नवीन लेखन...

सांगता (माझी लंडनवारी – 30)

रविवार सकाळ उजाडली.खूप अधिरतेने मी सगळं आवरलं. एक लंच कम ब्रेकफास्ट कसाबसा उरकला. आणि लंडन वेळेप्रमाणे ११ वाजता मी घर लॉक करुन किल्ली परत शेजारी काकूंकडे देऊन, ’लवकरच भेटू’ असा वादा करुन एअरपोर्टकडे निघाले.

जरी मी बरचसं सामान मागे ठेवून आणि हलकं सामान घेऊन निघाले असले तरी आलेले अनुभव, मिळालेले दोस्त, अनेक चांगल्या आठवणी आणि घराची ओढ व लंडनच आपलेपण ह्यांच्या संमिश्र भावनांच ओझ बरोबर होते.

एअरपोर्टवरचे सर्व सोपस्कार एखाद्या सरईतासारखे पार पाडले. माझं फ्लाईट दुपारी  २-२.१५ च होतं. हातात आता बऱ्यापैकी वेळ होता. मग मी शॉपिंग करावं ह्या हेतूने वेगवेगळी दुकाने फिरले. तिथल्या किमती ऐकून ‘दुरुन डोंगर साजरे. बसा आहे तिथेच’असं म्हणत मी लांबूनच राम राम केला. नाही म्हणायला चॉकलेटस्, लेदर शूज, पर्फ्युम घेतले आणि ते सगळं ठेवयला एक हॅन्डबॅग. झालं! म्हणजे परत येताना जी अवस्था झाली होती, साधारण तीच वेळ आली. म्हणजे दुबई शॉपिंग मॉल परत जड बॅग घेऊन फिरा किंवा बसा एका ठिकाणी स्वस्थ! परत येताना दुबईला ३ तास हॉल्ट होता. बघू! पुढचं पुढे असं म्हणत योग्य वेळी बोर्डिंग केले आणि प्लेनही ठरलेल्या वेळेत निघाले.

निघाले म्हणजे टॅक्सी वे हटला. वेगवेगळ्या मशिनचे आवाज सुरु झाले. प्लेन उगिचंच छोटे छोटे गचके घेत, इकडून तिकडून वळणे घेत फिरु लागले. किती तरी वेळ ते असचं ईकडे तिकडे भटकत राहिले. शेवटी मला असं वाटलं कॉकपीट मधे जाऊन पायलटला आठवण करुन द्यावी,’अरे! हे उडतं पण बर का!’ तर असा सहनशक्तीचा अंत बघून शेवटी ३.४५ ला प्लेनने फायनली टेक ऑफ घेतले. म्हणजे स्टॅंडवरची बस सरतेशेवटी सड्यावर आली तर! लंडनच्या विमानाने सड्यावर यायला रत्नागिरीच्या एश्.टी. एव्हढाच वेळ घेतला. आधीच १-१.५ तास उशिराने निघालेले प्लेन, दुबईला लॅंडिंग सिग्नल नसल्यामुळे वरच फिरत बसले पाऊण एक तास! लंडनला येताना कुठेही जास्त वेळ न घेणार्या प्लेनच्या आज अगदी अंगात आलं होतं. सरते शेवटी रात्री १.३०च्या सुमारास आम्ही लॅन्ड झालो. पुढची फ्लाईट दुबईच्या वेळेनुसार ३-३.१५ ला होते. म्हणजे जेमतेमच वेळ होता हातात!

मला तर डिजिटल कॅमेरा घ्यायचा होता. पटकन कॅमेऱ्याच्या शॉपमधे गेले. तो बिचारा खूप जेनुईनली वेगवेगळे प्रकार दाखवत होता. कुठला कॅमेरा घ्यायचा हे मी लंडनमधे आधीच विचारुन ठेवले होते. ५ मिनिटात मी कॅमेरा घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या गेटकडे प्रस्थान केले होते. भाजी घ्यायला पण वेळ लागेल एखाद्याला! इतक्या पटकन कॅमेरा घेतला गेला.

आता मात्र वेळेत उड्डाण झाले. डोळे बंद केले आणि माझ्या डोळ्यांसमोरुन लंडनमधे जगलेले क्षण अन् क्षण एखाद्या चित्रपटासारखे सरकू लागले. ऊघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न तर नव्हते ना?

मोहक थेम्सने माझे डोळे ओले केले. ‘परत येणार आहेस तु,’ असा दिलासा देत कोहिनूरने माझ्या डोळ्यात चमक आणली. लॉर्ड्सची रॉयल्टी आणि विम्बलडनची राणीप्रती लॉयल्टी मनात घर करुन बसली होती. मन रिजंटस् पार्क, हाईड पार्क, केनसिंग्टन गार्डनच्या हिरवाईने व्यापले होते. लंडन आयची भव्यता मन दिपवून टाकत होती. ग्रिनिचला जाता-येतानाच्या प्रवासाची जादू अजूनही अंगावर रोमांच खडे करत होती. लंडन शहराची सुरेख बांधणी, स्वच्छता मनात आरशासारखी लखलखीत होती. टॉवर ब्रिजचे प्रगत दर्शन आणि अचंबित करणारे बोलके पुतळे अजूनही स्तंभित करत होते. लंडनची शिस्तबध्दता, सौजन्य, पाहुणचार मनावर रुंजी घालत होता. परक्या देशात भेटलेले सुह्रद ह्या सगळ्या चित्रपटाचा अविभाज्य घटक बनले होते. अशा स्वप्नील आठवणींमधे मुंबई कधी आले कळलेच नाही.

माझ्या साता समुद्रापलिकडील सात आठवड्याच्या सफरीची सांगता मुंबईमधे श्रावणातल्या सप्तरंगी इंद्रधनुष्याने झाली. आणि राखी पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राने त्या सफरीला चार चांद लावले!

यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..