उषा मंगेशकर यांचा जन्म १५ डिसेंबर १९३५ रोजी झाला.
‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘एक लाजरा न् साजरा’, ‘काय बाई सांगू’, ‘गोड गोजिरी लाज लाजरी’, ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’, ‘शालू हिरवा’, ‘मुंगळा’, ‘मै तो आरती उतारू रे’ यासारखी असंख्य गीते आपल्या मधुर आवाजाने अजरामर करणाऱ्या ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा संगीत प्रवास अलौकिक असाच आहे. मराठी, हिंदीसह गुजराती व नेपाळी भाषेतही गायन केलेल्या उषाताईंनी भक्तीगीत, भावगीत, लोकसंगीतापासून ते चित्रपट संगीतापर्यंतच्या सर्व प्रकारांत आपली सुरेल मोहोर उमटवली.
लतादीदी, आशाताई, ह्यांच्या बरोबरीने “उषा मंगेशकर” अशी स्वतंत्र मोहोर उमटविणाऱ्या उषाताईंनी अनेक एकलगीते, द्वंद्वगीत बालगीतं, भक्तीगीतं गायली आहेत आणि ठसकेबाज लावण्याही म्हणल्या आहेत. आरंभीच्या काळात त्यांचा गायनाकडे कल नव्हता. मंगेशकर कुटुंबीय मुंबईत आल्यावर उषाताईंनी मणिपुरी नृत्याचे धडे घेतले. पुढील काळात ‘सुरेल कला केंद्र’च्या कार्यक्रमात गाणे म्हणण्याची संधी मिळाली. त्या कार्यक्रमात ‘बैजू बावरा’ चित्रपटातील शमशाद बेगम आणि लता मंगेशकर यांनी गाजवलेले द्वंद्वगीत त्यांनी गायले. त्यातील शमशाद बेगम यांचा गाण्यातील भाग हा मीनाताई मंगेशकर गायच्या व लतादीदींनी गायलेले शब्द हे उषाताई गायच्या.
उस्ताद बडे गुलाम अली खाँसाहेबांचे पट्टशिष्य पं. तुलसीदास शर्मा यांच्याकडे उषाताईंनी शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘एक लाजरा न् साजरा’, ‘काय बाई सांगू’, ‘गोड गोजिरी लाज लाजरी’, ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’, ‘शालू हिरवा’, ‘मुंगळा’, ‘मै तो आरती उतारू रे’ यासारखी असंख्य गीते आपल्या मधुर आवाजाने अजरामर करणाऱ्या ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा संगीत प्रवास अलौकिक असाच आहे.
उषाताई मंगेशकर आणि मीनाताई खर्डीकर या दोघींनी संगीत दिलेला, १९९४ मध्ये प्रसिद्ध झालेला “पुन्हा एकदा” अल्बम, खूप गाजला होता, झिम्मड घाई, रात बहरली, सोन कंगनी, भिर भिर उडते, मायेच्या माहेरा ही गाणी खूप लोकप्रिय झाली. मीनाताई आणि उषाताई ह्यांचा अजून एक संयुक्त संगीताचा उपक्रम म्हणजे “लोक गणपती” ध्वनिफीत होय. विशेष म्हणजे “बाला मै बैरागन” ही आशाताई भोसले ह्यांच्या स्वरातील गाजलेल्या गाण्यांची ध्वनिफीत, ज्याच संगीत ह्या दोघींनी दिलं होतं. मराठी, हिंदीसह गुजराती व नेपाळी भाषेतही गायन केलेल्या उषाताईंनी भक्तीगीत, भावगीत, लोकसंगीतापासून ते चित्रपट संगीतापर्यंतच्या सर्व प्रकारांत आपली सुरेल मोहोर उमटवली. लतादीदी आणि आशा भोसले यांची असंख्य गाणी रसिकांच्या ओठांवर रुळली आहेत. महाराष्ट्रामध्ये त्यांना “उषाताई” म्हणतात तर आसाममध्ये “उखादिदी” संबोधतात, गुजराथमध्ये “उषाबेन” ह्या सुप्रसिद्ध नावाने त्या लोकप्रिय आहेत.
उषा मंगेशकर यांची मोजकीच गाणी रसिकांना माहीत आहेत. उषाताई मंगेशकर यांना खरी प्रसिद्धी मिळाली ते जय संतोषी माँ या चित्रपटातील काही गाण्यांनंतर मे तो आरती उतारु रे या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले. नंतर त्यांचे मुंगळा हे गाणे व पिंजरा या चित्रपटातील गाणी तर लोकांच्या मनात अजून ही घर करून आहेत. त्यांनी दुरदर्शनसाठी फुलवंती या संगीत नाट्याची निर्मितीसुद्धा केली होती. “पवनाकाठचा धोंडी” “जैत रे जैत ह्या चित्रपटांची निर्मिती उषाताईंनी केलीय.
उषा मंगेशकर यांना मेहंदी ॲवॉर्ड, वेस्ट बंगाल क्रिटिक ॲवॉर्ड, सूरसिंगार ॲवॉर्ड, रोटरी ॲवॉर्ड, असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
उषाताई उत्तम चित्रकारसुद्धा आहेत. अगदी लहानपणापासून त्यांना चित्रकलेत रुची होती. कोल्हापूरला चित्रकार बाबूराव पेंटर शेजारी राहायचे. स्वत: माई मंगेशकर यांची चित्रकला उत्तम होती, त्या उत्तम रांगोळ्या काढायच्या. मुंबईत आल्यावर उषाताईंची चित्रकला अभिनेता-निर्माता राज कपूर यांनी पाहिली. त्यांनी उषाताईंची चित्रे कलादिग्दर्शक एम. आर. आचरेकर यांना दाखविली. आचरेकर व उषाताईंची भेट घडविली. आचरेकरांनी त्या चित्रांना दिलखुलास दाद दिली. उषाताईंनी सुर्यकांत मांढरे ह्यांचेकडून पावडर पेंटिंग शिकून घेतले. जलरंग आणि तैलरंग ह्या दोहोंमध्येही उषाताईंनी त्यांची करामत सिद्ध केलीय. पोर्ट्रेट हा तर उषाताईंचा हातचा विषय. त्यांनी चितारलेल्या डोळ्यातील भाव रसिकांना खिळवून ठेवतो. डोळ्यापासून रेखाटनाला प्रारंभ करून अवघं चित्रं भावपूर्ण करण्याचं कसब उषाताईंच्या हातात सामावलं आहे. अनेक पोर्ट्रेट त्यांनी साकारली आहेत. अनेक ध्वनिमुद्रिकांची वेष्टणं उषाताईंच्या कुंचल्यातून साकारलेली आहेत.
२०२० मध्ये महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार उषा मंगेशकर यांना मिळाला होता.
उषा मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!
उषा मंगेशकर यांची हिंदी, मराठी गाणी
https://www.youtube.com/watch?v=gaihS2h3p88
https://www.youtube.com/watch?v=pMg_ig8RDnA
https://www.youtube.com/watch?v=o9YgSspKNoA
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply