कमालीचा उकाडा जाणवत होता. साधारणतः रात्रीचे १ – १|| वाजले असतील, मी नुकतेच माझे शूट उरकून फिल्म सिटीतून बाहेर पडत होतो. चालत – चालत मेन गेटपर्यंत आलो. बऱ्याच वेळाने एक रिक्षावाला आला. त्याला मी हायवेपर्यंत सोडण्यास सांगितले. बऱ्याच वेळच्या हुज्जतीनंतर तो यायला तयार झाला. आधीच एकतर थकलेलो, त्यात उकडत होते. हुज्जतीत सगळा राग काढला त्या रिक्षावाल्यावर. त्याची बडबड चालूच होती. शेवटी मी त्याला म्हणालो, ” अरे बस झाले बाबा, किती बोलशील? ” माझे वाक्य ऐकून तो गप्प बसला. साधारणतः हायवेवर पोहोचतच आलेलो. काही मिनिटात हायवेवर पोहोचलो. रिक्षावाल्याला पैसे देऊन त्याने हायवेपर्यंत सोडल्याबद्दल त्याचे आभार देखील मानले. तोही खूष होऊन निघून गेला.
आता मी हायवेवर ठाण्याला जाणाऱ्या कॉल सेंटरच्या गाड्यांची वाट पाहू लागलो. काही वेळाने आकाशात मेघ गर्जू लागले, वीजा चमकू लागल्या आणि काही क्षणातच सरी कोसळू लागल्या आणि मी भिजू लागलो. मनातल्या मनात चरफडत मी स्वतःशीच पुटपुटलो ‘ ह्याला पण आत्ताच कोसळायचे होते? ‘ भिजू नये म्हणून एखादा आडोसा शोधत असतानाच एक कॉल सेंटरची गाडी आली. मी हात दाखवताच गाडी थांबली आणि माझा ठाण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. थोडासा रिलॅक्स झाल्यावर माझे लक्ष गाडीच्या खिडकीकडे गेले. पाऊस पडत असल्याने काचा बंद करून ठेवलेल्या. त्या बंद काचेवरून पावसाच्या पाण्याचे ओघळ खाली पडत होते. त्यांचे निरीक्षण करता – करता मी सहजपणे गत आयुष्यात ओढलो गेलो. विचार करता – करता मला माझ्या लहानपणातील पाऊस गावला (सापडला). नकळतपणे मी शाळेत पोहोचलो. सगळे चित्र माझ्या डोळ्यांसमोरून सरकू लागले.
लहानपणी हाच पाऊस मला खूप आवडायचा. ती रस्त्यांवर, खड्डयात साचलेली डबकी, शाळेच्या मैदानात साचलेले पाणी, त्यामुळे होणारा चिखल आणि तो मातीचा ओला सुगंध ! अहाहा! ह्या सगळ्या गोष्टी खूप जवळच्या वाटायच्या. शाळेत तर साचलेल्या पाण्यात मी कागदी होड्या बनवून सोडत असे. माझा सगळ्यात आवडता छंद होता तो.
आणखीन थोडा मोठा झालो तेव्हां पाऊस माझ्यासोबतच वाढलाय आणि त्याचेपण माझ्या एवढेच वय आहे असे जाणवू लागले. साधारणतः ६ वी ७ वीत असेन, तेव्हां पावसाळा सुरू झाला की मग मी आणि माझे मित्र शाळेत चिखलातच कबड्डी, खो-खो असे खेळ खेळण्यात रमायचो. शाळेचा गणवेश चिखलात मळून जायचा पण आम्ही खेळणे कधीच सोडले नाही. या गोष्टींवरून बरेचदा घरच्यांचा ओरडादेखील खायचो, पण ती पावसाची मजा मात्र मिस करायचो नाही.
वय जसजसे वाढू लागले तसतसे माझे आणि पावसातील नाते अधिकाधिक घट्ट होऊ लागले. कॉलेज लाईफमध्ये तर पाऊस मला जणू माझ्यासारखाच तरुण बनला असे वाटे. त्यालादेखील नुकतीच दाढी-मिशी फुटली आहे असे जाणवायचे. कॉलेज लाईफ, मित्र, पाऊस आणि कॉलेज कट्टा ह्यांचे एक आगळे-वेगळे नाते हळूहळू उलगडायला लागले होते. ह्याच पावसाळ्यात कट्टयावर अनेक कविता रचल्या जायच्या आणि सोबत असायची ती कुरकुरीत कांदाभजी आणि एक कडक स्पेशल चहा! मग काय तासनतास गप्पांचा फड रंगायचा. पिकनिकचे प्लॅन ठरायचे. ट्रेकींगचे प्लॅन ठरायचे. नुसती सगळी धमालमस्ती होती.
इतक्यात कसल्यातरी आवाजाने मला लागलेली तंद्री तुटली आणि माझे लक्ष खिडकीच्या बाहेर गेले. मी ठाण्याला पोहोचतच आलो होतो. माझा स्टॉप आल्यावर मी गाडीवाल्याला पैसे देऊन उतरलो. इतक्यात एक सावळ्या माणसाने मागून आवाज दिला. मी मागे वळून पाहिले. त्याने मला विचारले, ‘ काय मित्रा! आज बऱ्याच दिवसांनी आठवण काढलीस! बघ तू माझी आठवण काढलीस आणि मी तुझ्या भेटीला लगेच आलो.’ त्याच्या या वाक्याने माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आले. प्रश्नचिन्ह पाहून तो लगेच बोलला, ‘ अरे इतका वेळ तर माझ्याबद्दलच विचार करीत होतास, तू जसजसा वाढत होतास तसतसा मी तुला तुझ्याप्रमाणे वाटत होतो. तुला तुझ्या भूतकाळात नेऊन आणले. तुझ्यातील आठवणी जाग्या केल्या आणि तू इतक्यात विसरलास ? अरे मीच तो पाऊस….. तुझा मित्र, सोबती. ज्याचा तू इतका वेळ विचार करीत होतास….. ‘
त्याच्या या वाक्याने माझे प्रश्नचिन्ह गायब झाले आणि मला खूप आनंद झाला. माझ्या चेहऱ्यावर एक प्रकारचे हास्य उमलले. मला आनंद झालेला पाहून त्यालाही आनंद झाला आणि त्याने मला कडकडून मिठी मारली आणि पुन्हा जोमाने बरसू लागला..
— आदित्य दि. संभूस.
(अभिनेता, दिग्दर्शक, लेखक)
Leave a Reply