आज डॉ सलील कुलकर्णी यांच्या पेजवरील खालील गाणे ऐकले –
मराठी भाषा गौरव दिनाच्या मुहूर्तावर
“अभिजात ” मालिकेतील पहिलं गाणं !!
“आज सरे मम एकाकीपण ” !!
निर्मिती – जाई काजळ.
काव्य- शांताबाई शेळके
संगीत – सलील कुलकर्णी
गायक- शौनक अभिषेकी आणि राहुल देशपांडे
जरूर ऐका.
नेहेमीचा शौनक अभिषेकींचा खर्ज /शास्त्रीय आवाज येथे अधिक मऊ / हळुवार आणि भावगीत सुलभ वाटतोय. त्यामानाने राहुलचा थोडा कठोर/ टणक वाटतोय.(” किंचित हार्श” ला हा शब्दपर्याय जवळचा वाटतो कां?)
मला म्हणायचे आहे ते वेगळेच (पण या निमित्ताने)-
तालमीच्या वेळी पार्श्वभूमीला पं वसंतराव देशपांडे आणि पं जितेंद्र अभिषेकींचे फोटो आहेत. – चेहेऱ्यावर शांत /संयत /आत्ममग्न भाव !
आयुष्यातील खडतर दिवसांचे / परिश्रमांचे /तपश्चयेचे /भल्या -बुऱ्या अनुभवांचे नक्की काय होत असेल ? ते कुठे SAVE होत असतील ? असा मला नेहेमी पडणारा प्रश्न !
संतांचे सोडून द्या ! त्यांची दुनिया /कायदे -कानून वेगळे असतात. ते स्थितप्रज्ञ असतात.
पण वसंतराव /जितेंद्रजी /लता ही सारी माणसे आहेत.
आज फोटोवरून उलगडा झाला-
सगळं सोसलेलं चेहेऱ्यावरच्या आरशात उमटतं. ते प्रतिबिंब खरं ! सगळ्या वाटचालीचे ओझं /घाव,ओरखडे फक्त आणि फक्त चेहेरा मिरवत असतो.
काल सोलापुरात माझ्या हरीभाईतील सख्ख्या मित्रांचे चेहेरे निरखत होतो. बरेचजण १९७५ नंतर काल प्रथमच दिसत होते. त्यांचे चेहेरे त्यांच्या प्रवासाचे विलोभनीय आरसे होते. प्रवास मला माहित नसला तरी चेहेरे खूप काही सांगून गेले. नकळत वर्गातल्या चेहेऱ्यांशी मी तुलना करीत होतो पण शेवटी १९७५ ते २०२१ हा काळाचा भला थोरला तुकडा मध्ये वाहून गेला ना ?
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply