नवीन लेखन...

सेवानिवृत्त दिवस

सेवानिवृत्ती हा आयुष्यातला एक नवीन टप्पा. येथेच ‘स्व’चा शोध घेण्याची प्रक्रिया सुरू होते. या आनंदाचा शोध घेत घेत मार्गक्रमण करणे हेच खरे निवृत्तीनंतरचे कार्य. एकदा का आनंदाचा ठेवा सापडला, की निवृत्तीचा अर्थ उमजायला लागतो.
पूर्वी निवृत्तीनंतर हाती येणारा पैसा खूप कमी किंवा पुरेसा नसायचा. एकत्र कुटुंब असल्याने जबाबदाऱ्या खूप असायच्या; पण आता असे वातावरण राहिले नाही. कुटुंबे आता लहान झाली आहेत. निवृत्तीचे वयही ठरलेले असते. निवृत्त होणारी व्यक्ती आपल्या निवृत्तीनंतरचा काळ कसा घालवायचा याचा विचार अगोदरच करून ठेवतात; म्हणूनच म्हणतात, की आजचे निवृत्तीनंतरचे जीवन पूर्वीइतके करूण राहिलेले नाही. आता निवृत्त किंवा ज्येष्ठ न म्हणता ‘यंग सिनिअर्स’ संबोधण्यात येते. त्यामुळे म्हातारणाकडे तुम्ही झुकले आहात, ही जाणीव कमी केली जाते. त्यामुळे वृद्ध व्यक्तीसुद्धा परत साठीनंतरचे येणारे तारुण्य उपभोगू लागल्या आहेत. जीवनातील त्रासदायक काळ न मानता त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला आहे.

एकंदर पाहता निवृत्तीनंतरचा विचार निवृत्तीपूर्वीच केलेला बरा. जेव्हा मनुष्य रोजच्या कामात मग्न असतो, खूप धावपळ होत असते, तेव्हा त्याला विश्रांती हवी असते; पण सक्तीची विश्रांती समोर येते, तेव्हाच नेमकी धांदल उडते. निवृत्ती म्हणजे नोकरी व्यवसायातून निवृत्ती. जीवनातून नव्हे. आयुष्याला पूर्णविराम नसून, स्वल्पविराम असतो; कारण अजून बरेच आयुष्य बाकी असते.

आता निवृत्त लोक क्रियाशील असतात. त्यांच्यात शारीरिक, मानसिक क्षमताही असतात. खूप जण आपली र‌ाहिलेली इच्छा आणि छंद पूर्ण करताना दिसतात. अनेक ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याची संध्याकाळ, इष्ट, आप्तेष्ट, मित्रमंडळी यांच्या सोबतीने सुखावह व्हावी, एवढीच अपेक्षा असते. त्यासाठी ते ‘मॉर्निंग वॉक’ला जातात. त्यांचे ग्रुप तयार करतात. गप्पा मारतात. ज्येष्ठ नागरिक संघात जातात. त्यात होणारे विविध कार्यक्रम, स्पर्धा, सहली यांचा आस्वाद घेतात. सकस आहार घेऊन, नियमित व्यायाम करून आरोग्य सांभाळून जीवन सुखात घा‌लविण्याचा प्रयत्न करतात. आपल्या मुलाबाळांच्या जीवनपद्धतीशी जूळवून घेतात. आपल्या नातवंडांमध्ये डावे-उजवे करणे, गरज नसतानाही घरातल्या प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणे, उठसूट सल्ले देणे, नातवंडांच्या प्रत्येक कृतीला नाक मुरडणे या गोष्टी टाळतात.

असे असले, तरी पूर्वनियोजन नसल्याने काही ज्येष्ठांना निवृत्तीनंतर काय करायचे तेच समजत नाही. एखादा दगड उतारावरून सोडला, तर तो जसा वाट फुटेल तिकडे जातो. तशी त्यांची अवस्था होते. दिवस त्यांना खायला उठतो. एकटेपणामुळे लोक नैराश्यग्रस्त होतात. आयुष्य धकाधकीत गेलेले असते. सतत कार्यमग्न राहण्याची शरीराला, मनाला सवय झालेली असते. त्यामुळे काही जण नोकरीतूनच नाही, तर आयुष्यातून निवृत्त झाल्यासारखे वागतात; पण ही त्यांची शारीरिक बाब नसते, तर अशी माणसे शरीराआधीच मनाने निवृत्त होतात. त्यासाठी छोटेसे का होईना; पण नवीन काहीतरी शिकण्याचा ध्यास ठेवला तर मन तरुण राहाते. तरुण पिढीशी नातेसंबंध चांगले कसे राहतील, त्याकडे लक्ष द्यायला हवे. भौतिक गोष्टींतून मन काढून घेता आले पाहिजे.

काहींना निवृत्त झाल्याक्षणी समाजातील आपले स्थान अचानक कोणीतरी ‌काढून घेतले आहे. आपण दुय्यम आहोत, असे वाटू लागते. या होणाऱ्या बदलाची आधीपासून तयारी केली असेल, तर निवृत्तीनंतरची ही वर्षे प्रत्येकाच्या आयुष्याचा सुवर्णकाळ बनू शकतात. नोकरीच्या खुर्चीशिवाय आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकतात. स्वतःचा आत्मसन्मान, सुख, आरोग्य आणि स्वतःचे अस्तित्व… सारे अबाधित ठेवण्यासाठी निवृत्तीनंतर स्वतःला सक्षम ठेवणे गरजेचे आहे.

आमच्या सर्व सेवानिवृत्त मित्रांना उत्तम आरोग्याच्या शुभेच्छा.

— सुरेखा पेंडसे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..