सचिन निवृत्त झाला आणि मी क्रिकेट सामने बघणे सोडले होते, पण कोरोना काळात घरबसल्या “इन्साईड एज ” मुळे पुन्हा पाहण्याकडे वळलो.
लहानपणी सहावी-सातवीत क्रिकेट खेळण्याची लत लागली आणि ती बऱ्यापैकी नववीपर्यंत सुरु होती. ताराम्बळे वर्गाचा कप्तान आणि मुळे उपकप्तान. मी लिंबूटीबू. सुरुवात वर्गाच्या सामन्यांचा स्कोअर बोर्ड लिहिण्यापासून झाली आणि मग मैदानात शिरलो. त्याच आसपास इंग्रजीतील समालोचन ऐकण्याची चटक लागली. फारसे कळत नसले तरीही झिंग चढायची. प्रसन्ना-बेदी -चंद्रा त्रिकुट भुरळ घालायचे. वाडेकर/गावस्कर यांचा उदय झाला होता आणि गावस्करने आमचा आदर्श बनण्याकडे वाटचाल सुरु केली होती. गुंडाप्पा विश्वनाथ, वेंकट, श्रीकांत, फारूक हे सगळे गळ्यातले ताईत बनले होते आणि दैनंदिन गप्पांचा विषयही.
एवढ्या पुण्याईवर गल्लीची क्रिकेट टीम काढायची कल्पना पुढे आली तेव्हा आपोआप अस्मादिकांची निवड कप्तान म्हणून झाली- वासरात लंगडी गाय !
मग सुट्टीच्या दिवशी रेल्वेच्या मैदानात मॅचेस, त्याआधी वर्गणी काढून क्रिकेट साहित्य. मॅच नसेल तेव्हा शेजारच्या (दिवसेंदिवस बंद असलेल्या) “पाटील-तलाठी मुलकी चावडीत ” केव्हाही प्रॅक्टिस सुरु. एकदा बॅटने भिरकावलेला चेंडू रस्त्यावरून येणाऱ्या मुच्छड पाटलांवर जाऊन आदळला आणि आमची पळता भुई थोडी झाली. घरापर्यंत गाऱ्हाणे गेली आणि पर्यायाने गल्ली क्रिकेट बंद.
शाळेतल्या मॅचेससाठी शाळेच्या मैदानाला पर्याय नसे. पण त्या अधून-मधून असायच्या. मग गल्ली क्रिकेट जिंदाबाद ! शेजारच्या गल्लीची खुमखुमी जिरवायची आम्ही संधीच शोधत असू. ती मॅच एक रुपया किंमतीची असायची- तोही रुपया आम्ही प्रत्येकी दहा पैसे गोळा करून जमवलेला असे. मॅच हरली की तो रुपया शेजारच्या विजेत्या संघाला जड अंतःकरणाने मी द्यायचो. त्याहून वाईट आणि अपमानास्पद म्हणजे कप्तान म्हणून मला त्या संघाच्या स्कोअर वहीवर “पराभूत कप्तान ” अशी सही करावी लागत असे. मग मैदानावरून घरी परतताना प्रत्येकाच्या परफॉर्मन्सचे पोस्टमॉर्टेम व्हायचे.
क्रिकेट हाच एकमेव मैदानी खेळ मी खेळलोय, पण नंतर मैदान सुटले कारण मॅट्रिक वगैरे ! हळूहळू टीव्ही च्या पडद्याला चिकटलो. माळेगावला असताना पहाटे तीन-चार वाजता कारखान्याच्या शिंदे साहेबांकडे मी, शितोळे,डेंगळे मॅच बघायला जात असू. कालांतराने १९८८ च्या सेऊल ऑलिंपिक्स साठी घरातच टीव्ही आला आणि क्रिकेटवेड आणखी वाढले. दरम्यान सुनीलवरून दैवत सचिनकडे सरकले. गांगुली,राहुल,अनिल,धोनी अशांची उदाहरणे लीडरशिप प्रशिक्षणात मी देऊ लागलो.प्रत्येकाच्या नेतृत्व गुणांचा अभ्यास करू लागलो. वाटेवर कधीतरी पॅकर सर्कस आली आणि तत्कालीन गदारोळाचा मला अभिमान वाटला होता. मॅच फिक्सिंग च्या आरोपांमुळे अझर आणि जडेजा यांनी माझ्यासारख्या समस्त क्रिकेटभक्तांना शरमेने मान खाली घालावी लागली. सगळ्या गदारोळातून दोन अंगुळे आजही वर राहिला आहे तो सचिनच – म्हणून त्याची देव्हाऱ्यात स्थापना ! बाकी आजकालच्या एकाही खेळाडूचे नांव मला माहित नाही आणि त्यांच्या खेळाबद्दल मला काहीही बरेवाईट माहित नाही.
आजवर एकही सामना प्रत्यक्ष पाहिला नसला तरीही “ इन्साईड एज “या वेबसीरीज च्या दोन सीझन्सच्या निमित्ताने घरबसल्या पीपीएल (आय पी एल च्या धर्तीवर) चा दृश्यानुभव घेतला. एकेकाळी “जंटलमेन्स “गेम म्हणून प्रसिद्ध असलेले क्रिकेट दुसऱ्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये “लेट द बेस्ट विन ” या तुरटीच्या खड्याकडे येऊन संपते तेव्हा मनःपूत श्वास सोडावासा वाटला.
अन्यथा “इन्साईड एज” म्हणजे पडद्याआडचे राजकारण, अंमली पदार्थांचा सरळसोट पुरस्कार, प्रेम या अशारीर/पवित्र भावनेचे शक्य तितके ओंगळ प्रदर्शन, राजकारणी लोकांचे निर्लज्ज वर्तन, बुकी/बेटिंग च्या माध्यमातून होणारा पैशांचा काळाबाजार वगैरे वगैरे ! नाहीतरी आय पी एल मुळे आमच्या लाडक्या खेळाडूंचा होणारा लिलाव, त्यांचे ” विकले ” जाणे आम्ही सहन केले होतेच.
म्हणूनच “इन्साईड एज” च्या तिसऱ्या सीझन ची वाट पाहतोय. बघू या, माझा आवडता खेळ अजून किती घसरलाय ते !
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply