नवीन लेखन...

आयुष्याचा गुंता आणि गुंतणं

सौ.धनश्री लेले लिखित सोनचाफ्याची फुले या पुस्तकात “सारा पसारा” हे शीर्षक असलेला आणि अगदी प्रत्येकाला आपलाच वाटावा असा अप्रतिम लेख आहे. तो वाचला म्हणण्यापेक्षा त्यांच्या संयत आणि प्रसन्न वाणित त्याचं अभिवाचन ऐकलं, आणि मनात याचं विषयावर लेख आकार घेऊ लागला.
आयुष्याचा गुंता आणि गुंतणं
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. माझा एक मित्र सांगत होता, म्हणाला, “अरे ! किती वर्षांनी घरातला माळा उपसला, तर जुनं बरचसं लोखंडी सामान वर धूळ खात पडलेलं . हलवायला सुद्धा येत नव्हतं , इतकं जड. बरं त्यामुळे माळ्यावर वजनही येत होतं त्यांचं. वैतागून म्हटलं, सगळं काढून भंगारवाल्याला देऊन टाकुया. माझं बोलणं ऐकून नाना काठी टेकत लगबगीने हजर झाले. म्हणाले, “अरे ओतीव लोखंड आहे ते. कशासाठीही उपयोगी येईल.”
मला हसावं की रडावं कळेना. म्हटलं, नाना ओतीव आहे म्हणून ठेवा. काही अर्थ आहे का याला ? आणि इतकी वर्ष पडलंय इथे, आजवर कशाकशासाठी उपयोग झाला सांगा ना? यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं पण त्या वस्तूंमध्ये अडकलेला जीव काही सुटत नव्हता. मी ऐकतच नाही म्हटल्यावर त्यांनी अखेरचं शस्त्र काढलं. म्हणाले, “इतकी वर्ष मी सुद्धा बिनकामाचा, निरूपयोगी, घरात पडूनच आहे. मलाही घरातून काढून टाका.”
पंचांहत्तरी ओलांडली तरी किती मोह या वस्तूंचा. अखेर बायको म्हणाली, “असुदे ! उतरा तुम्ही खाली. आपण बघू नंतर.” आणि ते सामान तसंच माळ्यावर पडून राहिलं. नाना आणि हिने एकमेकांना हळूच अंगठे दाखवून मनासारखं झाल्याचा आनंद व्यक्त केलेलं सुद्धा मी पाहिलं अरे.”
आता हिने नानांची बाजू घेण्यामागचं कारण सारखंच होतं. तिलाही जुन्या वस्तू कुठे सोडवतायत. हे पाहिजे, ते असुदे, हे कधीतरी उपयोगाला येईल, ते आठवण आहे माझी कुणाचीतरी. अशा निरानिराळ्या सबबींखाली ती सगळं ठेऊन देत असते. आपण ना प्रत्येक गोष्टीत गुंतून रहातो, स्वतःला गुंतवून घेत असतो आणि तो गुंता वाढवत नेतो. हे गुंतणच थांबवता यायला हवं. थोडक्यात विरक्त होणं जमलं पाहिजे सगळ्या मोह मायेमधून. पण कितीही वय झालं, संपूर्ण आयुष्य छान भोगून झालं, मुलं नातवंड मोठी झाली, सगळी सुखं भोगून झाली तरी ते मात्र आपल्याला जमत नाही. मोह काही सुटत नाही. नात्यांचा, मित्रांचा, मुलं, नातवंडांचा झालंच तर पंतवंडांचा त्यानंतर घरातल्या वस्तूंचा, भांड्यांचा, घरातल्या बारीकसारीक अनेक गोष्टींचा, साठत गेलेला आणि उतारवयात प्रचंड मोठा झालेला मोहमयी गुंता. त्यावेळी अगदी सोडवायचा म्हटलं तरी तो सुटत नाही आणि त्या गुंत्यात अडकलेला जीव काही त्याविना राहू शकत नाही.
मी अनेकदा बेडरूम मधल्या युनिट वरच्या खणात, असच जुनं सामान भरून ठेवलेल्या बॅगा, मोठ्ठया पिशव्या,
“आतलं सगळं आज मी फेकून देणार”असं म्हणत खाली घेतो. मग एका बॅगेत लेकीची लहानपणची इवलाली झबली, टोपरी, छोटे छोटे गोड फ्रॉक, छोट्या रंगीबेरंगी कपड्याच्या तुकड्यानी शिवलेल्या गोधड्या एक एक करून बाहेर येतात, दुसऱ्या बॅगेतून लेकाचे लहानपणचे कपडे, स्काउटचा गणवेश, खेळणी, छोटी जीन्स, जुने अल्बम बाहेर पडतात. पडदे लावण्यासाठी आणलेल्या बारचे उरलेले तुकडे, जास्तीच्या उरलेल्या जमिनीच्या लाद्या तर पुढच्या बॅगेत असतो चकचकित नव्याकोऱ्या स्टीलच्या अनेकविध भांड्यांचा खजिना. तो उघडला की त्यामागचा इतिहास घेऊनच बाहेर येतो. प्रत्येक वस्तुमागे एक नातं असतं. हा सेट, हे भांडं, ही ताटं वाट्या, हा कॅसरोल, ही परात कुणी आणि कधी दिली याची जंत्री हिच्या तोंडावर असते. त्या वस्तुंबरोबर माहेर सासरच्या अनेक गोष्टींची ( चांगल्या कमी, वाईट जास्त )उजळणी होते. मी हे टाकुया म्हटलं की ही म्हणते, “अरे हे माझ्या आईने दिलंय मला.” तिने ते काढूया म्हटलं की मी ही म्हणतो, “अगं असुदे ! बाबांची एकच आठवण आहे.” यामध्ये बंद पडलेलं गजराचं घड्याळही बाहेर येतं आणि “आठवण आहे ” म्हणून पुन्हा आत जातं. काय टाकायचं आणि काय ठेवायचं यावर एकमत काही होत नाही आणि पुन्हा सगळंच्या सगळं आत जाऊन बॅगा होत्या तशा आपल्या जागेवर स्थानापन्न होतात.
माझा एका ऑफिस सहकारी विदेशात गेला असताना तिथून एक टी सेट त्याला फार आवडला म्हणून घेऊन आला. तो अविवाहित त्यामुळे तसा त्याला फारसा उपयोग नव्हता. त्याने मला विचारलं. टी सेट फारच सुंदर होता. त्यावर केलेलं नाजूक नक्षीकाम, त्याची घडण फारच सुरेख होती. आमच्या जवळच्या नात्यात एक लग्न काही दिवसांतच होणार होतं. भेट द्यायला छानच आहे या विचाराने आम्ही तो विकत घेतला. घरी आणल्यावर ही रोज त्याचा खोका उघडून आणि त्याला मनसोक्त पाहून पुन्हा ठेवून देत होती. मलाही कळतं नव्हतं हिचं काय चाललंय. आणि एकदा अचानक म्हणाली,
“हा सेट आपल्याला ठेवायचा. आपण भेट देण्यासाठी दुसरा घेऊया.”
मी म्हटलं, “अगं ! आधीचे दोन सेट शोकेसमधून नेहमी आपल्याकडे टकामका पहात असतात, मला वापरा ! मला वापरा ! म्हणत. ते अजुन तस्सेच पडलेयत, आणि……..” पण माझं बोलणं नाटकातल्याप्रमाणे मध्येच तोडत ही म्हणाली,
“नाही ! मी देणारच नाही. आपण हा ठेवायचा.”……”मी हा आपल्या लेकीला देईन तिच्या लग्नात.”
कप्पाळ ! आपल्याला पडलेला लोभ लपवण्यासाठी दिलेलं फक्त एक कारण. आज तो सेट घेतल्याची सिल्वर ज्यूबिली होऊन गेलीय. पडलाय बिचारा शोकेसमध्ये. लेकीचं लग्नही झालं, त्यावेळी मी आठवण दिली हिला. तर लेकच म्हणाली,
“मला नको तो जुना सेट. आणि माझ्या सासरी आधीच तीन सेट आहेत.”
चला सुंठीवाचुन खोकला गेला. हिचा जीव भांड्यात पडला. किती हव्यास करायचा? किती साठवणूक करायची? आणि या सगळ्यात किती गुंतायचं? कशासाठी ही शोकेसची भर ? का असं वाटत नाही? सगळ्या साठवलेल्या, कौतुकाने घेतलेल्या वस्तू समाधानाने अगदी मनापासून दुसऱ्या कुणाला द्याव्यात आणि त्याच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद पहावा. आपली वस्तू प्रेमाने दुसऱ्याकडे शेअर करावी. पण जमत नाही हे. सगळ्याना आम्ही मिठी मारून बसतो. ही मिठी ‘लोभ स’ म्हणजे लोभ न संपणारी असते.
कधी सुटायचं हे गुंतून राहणं? आणि कधी बाहेर येणार आपण या गुंत्यातून? नात्यामधला गुंताही तसाच. मुलं मोठी झाली, त्यांची लग्न झाली, सगळं व्यवस्थित समजूतदारपणे करू लागली तरी आपण त्यांच्या मागे मागे रहायचं काही सोडत नाही. प्रत्येक गोष्टीत आपण त्यांना सुधारणा सुचवतच असतो. एकवेळ सल्लागाराच्या खुर्चीत बसणं चांगलं. मागितला तर दिला, नाहीतर ठेवला आपल्याकडेच. चुकुदे की त्यांचा निर्णय. काय होईल फार तर? पण समजेल ना त्यांना आपली चूक. पण आपल्याला रहावत नाही आणि गुंतून रहाणं काही सुटत नाही. लेकीचं लग्न झाल्यावरही कित्येक आईवडील आपले सल्ले मुलीपर्यंत फोनवरून पोहोचवतच असतात. कशाला ? संसार करून दिलात ना आता सोडवतील ते आपले प्रश्न. मुलं गडबडून गेली की फक्त आम्ही आहोत हा आधार द्यायचा. स्विमिंग पुलमध्ये कसं लहानग्यांच्या पोटाखाली फक्त तळहात ठेवतात आधारासाठी. मग ती आपसूकच छान हातपाय मारायला लागतात. आपण हे नं करता त्यांना जवळ घेत, छातीशी कवटाळत उचलून घेत रहातो त्यामुळे त्यांच्या नाकातोंडांत पाणी जात नाही आणि आपणहून काठ कसा गाठायचा हेच त्यांना कळतं नाही. लेकीला इकडे जन्मदाते तिकडे आयुष्याचा जोडीदार. कुणाला सांभाळू असं होतं. तिचाही नवीन संसार असतो आणि तिनेही आपला आपला गुंता वाढवायला सुरवात केलेली असते. मग त्यात आपली भर टाकून कशाला तिचा गुंता वाढवायचा. आपण जरासं बाजुला होऊन आपल्या गुंत्यातून तरी तिला मोकळं करायला हवं ना ?
आपल्याला ना सगळंच हवं असतं. काही ना काही सांगायचं असतं, समोरच्याने ते ऐकायला हवं असतं, नाही ऐकलं तर आपल्याला ते फार लागतं, मग आपल्याला समजून घेत नाहीत म्हणून आपण गळा काढतो. एकूण काय तर सगळ्या दोऱ्या आपल्या हातात हव्या असतात. गुंतवणूक वाढत जाते, मग त्यावरच्या व्याजाची अपेक्षा असते आणि मुद्दल तर हवंच असतं.
घर इतकी वर्ष आपण सांभाळलं, आपल्याला हवं तसं सजवलं. आता मुलं म्हणतायत त्याप्रमाणे त्यांना करुदे, जे नको ते काढूडे, हवय ते आणूदे. त्यातली आपली आसक्ती काढून घेऊया, नव्याचा आनंद घेऊया. नाक मुरडण्यापेक्षा मनापासून कौतुक करूया. अगदी आपल्याला हवं तस्संच कसं सगळं होईल. हे नको टाकूस ! ते तुझ्या आजोबांचं आहे, ती माझी आठवण आहे, ते तुझ्या आज्जीने मला दिलंय किंवा हे नको टाकूस कारण ओतीव लोखंडाचं आहे म्हणून, ते का? तर जुनं नक्षीकाम आहे म्हणून, त्याचं काय? तर असं डिझाईन आता पहायला मिळत नाही म्हणून , आणि मग ते? तर त्याने किती जागा अडतेय, राहूदे ! आणि हे सगळं का करायचं?तर मी सांगतेय /सांगतोय म्हणून. म्हणजे आपल्या भोवती गुंता फिरत ठेवायचा आणि त्याच्या मध्यावर रहाण्याचा आनंद घ्यायचा.
आपली साठी उलटली,आपण ज्येष्ठ नागरिक झालो. आता माझं माझं म्हणत सगळ्याला कवटाळत राहायचं? की आपलं मन मोठं करून या सगळ्या लोभातून दूर व्हायचं? गुंता आपल्यापुरता तरी थांबवायचा. नात्यांचा, भावनांचा पसारा आणखी नं वाढवता तो आवरायला घ्यायचा. अखेर कुठे घेऊन जाणार त्याला? नात्यांमधला, वस्तूंमधला लोभ, हव्यास, त्यात गुंतलेलं मन आणि या सगळ्याचा वाढलेला गुंता इथेच सोडून अनासक्तपणे जायचंय. एव्हढं लक्षात असावं इतकंच.
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..