अभिनेते मनोज जोशी यांचा जन्म १४ डिसेंबर १९६५ रोजी गुजरात मधील हिम्मत नगर येथे झाला.
मनोज जोशी यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. तरी कॉमेडी भूमिका त्यांच्या जास्त वाट्याला आल्या आहेत. मूळ गुजराथी असलेल्या मनोज जोशी यांचे शिक्षण मराठीत झाले. त्यांचे वडील नारदीय कीर्तनकार होते.
कोकणातील रायगडमधील गोरेगाव हे त्यांचे मूळ गाव. येथे सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते मुंबईला गेले. येथे आठवीत राष्ट्रीय शिक्षण संशोधन (एनसीआरटी) अभ्यासक्रम आला. त्यामुळे मराठीत शिक्षण घेतल्यामुळे या शाळेत नापास झाले. पुन्हा पास झाले, नववीत नापास झाले. त्यानंतर पुन्हा पास झाले. पण, त्यांना पुन्हा कोकणात दहावीत एसएससी बोर्डाच्या शाळेत टाकण्यात आले.
तेथे पास झाल्यानंतर चित्रकलेची आवड असल्यामुळे मनोज जोशी जे. जे. आर्टला प्रवेशासाठी गेले. पण, तेथे प्रवेश न मिळाल्यामुळे मिठीबाई कॉलेजमध्ये आर्टला प्रवेश केला. नंतर येथे नाट्याचे आकर्षण तयार केले. या काळातच हॉबी क्लास जॉइंट करीत नोकरी करून कमर्शियल आर्टिस्ट झाले. यानंतर १७ नोकऱ्या केल्या. त्यावेळेस नाटकाचा सरावही केला. या काळातच ‘चाणक्य’ आकाराला आले.
मनोज जोशी यांनी ‘चाणक्य’ हे नाटक लिहायला १९८६ पासून केली. चार वर्षे संशोधन, लेखन, भूमिकांची निवड वगैरे करून हे नाटक रंगभूमीवर आले. चाणक्याची मुख्य भूमिका मनोज जोशींनी केली आहे. ‘चाणक्य’ नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आज तीस वर्षांनंतरही ते सुरू आहे. या नाटकाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्योजक मुकेश अंबानी, कुमारमंगल बिर्ला यांच्यासह अनेक दिग्गजांनी दाद दिली. पण, खरी दाद मिळाली ती पु. ल. देशपांडे यांची.
या नाटकानंतर त्यांना मराठीतील स्मिता तळवलकर यांची ‘राऊ’ मालिका मिळाली व पहिल्यांदा त्यांनी कॅमेराला फेस केले. त्यांनी मराठी, गुजराती, हिंदी, भोजपुरी चित्रपटांमधून अभिनय केला आहे. कांति मढियाच्या ताक धिना धिन या गुजराथी नाटकात मनोज यांनी १९८६ साली पहिली भूमिका केली. १९९५ साली आलेले विवेक लागू यांचे सर्वस्वी तुझीच हे मनोज जोशी यांचे मराठीतले त्यांचे पहिले व्यावसायिक नाटक. त्यानंतर मनोज जोशीनी अनेक मराठी, गुजराथी, हिंदी, भोजपुरी आणि इंग्रजी नाटकांमधून भूमिका केल्या. पुढे मनोज जोशी यांनी विजय तेंडुलकर यांचे ’घाशीराम कोतवाल’ हे नाटक गुजराथीत अनुवादित केले.
२०१७ रोजी आलेल्या ‘दशक्रिया’ या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका केली आहे. १९९८ पासून त्यांनी ७५ हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, त्यांतल्या बऱ्याचशा भूमिका विनोदी आहेत. चरित्र भूमिका ही मनोज जोशी यांची खास पसंती आहे.
मनोज जोशी यांनी चाणक्य, एक महल हो सपनो का, राऊ (मराठी), साग दिल, कभी सौतन कभी सहेली, चक्रवर्ती अशोक सम्राट या सारख्या टीव्ही मालिका मध्येही काम केले आहे.
मनोज जोशी यांनी सर्फरोश या चित्रपटातून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. सरफरोश, चांदनी बार, हंगामा, देवदास, हलचल, पेज 3, फिर हेरा फेरी से, चुप चुप के, गरम मसाला, गोलमाल, भागम भाग, भूलभुलैया, मेरे बाप पहले आप, बिल्लू, दे दना दन खट्टा-मीठा हे त्यांचे काही हिंदी चित्रपट होत. २०१५ मध्ये आलेल्या “ऋण” या चित्रपटात अभिनेते मनोज जोशी यांनी तृतीयपंथीयांची भूमिका साकारली होती. तसेच ‘नारबाची वाडी’, ‘दिनकर संभाजी चव्हाण’ या चित्रपटात पण मनोज जोशी यांनी अभिनय केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांची भूमिका मनोज जोशी यांनी साकारली आहे. काही वर्षापूर्वी मेंदुला स्ट्रोक आल्यामुळे ते दीड महिने लीलावती हॉस्पिटलमध्ये होते. नंतर वर्षभर बेडवर राहिले व त्यातून पुन्हा उभा राहिले. नंतर मग मागे वळून बघितले नाही.
२०१८ भारत सरकारने मनोज जोशी यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन गौरवले आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply