अलगद मनात रडवून
मंद दिव्याचा पेट शांत फडफडला..
सुकल्या रातरणीचा आवेग
सकाळी न बहर कुठला राहिला
रात्रीच्या डोहात अचेतन भाव
गर्भित मन देही होम पेटला..
का मीच जळते वणव्यात एकाकी
काहूर पेट अंतरी निःशब्द जाहला
कसली शिक्षा ही अबोध क्षणांची
व्याकुळ भाव माझा व्यक्त अधुरा..
सरली सांज केशरी आकाश न्हाली
क्षितीजाच्या छटा अनामिक भासल्या
काळोखात जीव अस्वस्थ अबोल
दुःखाचा कढ व्यापून आयुष्य उरला..
सांज केशरी भेसूर भयावह ही
आकाशी काळोख तमेचा उरला
कुणी पांथस्थ आला अवचित
मोह त्याचा हृदयस्थ रडवून गेला..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply