प्रभावी व्यक्तिमत्त्व : प्रभावी पुस्तकसंस्थेत असो, संघटनेत असो की व्यवसायात असो सर्वत्र नेतृत्व करावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. ज्याचे नेतृत्व आहे त्यांना ते यशस्वी व्हावे, असे वाटते. परंतु यशस्वी नेतृत्वासाठी हवे असते, प्रभावी व्यक्तिमत्त्व. तेव्हा आपले व्यक्तिमत्त्व प्रभावी कसे करावे आणि त्यातून यशस्वी नेतृत्व कसे साकारावे, हे सांगणारे छोटे परंतु बहुउपयोगी पुस्तक -विजय देशपांडे पृ. 56 किं. 50 रू. ISBN : 978-93-80232-08-9आज आम्ही जे काय घडलो ते आईमुळे. आमच्या व्यक्तिमत्त्वाचा जो काय थोडाफार विकास झाला असेल तो तिच्यामुळेच. तिने केलेल्या संस्कारांच्या अनेक बाबी आठवत आहेत. हे सर्व आठवण्याचे कारण असे की नागपूरस्थित नचिकेत प्रकाशनातर्फे प्रकाशित यशस्वी नेतृत्वासाठी प्रभावी व्यक्तिमत्त्व हे लेखक श्री. विजय देशपांडे यांचे छोटेखानी पुस्तक वाचावयास मिळाले आणि आईची आठवण झाली.
सांगावयाचा मुद्दा असा की या पुस्तकात त्यांनी एखाद्या व्यक्तीच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्याचा मूळ पाया तर आमच्याच नव्हे तर त्यावेळच्या प्रत्येक घरात कमीजास्त प्रमाणात घातला गेलेला आहे. आजची पिढी तशी नाही असे मला म्हणावयाचे नाही. उलट आजची पिढी आमच्याहूनही अधिक हुशार आहे. परंतु संस्काराचा फरक पडतो. संस्कार आमच्यावेळी होत होते, तसे या काळात होतात का? असे मनाला वाटून जाते. असो.
विजय देशपांडे यांनी प्रभावी व्यक्तिमत्त्व, या पुस्तकात व्यक्तिविकास हा कुटुंबासाठी, समाजासाठी, जेथे काम करतो त्या संस्थेसाठी व अखेरीस राष्ट्रासाठी किती आवश्यक आहे, याचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यांनी व्यक्तीच्या विकासाची सुरूवात कुटुंबापासून ते समाजातील विविध स्तरांवर कसकशी होत जाते हे दर्शविले आहे.
कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती सुशिक्षित व सुसंस्कृत असेल तर कुटुंब-स्वास्थ्य चांगले राहते. अशा स्वाथ्यसंपन्न कुटुंबामुळे समाजही स्वास्थ्य संपन्न होतो व पर्यायाने राष्ट्रही मजबूत होते. लहान बाळापासून ते वृद्धापर्यंत प्रत्येक स्त्री-पुरूष ही व्यक्तीच असते, अशी व्याख्या करून ही व्यक्ती अनुभवातून, मिळणार्या संस्कारातून स्वत:चा विकास करीत जाते.
संस्था व समाज यांचा आधार ही व्यक्तीच असते. या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व जेवढे प्रभावी तेवढी ती संस्था व समाज नावारूपास येत असते. तथापि व्यक्तिमत्त्वाचा विकास करत असतांना प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. स्वत:चा शारीरिक व बौद्धिक विकास करीत असतानाच इतरांकडे, समाजाकडे, आपल्या कामाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे याचे चिंतन केले पाहिजे.
एखादे काम आपल्यावर सोपविण्यात आल्यानंतर मग ते घरातील असो, समाजाचे असो की आपण ज्या ठिकाणी नोकरी, व्यवसाय करतो त्या कार्यालयातील असो त्याचे महत्त्व जाणून नियोजन करून ते चांगल्याप्रकारे तडीस नेणे व त्यासाठी लागणार्या बाबी योग्य प्रकारे हाताळणे आवश्यक असते. व्यक्तिमत्त्व जितके विकसित झाले असेल त्याप्रमाणात उद्दिष्ट पूर्तीसाठी लागणारा कालावधी निश्चित करणे तसेच नियोजन करणे सोपे व सुलभ होते. म्हणजेच नियोजनासाठी प्रभावी व्यक्तिमत्त्व आवश्यक आहे.
लेखक विजय देशपांडे यांनी व्यक्तिमत्त्व विकासासाठी संस्कार किती आवश्यक आहेत. हेही दर्शवून दिले आहे. सुसंस्कार म्हणजे व्यक्तीमधील चांगल्या गुणांची दखल घेऊन त्यांची जोपासना व वृद्धी करण्यासाठी केलेले योगदान, सुसंस्कार, मातृसंस्कार, कुटुंब संस्कार, शिक्षकांचे संस्कार, मित्रसंस्कार, परिसर संस्काराच्या माध्यमातून त्यांनी याचे महत्त्व पटवून दिले आहे.
एखादे काम वा ध्येय साध्य करण्यासाठी वेळेचे व्यवथापनही अत्यावश्यक आहे, हे देशपांडे यांनी या पुस्तकात सांगितले आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला देवाने दिवसाचे 24 तास दिले आहेत. एकाला 24 तास दुसर्याला 28 व तिसर्याला 20 तास असे तर वेळेचे वाटप होऊ शकत नाही. त्यामुळे वेळेचा उपयोग कसा करावा व आपले ध्येय कसे गाठावे, याची महती त्यांनी पुस्तकात सांगितले आहे. व्यक्तिचा विकास कितीही चांगला झाला असला तरी त्याच्यात जर निर्णय क्षमताच नसेल तर कार्य कसे होणार? चांगले व्यक्तिमत्त्व आपल्या कार्यात येणार्या अडचणी/समस्या कोणत्या हे ओळखून निर्णय घेत असते.
येशस्वी नेतृत्व या शेवटच्या भागात लेखकाने म्हटले आहे की, योग्यता, क्षमता व कौशल्य या गुणांवर आधारित लोकांना दिशा दाखविणे म्हणजे नेतृत्व असे समजावयाला हरकत नाही.
नेमून दिलेले काम प्रभावीपणे करण्यासाठी लोकांना नैतिक बळ देणे, सुयोग्य मार्गदर्शन करणे ही प्रक्रिया म्हणजे नेतृत्व होय, अशी व्यावसायिक दृष्ट्या केलेली व्याख्या होय.
लोकांमध्ये मिळून मिसळून राहणारी, त्यांच्या अडल्यानडल्या कामांत मदतीचा हातदेणारी व्यक्ती सर्वांनाच आवडत असते. अशा व्यक्तीचे नेतृत्व लोक मनापासून स्वीकारतात. गुणांना सद्वर्तनाची जोड मिळाल्यास नेतृत्व झळाळून उठते. बुद्धिवान असलेली प्रत्येकच व्यक्ती नेतृतव देऊ शकेलच, असेही नाही. कारण उच्च बुद्धयांक असलेल्या व्यक्ती नेतृत्व करताना दिसून येत नाहीत. याला काही अपवादही राहतील.
थोडक्यात विजय देशपांडे यांनी आपल्या या छोटे खानी पुस्तकात व्यक्ती, व्यक्ती विकास, समाज विकास, संस्था व संघटना आणि राष्ट्रविकास हा व्यक्तिविकासामुळे कसे शक्य आहे, हे परिश्रमपूर्वक सांगितले आहे.
नचिकेत प्रकाशन नागपूरनेही हे पुस्तक प्रकाशित करून लहानांपासून थोरांपर्यंत ते कसे वाचनीय व महत्त्वाचे हे पटवून दिले आहे. नचिकेतची मी आतापर्यंत वाचलेली पुस्तके लहानलहान परंतु फार मोठा आशय सांगणारी व बुद्धीला चालना देणारी आहेत. प्रत्येकाने जवळ बाळगवे असे हे पुस्तक आहे. किंमतही खिशाला परवडणारी आहे. मुखपृष्ठ वेधक आहे.
पुस्तक : यशस्वी नेतृत्वासाठी प्रभावी व्यक्तिमत्त्व लेखक : विजय देशपांडे, पाने : 51 किंमत : 50 रू. प्रकाशन : नचिकेत प्रकाशन, नागपूर-15 भ्र.9225210130
— मराठीसृष्टी टिम
Leave a Reply