सुमारे वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी शनिवार वाड्याजवळून चाललो होतो. तिथे मला एक पथनाट्य चालू असलेलं दिसलं. मी त्या गर्दीतून पथनाट्य पाहू लागलो, त्या कलाकारांच्या ग्रुपमध्ये मला माझ्या ओळखीची विद्या लिमये दिसली. ते पथनाट्य संपल्यावर मी तिला भेटलो. मी खूप वर्षांनंतर भेटल्याने तिला फार आनंद झाला होता. तिने सहकलाकारांची माझ्याशी ओळख करून दिली. त्या आठ जणांमध्ये शिरीष कांबळे हा एक कलाकार होता. त्या ग्रुपमधील सर्व जण त्याला ‘शेरू’ नावानेच संबोधत होते. त्याला मी माझे व्हिजिटींग कार्ड दिले व ऑफिसवर येऊन भेटायला सांगितले.
काही दिवसांनी शेरू पत्ता शोधत आमच्या ऑफिसवर आला. शेरू हा पंचविशीचा तरुण होता. साधारण पाच फुटी उंची, डोक्यावर कुरळे केस, गोल गुटगुटीत हसरा चेहरा, तब्येतीने गिड्डा, गळ्यात उठून दिसणारं लाॅकेट, वरची दोन बटणं न लावलेला चेक्सचा शर्ट व खाली जीनची पॅन्ट. शेरूला आम्ही सिनेमा, नाटकांच्या जाहिराती करतो, याचे फार औत्सुक्य होते. त्याला आम्ही आतापर्यंत केलेली जाहिरातींची कामं दाखवली.
शेरूने स्वतःच्या नाट्य प्रेमाबद्दल खूप काही सांगितले. त्याला अभिनयाची उपजतच आवड होती, मात्र परिस्थितीमुळे त्याला ती जोपासता आली नाही. त्याने शिक्षण झाल्यावर गरज म्हणून काही वर्ष रिक्षाचा व्यवसाय केला. रिक्षा ड्रायव्हर म्हणून त्याला आलेले अनुभव त्याने सांगितले. दिवसापेक्षा रात्री भेटणारी गिऱ्हाईकं ही कशी वेगळी असतात ते शेरूनं रंजक पद्धतीने सांगितलं.
एका रात्री शेरूची रिक्षा शिवाजीनगर रेल्वे स्टेशनच्या स्टॅण्डला असताना एक तरुण मुलगी त्याच्या रिक्षात येऊन बसली. शेरूने तिच्या देहबोलीतून ओळखले की, ही घर सोडून पळून आलेली असावी. त्याने तिला विचारले, ‘कुठे जायचे आहे?’ तिने जो पत्ता दाखवला तो अपुरा होता. शोधूनही तो सापडेल याची खात्री नव्हती. शेरू तिला जवळच्याच एका हाॅटेलमध्ये घेऊन गेला. तिला प्रवासात काहीही न खाल्ल्याने भूक लागलेली होती. तिला त्याने खाऊ घातले. नंतर दोघांनी चहा घेतला. दरम्यान शेरूने तिची विचारपूस केली व तिला पुन्हा घरी जाण्यास समुपदेशन करुन तयार केले. तिचे नाव ज्योती होते. तिला शेरूचे विचार पटले. तिला प्रवासासाठी शेरूने पाकीटातून पैसे काढून दिले व गाडीत बसवून मगच घरी परतला.
दहा वर्षांनंतर शेरूला आरटीओ ऑफिसमध्ये एका महत्त्वाच्या कामासाठी जावं लागलं. तेथील साहेबांनी शेरूने भरलेल्या फाॅर्मवर प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्याची सही घेऊन यायला सांगितलं. शेरू त्या ऑफिससमोर जाऊन उभा राहिला. त्या दरवाजावरील अधिकाऱ्याचे नाव ‘ज्योती काळे’ वाचल्यावर शेरूला ते ओळखीचे वाटले. शिपायाने शेरूला दरवाजा उघडून आत पाठवले. त्याला समोरची व्यक्ती पाहून शिवाजीनगरची ती रात्र आठवली. त्याने फाॅर्म त्या स्त्रीच्या पुढे ठेवला.
फाॅर्मवरील नाव वाचताच ती उठून उभी राहिली. ‘शिरीषदादा, ओळखलंस का मला? कसा आहेस तू? किती वर्षांनी भेटतोय आपण!’ शेरूचा अंदाज खरा ठरला. त्या रात्री भेटलेली मुलगी आज आरटीओ ऑफिसर म्हणून त्याच्यापुढे उभी होती. तिने शिपायाला चहाची ऑर्डर दिली व शेरूला म्हणाली, ‘गेल्याच वर्षी मी इथे जाॅईन झाले आहे. तू त्या रात्री माझं मन वळवलं नसतं तर आज मी या खुर्चीवर तुला दिसले नसते. मी पुन्हा घरी गेले. घरच्यांनी मला समजून घेतलं. मी शिक्षण पूर्ण केलं. स्पर्धा परीक्षा दिली. आज माझी गाडी रुळावर आली आहे. तुला कधीही, कोणतीही अडचण असेल तर मला कधीही हक्कानं सांग. मी तुझ्या पाठीशी आहे. एकदा घरी नक्की ये.’ चहा आला. शेरूचं काम झालं. ज्योतीनं त्याला आपला पत्ता दिला. शेरूला ऑफिसबाहेर पडताना जाणवलं की, चांगल्या कर्माचं फळ, उशीरा का होईना, चांगलंच मिळतं!
शेरूला ड्रायव्हिंगची मनस्वी आवड होतीच. त्यातूनच पुढे त्यानं टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला. दरम्यान त्याचं लग्न झालं. पत्नी देखील ‘डॅशिंग’ मिळाली. पुणे शहरातील ती पहिली ट्रक चालविणारी महिला ड्रायव्हर आहे. तिच्या या विशेष कामाबद्दल अनेक वर्तमानपत्रांत मुलाखती देखील आलेल्या आहेत.
आमच्या पहिल्या भेटीच्या वेळी त्याचे ऑफिस म्हात्रे पुलाजवळ होते. काही दिवसांनी त्याने आमच्या ऑफिसच्या जवळच ज्ञान प्रबोधिनीच्या गल्लीत एका खोक्यामध्ये व्यवसाय सुरू केला. त्यावेळी तो अष्टविनायक यात्रा, देवीची साडेतीन शक्तिपीठे, अकरा मारुती अशा सहलींचं आयोजन करायचा. आमची दिवसाआड तरी त्याच्याशी भेट व्हायचीच. त्याच दरम्यान त्याला पहिली मुलगी झाली. शेरूने त्याच्या जगावेगळ्या स्वभावानुसार मला एखादे जपानी नाव सुचवायला सांगितले. मी फोटोग्राफर असल्याने एका जपानी फिल्म रोलचे नाव त्याला सुचविले, ‘कोनिका’! शेरूने त्याच नावाने तिचे ‘बारसे’ केले.
असाच एकदा गावाहून आम्हाला फोन आल्याने आम्ही दोघे गावी गेलो व आई वडिलांना वैद्यकीय उपचारासाठी पुण्याला आणले. त्या दोघांना आम्हाला सदाशिव पेठेतून औंधला घेऊन जायचे होते. त्यासाठी शेरूला गाडी मिळेल का? असे विचारले. शेरूने स्वतःच्या मॅटेडोरमधून आम्हा चौघांना औंधला पोहचविले. त्याला त्या कामाबद्दल देऊ केलेले पैसे त्यानं नम्रपणे नाकारले. शेरू म्हणाला, ‘तुमचे आई वडील, माझ्या आई वडिलांसमानच आहेत ना? त्यांची सेवा केल्याचे मोल पैशात असे करता येईल का?’ आम्ही निरुत्तर झालो.
काही दिवसांनी शेरूने ती जागा सोडली व डेक्कन जिमखाना बस स्टाॅप शेजारी टूर्सचे नवीन ऑफिस सुरू केले. आम्ही डेक्कनला गेल्यावर त्याला भेटत होतो. दरम्यान त्यानं शाळेतील विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी गाड्या सुरु केल्या.
एका रविवारी शेरूनं सकाळीच आम्हाला फोन केला. तुम्ही स्वारगेटला या, आपण जरा फिरून येऊ. आम्ही स्वारगेटला जाऊन त्याच्या टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये बसलो. आम्ही दोघं, ते पती-पत्नी व त्यांची कन्या ‘कोनिका’ पाचही जण तासाभरात सिंहगडावर पोहोचलो. तिथे गाडी पार्क केल्यावर भजी-चहा झाला. तासभर गडावर भटकंती करुन आम्ही पुन्हा गाडीत बसलो व लोणावळ्याच्या दिशेने रस्ता पकडला. दोन तासांनी आम्ही लोणावळ्यात होतो. तिथे एका हाॅटेलमध्ये जेवण केले. अमृतांजन पाॅईंटपर्यंत फिरुन आलो. संध्याकाळी रमत गमत पुण्यास परतलो. शेरूने अचानक घडवून आणलेली ही सफर ‘एक उनाड दिवस’ सारखी अविस्मरणीय अशी ठरली.
काही वर्षांनंतर शेरूने पुन्हा सदाशिव पेठेत ऑफिस केले. ब्राह्मण मंगल कार्यालयाजवळ पहिल्याच मजल्यावर त्याचे ऑफिस आहे. ईश्र्वर कृपेने आता शेरू पत्नीसह व्यवसायात ‘बिझी’ आहे. त्याच्या दोन्ही कन्या कोनिका आणि याशिका काॅलेजला आहेत.
पथनाट्यात भेटलेला कलाकार शेरू आज जीवनाच्या रंगमंचावर एक यशस्वी माणूस ठरलेला आहे, हे नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१४-९-२०.
Leave a Reply