मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने एक वेगळा ठसा उमटविणारे उदय सबनीस यांचा
जन्म ८ डिसेंबर १९५९ रोजी झाला.
उदय सबनीस यांना त्यांच्या जवळचे सॅबीदादा या नावानेच ओळखतात. ते उत्तम अभिनेते आहेतच पण त्या बरोबर ते उत्तम व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहेत. मुळचे कोल्हापूरचे असलेले उदय सबनीस यांनी मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स, मुलुंड येथून तसेच नवभारत विद्यालय, मुंबई येथून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी “रंजन युवा मंच” ह्या संस्थेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. ठाण्यातील कलासरगम या नाट्यसंस्थेतून त्यांनी एकांकिका केल्या. हा त्यांच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा होता. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेतही सहभाग घेतला होता. १९८८ साली त्यांचं पहिलं नाटक “सूर्याची पिल्ले” रंगभूमीवर आले.
‘नटरंग’, ‘खेळ मांडला’ यासारखे साधारण चाळीस मराठी सिनेमे, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘फेरारी कि सवारी’सारखे अनेक हिंदी सिनेमे, ‘डॉ. बाबासाहेब’ या इंग्रजी सिनेमात आणि ‘ला कॅक्टस’ या फ्रेंच सिनेमात आपला कसदार अभिनय सादर केलेल्या उदय सबनीस यांना दिग्दर्शक संजीव कोलते डबिंग क्षेत्रात घेऊन आले. उदय सबनीस यांनी कार्टून नेटवर्कच्या पाच हजारांहून अधिक मालिकांसाठी, वर्ल्ड डिस्ने, पोगो या वाहिन्यांसाठी आवाज दिलाय.
आयबीएन लोकमत, ई टीव्ही मराठीसाठी चॅनेल व्हॉइस म्हणून काम केलंय, तर झी टीव्ही मराठीच्या अनेक मालिकांच्या जाहिरातीसाठी उदय सबनीस यांनी आवाज दिलाय. “छावा” च्या ऑडिओ बुक साठीदेखील त्यांनी आपला आवाज दिला आहे. २५ नाटकं, ५० मालिका, ४० सिनेमे, व ५ हिंदी सिनेमे तसेच इंग्रजी व फ्रेंच सिनेमांमध्ये काम करुन त्यांनी आपला अभिनय वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे. “बैंजो” आणि “अकीरा” या चित्रपटातही त्यांनी भूमिका केल्या होत्या. उदय सबनीस यांच्या पत्नी स्निग्धा सबनीस.
स्निग्धा सबनीस यादेखील अभिनेत्री आहेत. फ्रेशर्स, दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेत त्यांनी काम केले आहे. स्निग्धा आता कास्टिंग डायरेक्टर म्हणूनही काम पाहात आहेत. उदय आणि स्निग्धा यांना समिहा नावाची मुलगी आहे. समिहाला वाचन, ट्रेकिंग, ट्रॅव्हलिंग सोबत डान्सची खूप आवड आहे. तिने क्लासिकल डान्स, सालसा, तसेच लॅटिन डान्स फॉर्म शिकली आहे. तीही लवकरच अभिनयक्षेत्रात पाऊल टाकणार हे निश्चित.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
Leave a Reply