एडविन हॉवर्ड आर्मस्ट्रांग यांचा जन्म १८ डिसेंबर १८९० रोजी न्यूयॉर्क येथे झाला.
रेडिओचं बटण फिरवून हव्या त्या फ्रिक्वेन्सीवरचा कार्यक्रम निवडणं ही तशी वेडगळ कल्पना;पण आर्मस्ट्रॉंगनं खचून न जाता जिद्दीनं त्याचा पाठपुरावा केला आणि ‘एफएम’चा जन्म झाला. बिनतारी संदेशवहनाच्या बाबतीत त्यानं ४ मूलभूत शोध लावले. त्या धावपळीत त्यानं पेटंटविषयीच्या अनेक लढती गमावल्या.
रेडिओ विज्ञानाचे जनकत्त्व ज्या काही मोजक्या शास्त्रज्ञांकडे जातें, त्यांपैकी काही म्हणजे जगदीशचंद्र बोस,मार्कोनी ई. टीव्हीचा प्रसार आणि प्रचार होण्यापूर्वी फक्त आवाजरुपी मनोरंजनाची दोनच माध्यमं होती. एक रेडिओ आणि दुसरे ग्रामोफोन. ग्रामोफोन हे श्रीमंतीचं लक्षण असल्यामुळे मोजक्याच लोकांकडे असायचे. रेडिओने मात्र आपले हातपाय चांगलेच पसरले होते. रेडिओचा शोध लागला तेव्हा गाणारी बाई आत बसली आहे, यावर अनेकांचा “विश्वास” होता. त्याच्या मागे ‘फ्रिक्वेन्सी मॉडय़ुलेशन’ (एफएम) नावाची संकल्पना असते. आज आपण सर्रास एफएम रेडिओ ऐकतो. या संदर्भात खूप हसं होऊनही निराश न होता आर्मस्ट्रॉंगनच तिचा शोध लावला होता.
लहानपणी एकदा कॉलरा झाल्यामुळे आर्मस्ट्रॉंग एकदा बराच काळ शाळेत न जाता घरी नुसता पुस्तकांचा फडशा पाडत होता. तेव्हा त्यानं विज्ञानाविषयीची आणि बरीच पुस्तकं वाचली, आणि त्यामुळे तो भारावूनच गेला ! मायकेल फॅरेडे आणि गुग्लिएल्मो मार्कोनी हे त्याचे आदर्श बनले. उंचपुऱ्या आर्मस्ट्रॉंगनं मग बिनतारी संदेशांच्या बाबतीतले आपले प्रयोग आपल्या घरीच सुरू केले! १९०९ साली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यावर आर्मस्ट्रॉंग कॉलेजात आपल्या लाल रंगाच्या मोटारसायकलवरून भरधाव जात असे. त्याच दशकात अनुक्रमे मार्कोनी आणि फेसेन्डेन यांनी आपल्या बिनतारी लहरींच्या माध्यमातून होणारी संदेश आणि आवाज यांची करामत दाखवली होती. तसंच ‘वायरलेस’ या शब्दाची जागा आता ‘रेडिओ’ (म्हणजे लॅटिन भाषेत प्रकाशकिरण) या शब्दानं घेतली होती. कोलंबियामध्ये प्युपिन नावाच्या एका गाजलेल्या प्राध्यापकाकडून आर्मस्ट्रॉंगला बरंच काही शिकायला मिळालं.
१९१२ साली आर्मस्ट्रॉंग आपले नेहमीचे खटाटोप करत असताना त्याला अचानक नेहमी ऐकायला अतिशय अवघड असलेल्या दूरवरच्या रेडिओ स्टेशनचे कार्यक्रम अचानक एकदम स्पष्टपणे ऐकायला यायला लागले. त्यामुळे खुशीनं नाचतच तो आपल्या झोपलेल्या बहिणीच्या खोलीत शिरला आणि तिला त्यानं ते प्रक्षेपण ऐकवलं ! पण आर्मस्ट्रॉंग आपल्या संशोधनाविषयी इतकी गुप्तता बाळगायचा की त्याविषयी तो लिहूनपण ठेवायचा नाही ! त्याला या संशोधनाविषयीचं पेटंट घ्यायचं होतं. पण त्यासाठी लागणारे १५० डॉलर्स त्याला द्यायला त्याचे वडील तयार नव्हते ! यातूनच नंतर द फॉरेस्टनं या उपकरणाचं पेटंट मिळवलं आणि आर्मस्ट्रॉंगशी त्याचं चांगलंच वाजलं ! आपल्या मायकेल फॅरेडे या दैवताप्रमाणेच आर्मस्ट्रॉंगला गणिती समीकरणांमध्ये गुंतून न पडता प्रत्यक्ष प्रयोग करून बघायला आवडायचं. पण फॅरेडेसारखी सुंदर लेखनशैली त्याला लाभली नसल्यामुळे कसाबसा तो आपल्या संशोधनाविषयीचे अहवाल लिहायचा.
आर्मस्ट्रॉंगनं डेव्हिड सारनॉफच्या साथीत अनेक संशोधनं केली. त्यांनी मिळून पहिला ‘पोर्टेबल’ रेडिओसुद्धा बनवला. त्यांच्या कंपनीतल्या एका सेक्रेटरीशीच आर्मस्ट्रॉंगनं लग्न केलं. यानंतर आर्मस्ट्रॉंगचा द फॉरेस्टशी पेटंटवरून लढा सुरू झाला. खरं म्हणजे द फॉरेस्टचा यात पराभव होईल असं वाटत होतं. कारण द फॉरेस्टनं सांगितलेल्या काही गोष्टी आणि कागदपत्रांमधल्या नोंदी तसंच साक्षीदारांची जबानी या सगळ्यांमध्ये खूप तफावत होती. त्यामुळे १९२२ साली न्यायालयानं आर्मस्ट्रॉंगच्या बाजूनं निकाल दिला. पण जवळजवळ कर्जबाजारी झालेल्या द फॉरेस्टला माफ करून या खटल्यातून आणि एकूणच या पेटंटच्या वादातून मुक्त करून टाकायची हाताशी आलेली संधी आर्मस्ट्रॉंगनं गमावली. या निकालानं द फॉरेस्ट पुरेसा चिथावला गेला नाही असं वाटलं म्हणून की काय पण आर्मस्ट्रॉंगनं चक्क द फॉरेस्टला त्याच्या घराच्या गच्चीतून दिसेल असा एक झेंडा आपल्या घराच्या गच्चीत फडकावून त्यावर त्या पेटंटचा क्रमांक लिहिला ! यामुळे भडकलेल्या द फॉरेस्टनं कोलंबियाच्या राज्य पातळीवरच्या न्यायालयात आर्मस्ट्रॉंगनं आपल्या पेटंटची चोरी केल्याचा दावा दाखल केला. १९२४ साली या न्यायालयानं द फॉरेस्टच्या बाजूनं निकाल दिला ! बाजी पलटल्यामुळे आता आर्मस्ट्रॉंगनं अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले; पण १० वर्षं चाललेल्या या खटल्याचा शेवट द फॉरेस्टच्या विजयात झाला ! त्यामुळे निराश झालेल्या आर्मस्ट्रॉंगनं १९१८ साली ‘इन्स्टिट्यूट ऑॅफ रेडिओ इंजिनियर्स’नं त्याला दिलेलं मानाचं सुवर्णपदक त्यांना एका जाहीर कार्यक्रमात परत केलं; पण त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी ते परत घ्यायला नकार दिला आणि तिथे हजर असलेल्या सुमारे १००० इंजिनिअर्सनी उभं राहून टाळ्यांच्या कडकडाटात आर्मस्ट्रॉंगचं कौतुक केलं.
द फॉरेस्टबरोबरचा खटला हरूनही आर्मस्ट्रॉंगनं धीर सोडला नाही. त्या काळात रेडिओवरचे कार्यक्रम फक्त ‘एएम’ (ॲम्प्लिट्युड मॉड्युलेशन) तंत्रज्ञानावर चालायचे. पण त्यात खूप खरखर ऐकू यायची (जी आजही आपल्याला ऐकू येते). मग त्यावर उपाय शोधण्याविषयी याविषयी आर्मस्ट्रॉंगचं संशोधन सुरू झालं. मग वेगवेगळे कार्यक्रम निरनिराळ्या ‘फ्रिक्वेन्सी’ वरून पाठवता येतील असा विचार त्याच्या मनात आला. फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदात किती वेळा बिनतारी लहर वर-खाली होते तो आकडा. उदाहरणार्थ हा आकडा साधारण ३०० ते ३३०० असेल तर आपल्या कानांना या पट्ट्यांमधल्या लहरींचा आवाज ऐकू येतो. तो आकडा हेन्रिटझ हटर्झच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘हटर्झ’मध्ये मोजतात. मग अशा उपलब्ध असलेल्या सगळ्या आवाजांच्या लहरींच्या पट्ट्यांचे छोटे छोटे विभाग करून त्या प्रत्येक विभागातून वेगळा कार्यक्रम प्रसारित केला तर? मग आपल्या घरातल्या रेडिओचं बटण फिरवून आपण त्यातल्या हव्या त्या फ्रिक्वेन्सीवरचा कार्यक्रम निवडू शकू अशी ही कल्पना. सुरुवातीला सगळ्यांना हे वेडगळपणाचं वाटलं. पण आर्मस्ट्रॉंगनं खचून न जाता जिद्दीनं त्याचा पाठपुरावा केला आणि ‘एफएम रेडिओ’ला जन्म दिला ! १९३५ साली त्याचं प्रात्यक्षिक आर्मस्ट्रॉंगनं लोकांना दिलं तेव्हा एएम रेडिओच्या तुलनेत तो खूप स्पष्ट ऐकू येत असल्यामुळे लोक आश्चर्यचकितच झाले !
यानंतर आर्मस्ट्रॉंगनं ‘एफएम’ तंत्रज्ञानाशी संबंधित असलेलं बरंच काम केलं. त्याला अनेक मानसन्मानही मिळाले. पण त्याचबरोबर पेटंट्सवरून चालणाऱ्या लढ्यांपासून काही त्याची सुटका झाली नाही. आर्मस्ट्रॉंग हा सच्चा संशोधक होता. त्याला पैसा, शेअर्स, बंगले, गाड्या यांच्याशी काही घेणं-देणं नसे. पण नवनवी संशोधनं करत राहायची झिंग मात्र त्याच्यात सतत असे. त्यापायी अनेक जणांशी त्याचे वादविवाद होऊन प्रकरण न्यायालयात जात असे. त्यातून त्याला बरेचदा नैराश्य यायचं. एकदा या नैराश्याचा इतका कहर झाला की ३१ जानेवारी १९५४ या दिवशी अतिशय विमनस्क मानसिक अवस्थेत असलेल्या आर्मस्ट्रॉंगनं २ पानी पत्रात आपल्या हाराकिरीविषयी लिहून ठेवलं आणि आपली हॅट आणि कोट घालून तो राहात असलेल्या १३ व्या मजल्यावरून उडी मारून आपला जीव दिला !
कहर म्हणजे ज्या प्रकरणामुळे आर्मस्ट्रॉंगनं आत्महत्या केली त्या प्रकरणाचा पिच्छा न सोडता त्याच्या बायकोनं त्याच्या पश्चात लढा सुरूच ठेवला आणि शेवटी त्याचा निकाल आर्मस्ट्रॉंगच्या बाजूनं लागला ! पण हा गोड शेवट बघायला आर्मस्ट्रॉंग जिवंत होताच कुठे?
आता देशात खासगी एफएम वाहिन्यांचं जाळं पसरलं आहे. रेडिओचा सुवर्णकाळ टीव्हीने संपवला,आता रेडिओयुग संपलं असं वाटत असतानाच एफएमच्या रूपात ते पुन्हा अवतरलं. वेगवेगळ्या एफएम चॅनेलवर मनोरंजनाचे अनेक कार्यक्रम होत असतात.
— अतुल कहाते.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply