श्रवण भक्ती ज्याची अपार
त्याचे कान होती तयार
नुसती मान डोले तालासंगी
काय कामाची!!
अर्थ–
शिवशाहीर कै श्री बाबासाहेब पुरंदरे यांनी 96 व्या वर्षी त्यांच्या एका व्याख्यानात मनातलं दुःख बोलून दाखवलं होतं, ते असं ” इतक्या वर्षांनंतर मला आज असं वाटतं की जर मी व्याख्यानं देण्यापेक्षा लिखाण जास्त केलं असतं तर बरं झालं असतं.”
काय शिकायचं आपण यातून? नक्की अर्थ काय घ्यायचा याचा? योग्य अर्थ घेण्याची कुवत देखील श्रोत्याची असावी लागते. एखाद्या व्यक्तीच्या व्याख्यानाला, कीर्तनाला, प्रवचनाला अलोट गर्दी आहे, लोकं मंत्रमुग्ध होऊन ऐकतायत, पंच वर टाळ्या, काही वेळेस जोक्स वर देखील टाळ्या पण नंतर भगवंताचे नाम घेताना मात्र टाळ्यांचा आवाज मंद होऊन मान डोलू लागते, त्या जागी नामस्मरण घुमू लागते, वातावरण अगदी भक्तिमय होऊन जाते पण, तेथून बाहेर पडताना किंवा बाहेर पडल्यावर मनुष्य परत पैसा, ईर्षा, राग, लोभ, काम भावना या सारख्या जगण्याच्या पहिल्या पाच प्रायोरीटी डोकं वर काढतात अन श्रवण केलेले डोक्याच्या वर 10 फुटांवर विरुनही जाते.
केवळ मी इतकी वर्षे श्रवण भक्ती करतोय, आपल्या कडे जे आहे ते वाटल्याने वाढते मग ते प्रेम, ज्ञान, धन, मदत असो पण ते केवळ ऐकण्यापूरते, घरी आल्यावर किंवा रोज जगताना मात्र बिलाची थकबाकी, मदत कोणी मागितली तर टाळणे, दुसऱ्याच्या नफ्यात कमिशन खाणे हे सुरू असेल तर तेथे त्या श्रवणभक्तीचा खून होतो.
माझे असे काही नाही हो, अहो भगवंत तरी असेच म्हणतो पण माझे मात्र सर्व आहे हे आत कुठेतरी पक्के घर करून बसलेले असते अन त्याचाच विजय नेहमी होतो.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply