“प्रदूषणातून पर्यावरणाकडे” या शीर्षकामागे कोणते विज्ञान दडले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता माझ्या हातात हे पुस्तक आल्या आल्या निर्माण झाली. लेखकाचे मनोगत वाचताच या पुस्तकातून पर्यावरण संवर्धनाचे विचार अधिक सक्रीय व तीव्र होतील याची खात्री पटली. या क्षेत्रात काम करीत असल्याने त्यात येणारे अनेक विचार वेळोवेळी समोर उभे राहणारे प्रश्न व काही तरी संवर्धनात्मक करण्याची इच्छा या सर्वांवर मुद्देसूद उत्तर एकाच ठिकाणी अतिशय सोप्या सादरीकरणातून समोर आले तर ते एक वरदान व पर्यावरण विचारांचे आर्शीवाद आहेत, असेच वाटायला लागते. सर्व साधारण माणसाच्या लक्षात येईल, अशी पर्यावरणाची व्याख्या सांगून हे पुस्तक हळूहळू पण सहज आपल्याला पर्यावरणातील प्रदुषणाबाबत जागृत करीत जाते. वायु, जल, मृदा, ध्वनी, औष्णिक प्रदुषणाचे सभोवतालच्या परिस्थितीवर होणारे दुष्परिणाम यांची मांडणी म्हणजे ही खरोखरच युवकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी लेखकाने तयार केलेली गुरुकिल्ली आहे, असे मी समजतो. जागतिक तापमानवाढ, हरितगृह वायु या सारख्या प्रचलित सर्रास वापरल्या जाणार्या पण क्वचितच समजल्या जाणार्या विषयाचे सरळ व सोप्या पद्धतीने आकृत्यांच्या सहाय्याने समजवून सांगणारी लेखकाची शैली हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. थोडक्यात म्हणायचे झाले तर या पुस्तकाच्या साह्याने सर्व सामान्य माणूस पर्यावरण क्षेत्रात स्वत:चे कार्य उभे करण्यास समर्थ होईल. या पुस्तकाच्या संदर्भात अजून एक गोष्ट लहानतोंडी मोठा घास घेऊन माझ्या मतानुसार सांगायची इच्छा होते ती म्हणजे प्रदुषणातून पर्यावरणाकडे ही वाटचाल किंवा क्रिया विकसित देशांमध्ये पूर्णपणे आत्मसात केली पाहिजे. भारतासारख्या विकसनशील देशाचे उदाहरण घेतले तर या क्रियेची सुरवात होऊ घातलेली आहे व तुलनात्मक दृष्टीने प्रदुषणाचा प्रकोप कमी आहे म्हणूनच इथे खरी गरज आहे ती पर्यावरर्णीय हित जपून विकास साधायची, ग्रीन इकॉनॉमीला चालना देण्याची. अशा तंत्रज्ञानाची ज्यात नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर शाश्वत रीत्या होईल. माझी लेखकांना व प्रकाशकांना विनंती आहे की, त्यांनी भविष्यात आजच्या पर्यावरण प्रेमींना, आंदोलकांना या दिशेनं मार्गदर्शन करावे व त्या आधारावर असेच पुस्तक लिहावे व सामान्यांना उपलब्ध करून द्यावे. पर्यावरण चळवळीला हातभार लावणारे उत्तम पुस्तक लिहिल्याबद्दल आणि प्रकाशित केल्याबद्दल डॉ. पवार आणि नचिकेत प्रकाशन दोघांचेही अभिनंदन.
स्वानंद सोनी – पर्यावरण कार्यकर्ता
9960298639
प्रदुषणातून पर्यावरणाकडे
डॉ. किशोर पवार/सौ. नलिनी पवार
पाने : 160,
किंमत : 160 रू.
नचिकेत प्रकाशन
Leave a Reply