मोबाईल मधील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे व्हॉटस अप. यावर किती लोक असतात याला काही मर्यादा नाही. ते वाढता वाढता वाढे. अशा पद्धतीने चालत असते. या मुळे आपण मेसेज पाठवून निर्धास्त होतो. मग त्याला कळाले की देईल उत्तर असाही ठाम विश्वास असतो. आता यात कुणी कुणाला काय मेसेज केला आहे आणि त्याचे उत्तर काय हे सगळे त्यालाच माहित असते. पण कधी कधी घरातील कुणीतरी तो मेसेज वाचतात आणि काहीही माहिती नसताना गैरसमज करून घेउन वातावरण बिघडवून टाकतात. त्यामुळे ते वाचून झाल्यावर लगेचच डिलीट केले तर चांगलेच आहे. तसेही आपण आपल्या मनातील मोबाईल मध्ये साचवून ठेवलेले असतेच. त्यामुळे ते तिथेच ठेवून देण्यापेक्षा डिलीट केलेले बरे…
आता ही या वरची माणसं किती उतावीळ झालेली असतात अगोदर. अगदी रोज जेवण झाले का इथपासून सुखदुःखाची देवाणघेवाण होईस्तोवर. मग हळूहळू ते कमी होत जाते. पहिल्यांदा होणारा आनंद कमी कमी होत चालला की वाईट वाटते. स्वतःचीच चीड येते. पण असे का व्हावे याचेही कारण कळत नाही. आणि विचारताही येत नाही. खरं कुठे कोण सांगणार? इथे मेसेजेसनी खूप मोठा ग्रंथ होईल इतके लिखाण असते. ठेवून उपयोग होत नाही मग कशाला अडकून पडायचे त्यात. एक दिवस असा येतो की अरे इतके लोक आहेत आणि आपण मेसेज केला तरच मेसेज करतात अन्यथा नाही. त्यामुळे एकेक नबंर डिलीट केले जातात. काही जण विचारतात तर काही जण बरे झाले. सुंठीवाचून खोकला गेला. असे समजून निवांत राहतात. कधी कधी गम्मत अशी होते की आपल्या हातून चुकीने डिलीट होते. आणि त्या व्यक्तीचा राग काढता काढता नाकी नऊ येतात….
कोरोनानी अनेक जवळचे. नातेवाईक. मित्र मैत्रिणी. सहकारी गमावले आहेत. आता त्यांचे नाव व फोन नंबर ठेवण्यात काही अर्थ नाही म्हणून अगदी जड अंतःकरणाने ते डिलीट केले आहेत मोबाईलवरचे डिलीट करता येईल पण मनातले कसे डिलीट करणार? तुम्हाला काय वाटतं.
— सौ कुमुद ढवळेकर.
Leave a Reply