दोन शाळा आणि दोन महाविद्यालयांमध्ये माझे शिक्षण झाले. पैकी एका शाळेने आणि एका महाविद्यालयाने आजतागायत असले “उपदव्याप” केलेले नाहीत.
मात्र त्या शाळेशी माझे इतके गूळपीठ होते की मी एकदा पत्नी आणि मुलासह (त्यांना माझी शाळा दाखविण्यासाठी)बेधडक, परवानगी वगैरे न घेता शाळेत घुसलो. मला एकेकाळी शिकविलेल्या वर्गशिक्षिका अजूनही शाळेत नोकरीला होत्या, त्या गांगरल्या, कारण आम्ही कोणीच त्यांच्या परिचयाचे नव्हतो.नंतर ओळख करून दिल्यावर सगळं सुरळीत पार पडलं. दुसऱ्या शाळेत अशाप्रकारे मी गेलेलो नाहीए, किंबहुना गेलेलोच नाहीए.
पण आता NBA /NAAC ने अशाप्रकारचे मेळावे अनिवार्य केलेले आहेत. ज्यावेळी या संस्थांच्या कमिट्या महाविद्यालयात येतात तेव्हा त्यांचे माजी विद्यार्थ्यांशी interaction आयोजित करावे लागते. मग समन्वयक धावपळ करून कसेतरी ३०-४० लोकांना जमवितो, त्यातील बरेच स्थानिक असतात. मग ती तासाभराची भेट साजरी होते आणि प्राचार्य/संचालक निःश्वास टाकतात. या सगळ्या प्रकरणात कोठेही “स्नेह ” नसतो. चेहेऱ्यावर खोटे हास्य पांघरून, चहापाणी करून (क्वचित परगांवहून आलेल्या माजी विद्यार्थ्यांना जेवण देऊन) कटविले जाते आणि कमिटीच्या “स्कोअर ” ची बेगमी केली जाते. कर्मधर्मसंयोगाने समितीत महाविद्यालयाचाच एखादा माजी विद्यार्थी असला तर मग काय, “सोने पे सुहागा.”
एका महाविद्यालयाने त्यांच्या एका माजी विद्यार्थिनीला एकदाच परगांवहून बोलावले होते या उपक्रमासाठी – प्रवास भाडे, राहणे वगैरे यांची तजवीज करून ! तिची चांगली बडदास्त राखली. समितीला ओळख करून दिली- ” आमची गाजलेली विद्यार्थिनी वगैरे “. त्यानंतर पुन्हा कधी तिची आठवणही काढली नाही.
दुसरे एक महाविद्यालय आहे, ते पुढाकार घेऊन असे मेळावे करीत असते- पण ५००/- रुपये रजिस्ट्रेशन फी घेऊन ! त्यांत सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण समाविष्ट असते. बाकी तुमचं तुम्ही बघून घ्या. सकाळी ११ ते ४ ठराविक कार्यक्रम. त्यांत स्थानिक राजकीय मंडळी व्यासपीठापासून ते प्राचार्यांच्या केबिनपर्यंत सगळा ताबा घेतात. जमेल तशा भाषेत ” मार्गदर्शन ” करतात. त्यांचे सेल्फीछाप पाठीराखे असतातच-सिक्युरिटीला न जुमानता ! समन्वयकच काय पण प्राचार्यही ” जी जी रं जी जी ” करत कोपऱ्यात असतात. कॉलेज मॅगेझीन ची बेगमी आणि कार्यक्रम झाल्याची टीकमार्क खूण ! स्थानिक माजी विद्यार्थीही फिरकत नाही अशा प्रसंगी.
मी स्वतः एक सोडून पाच महाविद्यालयांमध्ये नोकरी केली पण तेथेही असले प्रकार नव्हते. अनिवार ओढीने माजी विद्यार्थी यायचे, आम्ही त्यांच्याबरोबर मस्त व्यक्तिगत वेळ घालवायचो आणि “स्नेह “जपायचो- तो आजही टिकून आहे.
त्याला असल्या “मेळाव्यांची” गरज नसते.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply