प्राणा चे प्रमाण ठरवू नये
प्रमाण असावे क्षणांचे
प्रमाण ठरवता मिळे परतावा
ओझे उतरते मणाचे!!
अर्थ–
प्रमाण हा शब्दच मुळी लोकं प्रमाणात स्वीकारत नाहीत. काही गोष्टी प्रमाणाबाहेर केल्या जातात, प्रमाणात न करता प्रमाण न राखता त्यांचा अतिरेक होतो. पण आयुष्य हे देखील प्रमाणित आहे याचा विचार कोण करत नाही. आयुष्याचे प्रमाण आपल्याला ठाऊक नाही, कधी संपेल हे सांगू शकत नाही मग ते आनंदाने जगण्यावर भर न देता मनावर नको ते ओझं प्रमाणाबाहेर लादून काय मिळते?
दुःखास असावे प्रमाण, परी सुखं ही असावे तितकेच, पाणी भरावे पात्रामध्ये बसेल तितकेच!
2014 मधे मित्राच्या लग्नाला रत्नागिरीला गेलो असताना पडलो आणि मग अंग दुखू लागलं, ठाण्यात आल्यावर उपचार सुरू झाले, मग आमचे आयुर्वेदाचार्य श्री उदय कुलकर्णी यांच्याकडे गेलो, ते म्हणाले काही झालं नाहीये, मुकामार आहे वाटेल बरं, पण उपचाराने काही गुण येईना, मग त्यांनी समोर बसवले आणि विचारले की मनात कसलं वादळ उठलंय सांगा, म्हटलं डॉ इतके दिवस झाले बरं वाटत नाहीये त्यामुळे काहीतरी भयंकर आजार झाला असेल अशी भीती आहे.
त्यावर ते चिडून म्हणाले, ठीक आहे परचुरे ही चिट्ठी घ्या आणि उद्या स्कॅन करून घ्या, पण नंतर माझ्याकडे यायचे नाही, कारण ते रिपोर्ट नॉर्मल असतील हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. झालं स्कॅन करून घेतलं, रिपोर्ट एकदम नॉर्मल मग मला बरं वाटू लागलं, तसं डॉ ना सांगितलं ही, ते म्हणाले कसं आहे फुकट मी सांगत होतो ते पटलं नाही, पण पैसे देऊन ते समजलं आणि तुला बरं वाटू लागलं. मनातली भीती सुद्धा प्रमाणात असावी नाहीतर अस होतं. प्रमाणात एखादी गोष्ट केली तर तिचा मूळ स्वभाव टीकून रहातो नाहीतर मग अति तेथे माती म्हण तर सर्वांनाच माहित्ये.
एखाद्या गोष्टीचं टेन्शन किंवा ओझं किती प्रमाणात घ्यावं हे जर कळलं तर ते प्रमाण राखून आयुष्य जगणं याला खरं जगणं म्हणतात. म्हणून प्रमाण हा फार महत्वाचा भाग आहे आपल्या जगण्याचा.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply