या अमूल्य ग्रंथाच्या शताब्दीवर्षात त्या संबंधीच्या काही आठवणी व त्यातून दिसणारे या थोर व्यक्तिमत्त्वातले काही दिव्य कंगोरे याचे चिंतन उचित ठरेल. जेव्हा लोकमान्यांवर राजद्रोहाचा खटला लादला गेला व ब्रिटिश सरकार कसेही करून जबर शिक्षा ठोठावून त्यांना देशापासून दूर पाठवील, हे दिसू लागले त्यावेळी त्यांची काही हितचिंतक मंडळी शेगाव (जि. बुलढाणा) येथील संत श्री गजानन महाराजांच्या दर्शनास गेली व लोकमान्य निर्दोष सुटावेत म्हणून त्यांनी महाराजांना प्रार्थना केली. खरे तर पूर्वी महाराजांच्या अध्यक्षतेखाली लोकमान्यांची एक जाहीर सभा शेगाव येथे झाली होती. त्यावेळी लोकमान्यांनी ब्रिटिश सरकारवर घणाघाती जाहीर टीका केली होती. मागे बसलेले श्री गजानन महाराजही या प्रखर वक्तृत्वाने अस्वस्थ झालेले होते. त्यावेळी जवळच्या माणसांना ते म्हणाले होते, ‘‘अशाने काढण्या पडतील!’’ काडण्या म्हणजे गुन्हेगारांना त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे दंडांना दोर्या बांधून न्यायालयापर्यंत नेणे. त्याला काढण्या म्हणत. झालेही तसेच. थोड्याच दिवसांत टिळकांना अटक करून सरकारने राजद्रोहाचा खटला सुरू केला. ज्यावेळी लोकमान्यांचे हितचिंतक महाराजांची कृपा मागण्यास गेले त्यावेळी महाराज म्हणाले,‘‘टिळकांना जबर शिक्षा होणार हे नक्कीच. पण त्यातून त्यांच्या हातून एक दिव्य दैवी कार्य साकारणार आहे, ही दैवी योजना आहे!’’ ‘गीतारहस्या’ची अशी ही भविष्यवाणीच महाराजांच्या तोंडून नियतीने वदवली होती.
१९०८ साली लोकमान्यांना बरोबर एक ब्राह्मण बंदिवान आचारी श्री. कुलकर्णी बरोबर देऊन मंडालेच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. पुढे २ नोव्हेंबर १९१० ते ३० मार्च १९११ या काळात टिळकांनी एकूण चार वह्यांत पेन्सिलने लिहून ‘गीतारहस्य’ लिहून पूर्ण केले. त्यासाठी वेळोवेळी त्यांनी पुण्याच्या आपल्या गायकवाडवाड्यातून संदर्भासाठी वेगवेगळे ग्रंथ मागवून घेतले. ८ जून १९१४ साली लोकमान्यांची ६ वर्षांची शिक्षा संपवून मुक्तता झाली व ते पुण्यात आपल्या वाड्यावर परतले. सुटकेपूर्वी नियमानुसार तुरुंगाधिकार्याने गीतारहस्याचे चार वह्यांत लिहिलेले हस्तलिखित त्यांना दिले नाही व नंतर देण्याचे सांगून त्यांची रवानगी सरकार दरबारी व्हायची आहे असे सांगितले.
पुण्यात परतल्यावर कित्येक आठवडे वाट पाहून ‘गीतारहस्या’च्या हस्तलिखित वह्या सरकारकडून परत मिळण्याची चिन्हे दिसेनात व सरकारच्या हेतूबद्दल सर्वसाधारण चिंता बरोबरची मंडळी व्यक्त करू लागली. काहींनी टिळकांना बोलूनही दाखवले की,‘‘सरकारचे लक्षण काही ठीक दिसत नाही. वह्या परत न करण्याचा इरादा दिसतो.’’ कोणाच्या तोंडून असे निराशाजनक उद्गार निघाले की लोकमान्य म्हणत,‘‘भिण्याचे काही कारण नाही. वह्या सरकारच्या कब्जात असल्या तरी ग्रंथ माझ्या डोक्यात आहे. फुरसतीच्यावेळी सिंहगडावर बसून जशाच्या तशा लिहून काढीन!’’ ही आत्मविश्वासाची तेजस्वी भाषा उतरवयातील म्हणजे अगदी साठीच्या घरात असलेल्या वयोवृद्ध गृहस्थाची आहे. अन् ग्रंथ किरकोळ नसून गहन तत्त्वज्ञानविषयक आहे. यातून लोकमान्यांच्या प्रयत्नवादी प्रवृत्तीची यथार्थ कल्पना येते. सिंहगडावर सरनाईक या गृहस्थांकडून लोकमान्यांनी त्यांचा वाडा विकत घेतला होता. उन्हाळ्यात टिळक कुटुंबासह सदर वाड्यात हवाबदलीसाठी राहत. आजही सिंहगडावर सदर बंगला सुस्थितीत आहे व टिळकांच्या कुटुंबियांचे ते अधूनमधून विश्रांतीस्थान म्हणून वापरले जाते. सदर बंगल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मा. गोळवळकर गुरूजी हे विश्रांतीसाठी राहून गेले आहेत. आजही सदर बंगला सुस्थितीत व वापरात आहे.
लोकमान्यांच्या ग्रंथाच्या प्रस्तावनेत एकूण ग्रंथाचे वर्णन हेतू स्पष्ट केले आहे. हिंदू जीवनज्ञान व धर्मभाव शीर्षकाने ‘श्री भगवद्गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र’ अशी सुरवात करून ‘गीतेचे बहिरंग परीक्षण, मूळ संस्कृत श्लोक, मराठी भाषांतर, अर्थ अशी विषयावर माहिती दिली आहे. प्रस्तावनेच्या शेवटी ग्रंथाच्या प्रयोजनाविषयीचे लिखाण – हे लिखाण साधण्यास सव्याज नाही पेक्षा निदान जसेच्या तसे पुढील पिढीतील लोकांस देण्यासाठीच आम्हास प्राप्त झाले असल्यामुळेच वैदिक धर्मातील राजगुह्य हा परीस ‘‘उत्तिष्ठत्! जागृत! प्राप्य वरान्निबोधत!’’ उठा, जागे व्हा! आणि (भगवंतानी दिलेले) हे वर समजून घ्या या कठोपनिषदातील मंत्राने प्रेमपूर्वक आम्ही होतकरु वाचकांच्या हवाली करतो. यातच कर्माकर्माचे सर्व बीज आहे आणि या धर्माचे सत्याचरणही मोठ्या संकटातून सोडवते, असे खुद्द भगवंताचेच निश्चयपूर्वक आश्वासन आहे. यापेक्षा आणखी काय पाहिजे? केल्याविना होत नाही हा सृष्टीचा नियम लक्षात आणून तुम्ही निःष्काम बुद्धीने कर्ते व्हा, म्हणजे झाले. निव्वळ स्वार्थपरायण बुद्धिने संसार करून थकल्याभागल्या लोकांच्या कालक्रमणार्थ किंवा संसार सोडून देण्याची तयारी म्हणून ही गीता सांगितलेली नसून संसार मोक्षदृष्ट्या कसा केला पाहिजे, मनुष्यमात्रांचे संसारातले खरे कर्तव्य काय याचा तात्विकदृष्ट्या उपदेश करण्यासाठी गीताशास्त्राची प्रवृत्ती झालेली आहे. म्हणून पूर्ववतच गृहस्थाश्रमाचे किंवा संसाराचे हे प्राचीन शास्त्र जितक्या लवकर समजून घेणे शक्य असेल तितक्या लवकर प्रत्येकाने समजून घेतल्याखेरीज राहू नये एवढी आमची शेवटची विनंती आहे.
– बाळ गंगाधर टिळक, पुणे वैशाख श. १८३०
शेवटी टिळकांच्या मंडाले येथील सहा वर्षांच्या वास्तव्यातील एक त्यांचा जीवनावश्यक दृष्टीकोन दाखवणारा प्रसंग लिहून हा लेख संपवतो. सहा वर्षे लोकमान्यांबरोबर श्री. कुलकर्णी हे त्यांचा स्वयंपाक करणारे आचारी होते. ते स्वतः बंदीवान होते व सरकारनेच त्यांना टिळकांच्या भोजन व्यवस्थेसाठीच नियुक्त केले होते. एके दिवशी श्री. कुलकर्णी तापाने फणफणले असतानाही टिळकांसाठी स्वयंपाक सिद्ध करायच्या कामात होते. अत्यंत प्रेमळ व सूक्ष्म दृष्टीच्या लोकमान्यांच्या ही गोष्ट लक्षात आली. ते म्हणाले,‘‘कुलकर्णी चांगलाच ताप आहे, तुमच्या अंगात. हा ज्वर फार वाईट असतो. आज सायंकाळचे सारे मीच पाहतो. तुम्ही जाऊन पूर्ण विश्रांती घ्या, मला स्वयंपाकाचा कंटाळा नाही!’’ यावर कुलकर्णी म्हणाले,‘‘महाराज तुम्ही एवढा मोठा ग्रंथ लिहिताय, त्यात व्यत्यय येईल ना!’’
‘‘छान, कुलकर्णी छान! अहो तुम्हाला आजारी स्थितीत तसेच सोडून जर मी ‘गीतारहस्य’ ग्रंथ लिहू लागलो, तर भगवंतानी अर्जुनाला गीता सांगण्याचा खटाटोप व्यर्थच केला म्हणायचा!’’ या लोकमान्यांचे स्वयंपाकी कुलकर्णी यांनी त्यांच्या सहा वर्षांच्या वास्तव्याबद्दल आठवणी लिहिल्या आहेत. त्यात त्यांनी लोकमान्यांची प्रेमळ तथा धिरोदात्त व्यक्तिमत्त्वाचे पुष्कळ प्रसंग नोंदवून ठेवले आहेत. अभ्यासूंनी ते जरूर वाचावेत.
(दैनिक नवप्रभा, गोवा, च्या सौजन्याने)
— श्री.ग ना कापडी
Leave a Reply