पंचवीस वर्षांपूर्वीच्या पावसाळ्यातील गोष्ट आहे. आम्ही दोघे ऑफिस बंद करुन रात्री आठच्या सुमारास घरी जाण्यासाठी साहित्य परिषदेच्या बस स्टाॅपवर उभे होतो. पाऊस तर मुसळधार पडत होता. बराच वेळ कोणतीही बस न आल्याने बस स्टाॅपवरील माणसं वैतागली होती. आमच्या घराजवळच राहणारे एक आजोबा जवळ आले आणि म्हणाले, ‘या पावसात कुणीतरी कार घेऊन यावं आणि आपल्या तिघांना घरी पोहोचवावं!’ त्यांचं हे बोलणं पूर्ण होईपर्यंत एक कार आमच्या जवळ येऊन उभी राहिली. आतून कार चालविणाऱ्या व्यक्तीने हाक मारली, ‘रमेश, आत ये. तुम्हाला मी घरी सोडतो.’ आम्ही तिघेही कुडकुडत कारमध्ये बसलो. दहा मिनिटात घरी पोहोचलो. तो लिफ्ट देणारा होता, आमचा परममित्र सुनील गोकर्ण!
सुनील तब्येतीनं पहिल्यापासूनच सुदृढ गटातला. सर्व साधारण उंचीचा, कुरळ्या केसांचा भांग पाडलेला, आत्मविश्वासपूर्ण डोळे, नाक गरुडासारखं बाकदार, कायम हसऱ्या चेहऱ्याचा ‘हॅपी गो लकी’ माणूस!
रमेश महाराष्ट्र विद्यालयात शिकत असताना ‘स्काॅलर’ असलेला सुनील त्याच्याच वर्गात होता. चित्रकलेच्या समान आवडीतून दोघांची घनिष्ट मैत्री झाली. चित्रकला शिकविणाऱ्या शां. पि. देवळेकर सरांचे दोघेही आवडते शिष्य होते.
सुनील रहायचा रेणुका स्वरुप शाळेच्या कोपऱ्यावर. आम्ही त्याच्याकडे नेहमीच जायचो. त्याचे वडील रेल्वेच्या नोकरीत होते. मोठा भाऊ आणि बहीण दोघेही नोकरी करीत होते. आईची नेहमी भेट होत असे. त्याच्याकडे सिने कलादिग्दर्शक दीनानाथ चव्हाण यांनी केलेली कादंबऱ्यांची ओरिजीनल मुखपृष्ठं आम्हाला पहायला मिळाली. अप्रतिम रंगसंगती असलेली ती मुखपृष्ठं आम्ही पहातच रहायचो. चव्हाणांच्या चित्रांपासून प्रेरणा घेऊन सुनील तशीच चित्रं काढू लागला. त्याचं हस्ताक्षरही सुंदर होते.
सुनीलकडेच आम्हाला तात्या ऐतवडेकर भेटले. ते सायकलवरून सुनीलकडे यायचे. तात्यांकडून सुनीलने पहिला प्रॅक्टीका नावाचा जॅपनीज ३५ एमएम एसएलआर कॅमेरा विकत घेतला. तेव्हा आम्हाला त्याचं कौतुक वाटलं. सुनील सारखंच मलाही फोटोग्राफीचं भयंकर वेड होतं!
‘वाटसरु’ नावाच्या कथेवरून आम्ही चौघांनी फोटो शूट करायचं ठरवलं. युनिव्हर्सिटीच्या परिसरात दिवसभर भटकंती करुन भरपूर फोटो काढले. एकदा रेल्वे स्टेशनवर जाऊन रूळावरून पळत जाताना फोटो काढले. त्यासाठी पर्वतीवर, हनुमान टेकडीवर देखील गेलो होतो. आता ते फोटो पाहिल्यावर हसू येतं!!
याच काळात सुनीलने शेजारील महाराव वाड्यात एक खोली भाड्याने घेतलेली होती. तिथे डार्करुम केली होती. कधी आमच्या घरी पाहुणे आले की, आम्ही झोपायला त्या खोलीवर जायचो. आम्ही दोघे, सुनील, भालचंद्र जोशी, सुधीर खरे रात्रभर गप्पा मारत उशीरा झोपी जायचो. मला फोटो डेव्हलपिंग प्रिंटींग करण्याची इच्छा होती. सुनीलला मी डार्करुम वापरु का? असे विचारले. त्याने अल्प भाड्यात मला परवानगी दिली. सर्व साहित्य खरेदी करून मी चार महिने डार्करुम वापरली. खूप अनुभव मिळाला, बरंच शिकता आलं.
एका दिवाळीच्या आधी हाताने केलेल्या ग्रिटींग्जचं प्रदर्शन सहा मित्रांनी मिळून गोखले हाॅलमध्ये भरवलं. विक्रीतून झालेल्या अर्थप्राप्तीवर आम्ही चौघांनी ‘जीवाची मुंबई’ केली. मुंबईत खूप भटकलो, फोटो काढले, पिक्चर पाहिले.
एकदा सुनीलला कल्पना सुचली. आपण एक प्लेन कलरची साडी खरेदी करून तिघांना शर्ट शिवू. झालं, एक ब्राऊन कलरची साडी आणून तीन शर्ट शिवले. ते कापड इतके पातळ होते की, त्याला इस्त्रीने प्लेन करताच येत नसे.
सुनीलची अकरावी झाल्यानंतर त्याला उत्तम मार्क पडल्याने घरच्यांनी सायन्सलाच जायला लावले. तो इच्छेविरुद्ध गेला. पुढच्याच वर्षी त्याने अभिनवला प्रवेश घेतला. रमेशच्या नंतर तो वर्षभराने बाहेर पडला. त्या गॅपमुळे त्याच्याशी संपर्क कमी राहिला.
वर्षं भरभर जात होती. दरम्यान सुनीलचे वडील गेले. भाऊ व बहिणीचे लग्न झाले. सुनील त्याच्या मित्राबरोबर व्यवसाय करु लागला. फोटोग्राफी व प्रिंटींगच्या कामामध्ये व्यस्त झाला. कामाच्या निमित्ताने परदेशात जाऊन आला. आमच्या भेटीगाठी अभावानेच होत होत्या.
सुनीलचे लग्न झाले. तो रहायला बिबवेवाडी येथील महेश सोसायटीमध्ये गेला. आम्ही नवीन काॅम्प्युटर खरेदी करताना त्याचे सहकार्य घेतले. त्याच्या ओळखीतूनच खरेदी झाली. सुनीलने आम्हाला घरी बोलावले. आम्ही पत्ता शोधत बंगल्यावर पोहोचलो. आम्हा दोघांना पाहून त्याच्या आईला अतिशय आनंद झाला. वहिनी भेटल्या. त्यावेळी सुनीलचा मुलगा काॅलेज करीत होता.
एके दिवशी सुनील, शाळेतील चित्रकलेचे शिक्षक देवळेकर सरांना त्याच्या कारमधून ऑफिसवर घेऊन आला. सर आता थकलेले दिसत होते. तिघांच्याही जुन्या आठवणींच्या गप्पा रंगल्या. चहापाणी झाले. सर नकळत रमेशला बोलून गेले, ‘सुनील माझा सर्वांत आवडता विद्यार्थी. त्याने आज मला त्याच्या गाडीतून तुझ्याकडे आणलं. मला त्याचा अभिमान वाटतो.’ हे ऐकून रमेश खजील झाला.
बऱ्याच वर्षांनंतर सुनीलचा रमेशला फोन आला. त्याला खेड्यात यात्रेच्या प्रसंगी खेळल्या जाणाऱ्या ‘गोफ नृत्य’चे फोटो फिचर करायचे होते. आमचे साताऱ्यातील नथू मामाच्या गांवी हे फोटो फिचर करायचे नक्की केले. आम्ही दोघे व सुनील आणि त्याचा मित्र असे चौघे सकाळी कारने निघालो. रमत गमत दुपारी पोहोचलो. रात्री नऊ वाजता ‘गोफ नृत्य’ सुरू झाले. सुनीलने भरपूर फोटो काढले. रात्री एक वाजता आम्ही जमिनीला पाठ टेकवली. सकाळी लवकर उठून आवरले व मामाचा निरोप घेऊन निघालो. वाटेत निवांतपणे जेवण केले. संध्याकाळी पुण्यात पोहोचलो.
फोटो फिचर कसं झालंय, याची उत्सुकता होतीच. एका रविवारी आम्ही दोघं सुनीलकडे गेलो. मागे गेलो असताना आई भेटली होती. मधल्या काळात ती गेलेली होती. मुलांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याचे लग्न झाले होते. त्या दोघांनाही परदेशातील नोकरीची संधी मिळाली होती. वहिनींनी तिघांनाही काॅफी दिली. आम्ही दोघं सुनील बरोबर वरच्या रुममध्ये गेलो. ॲपलच्या मोठ्या पीसीवर सुनीलने सर्व फोटो दाखवले, पुन्हा डोळ्यांसमोर ती अविस्मरणीय रात्र उभी राहिली.
आता सुनीलची भेट फेसबुकवर होते. मधेआधे त्याचा फोन येतो. करी रमेश त्याला फोन करतो. अलिकडे या इलोक्ट्राॅनिक माध्यमानेच माणसं जोडली गेलेली आहेत. जो पर्यंत ‘नेट’ आहे, तोपर्यंत सगळं ‘सेट’ आहे…
सुनील तसा नशीबवान आहे, त्याला जीवनातील प्रत्येक टप्प्यावर हव्या असलेत्या गोष्टी वेळेवर मिळत गेल्या. आता जीवनाच्या उत्तरार्धात सर्व काही ‘सेटल’ आहे. यश, पैसा, समृद्धीने सुनील तृप्त आहे. अशा सुखी माणसाचा ‘सदरा’ कुणाला नको वाटेल?
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२१-८-२०.
Leave a Reply