९४-९५ साल असावं. आम्ही नुकतेच पुणे मुक्कामी कायमच्या निवासासाठी डेरेदाखल झालो होतो. माळेगांव आणि इस्लामपूर मधील सांस्कृतिक उपासमार (१९८४-१९९३ कालावधीतील) भरून काढण्याचा सपाटा सुरु केला होता. त्यांत पुन्हा के एस बी मध्ये पाच दिवसांचा आठवडा ! मग वीकेंड सेलिब्रेशन्स जोरात.
एकदा माझ्या पत्नीच्या मनात आले आणि तिने शांताबाईंना सहज फोन केला. आम्ही बिबवेवाडीत तर त्या मुकुंदनगरमध्ये राहात होत्या. पूर्व परिचय शून्य. त्या आधारावर माझ्या पत्नीने त्यांना आमच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले.
कोठलेही आढेवेढे न घेता एका शनिवारच्या दुपारी साडेतीन -चार ला त्या आमच्या घरी दाखल. पहिल्या मजल्यावरचे घर-त्यामुळे १०-१२ पायऱ्या चढून आल्यावर (त्यातून उन्हातून आल्याने) त्यांना थोडी धाप लागली होती. आल्यावर पाणी वगैरे पिऊन त्या थोड्या विसावल्या. पत्नीने पोह्यांबद्दल विचारले. त्या हक्काने म्हणाल्या- ” आधी थोडा चहा टाक. मग सावकाश गप्पा मारून झाल्यावर पोहे खाऊ आणि निघताना मी आणखी चहा घेईन.”
नंतरचा दीड तास गप्पांची दिलखुलास मैफिल- कित्येक विषयांवर, माझ्या शाळकरी मुलालाही त्यांत अलगद सामावून घेत ! कोठेही बडेजाव नाही, फटकून वागणे नाही, पथ्य /आवडी-निवडीचे अवडंबर नाही.
काव्याइतकेच नितळ,प्रवाही,खळाळते व्यक्तिमत्व. अतिशय निरागस हसणे. काव्यशास्त्रविनोदेन वेळ मस्त गेला.
चहा-पोहे-चहा असे आवर्तन झाले आणि त्या परतल्या.
परवा शांताबाईंच्या जन्मशताब्दीची सुरेल मैफिल ऐकताना माझ्या मनात ही भेट सतत रिंगण घालत होती.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply