सुमारे सदतीस वर्षांपूर्वी रविवारच्या ‘दैनिक सकाळ’ मध्ये शेवटच्या पानावर एक छोटी जाहिरात दिसायची. ‘ऐका हो ऐका’ अक्षरापुढे ढोल वाजवताना माणूस आणि त्याखाली रविवारची खास सवलत असलेल्या वस्तूंची मूळ व सवलतीची किंमत अशी यादी असायची. शेवटी ग्राहक पेठ, टिळक रोड, पुणे हा पत्ता असायचा. फक्त नारायण, शनवार व सदाशिव नव्हे तर शहर व उपनगरातीलही असंख्य ग्राहक या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ‘ग्राहक पेठ’ मध्ये गर्दी करायचे. ही शक्कल लढवली होती ‘ग्राहक पेठ’चे संचालक व आमचे परममित्र सूर्यकांत पाठक यांनी!!
सदाशिव पेठेत असताना रुपेरी केस असलेल्या चष्मीश व्यक्तीने घरासमोरच स्कुटर लावली व विचारले, ‘नावडकर इथेच राहतात का?’ मी होकार देऊन त्यांना घरात बोलाविले. त्यांनी सांगितले, ‘मी अलका अॅड. कडून तुमचा पत्ता घेऊन आलो आहे. मला ‘ऐका हो ऐका’ जाहिरातीचा मजकूर तुमच्या हस्ताक्षरात लिहून हवाय.’ आम्ही त्यांचे काम करून दिले. त्या दिवसापासून आजपर्यंत सूर्यकांत पाठकांशी आमची घनिष्ट मैत्री आहे.
मी काॅलेजला असताना कसबा पेठेतील बिंदुमाधव जोशी यांच्या ग्राहक जागृती विषयक दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ करण्यासाठी गेलो होतो. जोशी हे ग्राहक चळवळीचे प्रणेते होते. त्यांनी सांगितलेल्या कल्पनेनुसार मुखपृष्ठ करून दिले. हा मी केलेल्या ग्राहक चळवळीच्या कामाचा श्रीगणेशा होता.
पूर्वी एसपी कॉलेजच्या समोर ‘जीवन’ नावाचे हाॅटेल होते. त्याच जागेवर आज ‘ग्राहक पेठ’ दिमाखात उभी आहे. प्रत्येक कार्यालयात, वास्तूमध्ये एखादी प्रेरणा देणारी मूर्ती किंवा फोटो फ्रेम असते. ग्राहक पेठेत स्वामी विवेकानंद यांचा पूर्णाकृती पुतळा प्रवेशद्वाराशीच आहे आणि त्यांच्याच विचारसरणीचे सूर्यकांत पाठक सर आहेत.
‘ऐका हो ऐका’ कामाच्या निमित्ताने आम्ही ग्राहक पेठेत पाठक सरांना वारंवार भेटत होतो किंवा कधी काही काम निघालं की, माणूस पाठवून ते आम्हाला बोलावून घ्यायचे. केबिनमध्ये गेल्यावर पहिल्यांदा पाणी आणि नंतर चहा हा ठरलेलाच असे.
एकदा सरांनी विचारलं, ‘तुम्ही कॅलेंडरचे काम कराल का?’ आम्ही होकार दिला. काम केलं. ते पाठकांना फार आवडलं. त्यानंतरची अनेक कॅलेंडर, त्यातील ज्ञाहिराती करुन दिल्या. कॅलेंडरच्या तारखांमधील मोकळ्या जागेत ‘चाॅकलेट पासून वातीपर्यंत, आजी पासून नातीपर्यंत’ ही जाहिरात करताना तसे मी फोटो काढून त्यात वापरले. पाठकांनी ‘ग्राहक पेठ’च्या वह्यांची संस्कारक्षम मुखपृष्ठं करण्याचीही संधी आम्हाला दिली.
दरवर्षी रामनवमीला ‘ग्राहक पेठ’चा वर्धापनदिन असतो. त्याचे निमंत्रण कार्डचे डिझाईन आम्ही करत असू. वह्यांच्या जाहिरातीचे रेटकार्ड डिझाईन अशी अनेक कामं सरांनी आमच्याकडून करुन घेतली.
दरम्यान त्यांना मी फोटोग्राफी करतो हे कळल्यावर ग्राहक पेठेत कोणी मान्यवर पाहुणे आले की, मला तातडीने घेऊन येण्याची व्यवस्था ते करायचे. मी देखील कार्यक्रमाचे फोटो त्यांना त्याच दिवशी देऊन खूष करीत असे. ‘ग्राहक पेठ’चा गणेशोत्सव फार उत्साहाने साजरा केला जातो. मी पहिल्या दिवसापासून ते विसर्जनापर्यंत फोटोंचे काम करीत असे. त्यामुळे पेठेतील सर्व कर्मचारी वर्ग मला नावाने ओळखत असत.
‘ग्राहक पेठ’ च्या साळुंके विहार व धनकवडी शाखेच्या शुभारंभाला मी उपस्थित होतो.
सूर्यकांत पाठक संपादित ग्राहक चळवळीच्या ‘ग्राहकहित’ चे काम आम्ही केलेले आहे. नंतर ‘ग्राहकहित’ दिवाळी अंक सुरू झाला. प्रत्येक वेळी नवीन विषय घेऊन लागोपाठ उत्तम दिवाळी अंकांची परंपरा त्यांनी कायम ठेवली. या अंकांना विविध संस्थांचे पुरस्कार मिळाले. ते स्वीकारण्याच्या समारंभास मी फोटो काढण्यासाठी नेहमी त्यांच्या सोबत असायचो. त्यामुळेच महान संगीतकार सुधीर फडके यांना मुंबईला जाऊन प्रत्यक्ष भेटण्याचे भाग्य लाभले. तसेच ‘महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व’ पु. ल. देशपांडे यांच्या घरी सरांसमवेत गेलो होतो.
अनेकदा प्रेसला देण्यासाठी सरांचे फोटो मी त्यांच्या घरी जाऊन काढलेले आहेत. घरी गेल्यावर वहिनींच्या हातचे पोहे व चहा ठरलेला असायचा. कधी नारायण पेठेत गेलो की, वहिनी हमखास दिसायच्या. आवर्जून थांबून त्या आमच्याशी बोलायच्या.
दसऱ्याच्या संचलनात मी पाठक सरांना अनेकदा पाहिलंय. माझ्याशी सरांचा स्नेह जुळायचं विशेष कारण असं की, आम्हां दोघांचं काॅलेज बीएमसीसी. माझं शिक्षणही डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतच झालं. मला शिकविणारे सर अनेकदा ग्राहक पेठेत मान्यवर पाहुणे म्हणून आलेले आहेत. पाठक सर सोसायटीच्या पदावर कित्येक वर्ष कार्यरत आहेत.
कालांतराने आम्ही नाट्य-सिने क्षेत्रात व्यस्त झाल्याने सरांच्या भेटी कमी होऊ लागल्या. कधी मधेआधे गेलो तर पाठक सर सलामीलाच प्रश्र्न टाकतात, ‘काय हुकूम आहे?’ कित्येकदा त्यांनी आमच्या अडचणीचे, समस्येचे निराकरण केलेले आहे.
संस्कृती प्रकाशनच्या ‘जगातील सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज’ या पुस्तकाच्या दहा प्रती ग्राहक पेठेत विक्रीसाठी ठेवाव्यात अशी मी पाठक सरांना विनंती केली. त्यांनी विनंतीला मान देऊन त्या दहाही प्रतींंची विक्री करुन व्यवहार पूर्ण केला. एक नाट्य कलावंत मित्राला नोकरीची अत्यंत गरज होती, त्याला देखील सरांनी काम दिले.
आम्ही दरवर्षी रामनवमीला पाठकांना शुभेच्छा देण्यासाठी भेटतोच. दिवाळी प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी व ‘ग्राहकहित’चा अंक घेण्यासाठी न चुकता भेटायला जातो. एटीएम जवळील लिफ्टमध्ये जाऊन दुसऱ्या मजल्याचे बटन दाबतो. रिसेप्शन काऊंटरवर असलेल्या मुलीकडे आमचं कार्ड देतो. ती थोडा वेळ थांबायला सांगते. त्या पाच दहा मिनिटात ग्राहक पेठेत पहिल्यांदा आल्यापासून आजपर्यंतची संपूर्ण चित्रफीत डोळ्यासमोरून तरळून जाते. इतक्या वर्षात ऑफिसमध्ये झालेले बदल आठवतात. त्यावेळचा एखादा कर्मचारी समोरुन जाताना हसून ओळख दाखवतो व मला सुखावून जातो. एवढ्यात ती मुलगी ‘सरांनी बोलावलंय’ असा निरोप देते. आम्ही दोघे काचेचे दार उघडून केबिनमध्ये प्रवेश करतो. पाठक साहेब उठून स्वागत करतात. आम्ही बसल्यावर पाण्याचे ग्लास येतात, मागाहून चहा येतो. सर आस्थेनं व्यवसायाची चौकशी करतात. घरच्यांबद्दल विचारतात. ‘ग्राहकहित’चा अंक आदरपूर्वक देऊन गेली अनेक वर्षांपासूनची त्यांची इच्छा बोलू लागतात, ‘नावडकर साहेब, मला तुम्हा दोघांना मोठ्या ऑफिसमध्ये बसलेलं बघायचंय. बाहेर स्वागतिका बसलेली आहे. तुम्ही दोघंही काचेच्या केबिनमध्ये बाॅसच्या खुर्चीवर बसलेले आहात.’ सरांच्या या मनापासूनच्या शुभेच्छा आम्हाला लाखमोलाच्या असतात. पाठक साहेबांच्या सहवासातील या तीन तपांनी आमचे जीवन समृद्ध झालेले आहे…
— सुरेश नावडकर.
२७-६-२०.
Leave a Reply