‘अनघा दिवाळी अंक 2021’ मध्ये प्रकाशित झालेली अभिनेते सयाजी शिंदे यांची अमोल नाले यांनी घेतलेली मुलाखत…
शालेय व महाविद्यालयीन जीवनात अभिनयाचे धडे गिरवणाऱया सयाजींना त्यासाठी कुठला क्लास वा शिकवणी घ्यावी लागली नाही. अनुभवातून त्यांचा अभिनय फुलत गेला. अभिनय पारंगतता आपोआपच त्यांच्यात भिनली. विविध प्रकारच्या भूमिका सजवत त्यांनी मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रसृष्टीत प्रवेश केला. प्रत्येक भाषिक चित्रपटात त्यांनी आपल्या अंगभूत अभिनयाची छाप उमटवली. मराठी. हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड व मल्याळम चित्रपटात त्यांनी खलनायकाच्या भूमिका निभावल्यात. त्यासाठी त्यांना बरीच पारितोषिके मिळालीत. परंतु क्रूर खलनायकाची भूमिका सजविणारा हा नायक मात्र मनाने खूप हळवा आहे. माणसांबद्दल तर त्याला प्रेम आहेच परंतु झाडांविषयी, पशुपक्षांबद्दल देखील त्याला जिव्हाळा आहे. पर्यावरण रक्षकाच्या भूमिकेतून निसर्गाबद्दल उतराई होण्यासाठीच त्यांनी सह्याद्रि वनराईची स्थापना करून ते त्यातच कार्यरत आहे.
सयाजी शिंदे या अभिनयसंपन्न व बहुभाषिक चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणाऱया व्यक्तीनं पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीकोनातून सह्याद्रिच्या कुशीत व देवालयांच्या जमिनींवर झाडे लावून त्यांची निगा घेण्याचे काम अविरत कुणाचाही कसलाही पाठिंबा नसतांना सुरु केले व ते उत्तमरित्या चालू ठेवले आहे. म्हणून त्यांच्या या कार्याने प्रभावित होऊन त्यांच्याशी संवाद साधला.
प्रश्न :- आपलं बालपण कसं गेलं व शिक्षण कुठे झालं?
सयाजी :- माझा जन्म 13 जानेवारी 1959 रोजी सातारा जिह्यातील वेळेकामठी या गावी झाला. साताऱयापासून अवघे12 कि.मी. वर आमचे गाव असूनही विकासाच्या बाबतीत मागासलेलंच आहे. बस पकडावयाची म्हटलं तरी 3/4 कि.मी. पायी चालत जावे लागत असे. मला 4 बहिणी व एक भाऊ आहे. माझे वडील श्री. मुकुटराव शिंदे शेतकरी. आमची आर्थिक परिस्थिती बेताचीच. गावी सातवीपर्यंत शाळा होती. त्यामुळे शिक्षण गुरेढोरे सांभाळत व शेतीकडे लक्ष देत झाले. पुढे नववीपर्यंतचे शिक्षण मावशीकडे फलटण येथे तर दहावीचे शिक्षण पुरंदर तालुक्यातील वीर येथे बहिणीच्या गावी झाले. त्यानंतर नोकरी मिळावी म्हणून डी.एङचा अभ्यासक्रम देखील पूर्ण केला.
प्रश्न :- शिक्षण झाल्यावर नोकरी कुठे केली?
सयाजी :- आमची काही जमीन धरणात गेली. त्यामुळे धरणग्रस्त म्हणून 1978 मध्ये मला महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात रात्रीचा पहारेकरी म्हणून नोकरी मिळाली. पण माझे मन त्यात रमत नव्हते. म्हणून रात्री नोकरी करून साताऱ्याच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातून मराठी विषय घेऊन पदवी प्राप्त केली. त्यावेळी माझा परिचय नाट्यवेड्या कुलकर्णी यांच्याशी झाला. त्यांनी मला अभिनयाकडे पाहाण्याची दृष्टी दिली. तसेच एके दिवशी प्रा. शंकर पाटील यांच्याघरी के. नारायण काळे यांचे ‘अभिनय साधना’ हे पुस्तक मिळालं. त्यानंतर ‘भूमिका शिल्प’ पुस्तक माझ्या हाती पडलं. मी या दोन्ही पुस्तकांची पारायणं केली. त्यामुळे मला अभिनेता होण्यासाठी दिशा मिळाली. व माझा आत्मविश्वास वाढला. व मी गाव शिवारातील डोंगराला साक्षी मानत अभिनयाची रंगीत तालीम सुरु केली. मी अभिनयाचा ध्यास घेतलेला असल्यामुळे पुढील वाटचालीसाठी सातारा सोडायचं ठरवलं. तेव्हा मनाशी खूणगाठ बांधली की, जे करायचं ते चांगलच करायचं. ‘वेल बिगन इज हाफ डन’ व ‘हेस्टी क्लॉयंबर्स हॅव सडन फॉल’ ही दोन वाक्य मनात कायम ठेवली.
मी मुंबईचा रस्ता पकडला. कुर्ला नागरी सहकारी बँकेत कारकुनाची नोकरी स्विकारली. सकाळी 6 वाजता घरातून निघायचं व छबिलदास शाळेत 1 तास आवाजाचा सराव करावयाचा. सकाळी 8 ।। वाजता बँकेत पोहोचायचे. बँकेत दिवसभर कामकाज करायचे परंतू जेवणाच्या सुट्टीत वाचनालयात जावून अभिनयाशी संबंधित पुस्तके वाचायची. आवड असल्यामुळे दररोज एक पुस्तक वाचून व्हायचेच. पुस्तके नुसती वाचत नव्हतो तर त्यातील काही चांगल्या गोष्टींची टिपणे काढीत असे. त्यानंतर बँकेत सहा वाजेपर्यंत काम करायचं त्यानंतर कधी शिवाजीमंदिरच्या तर कधी माटुंगा रेल्वेच्या फलाट क्र. चारच्या बाजूला नाटकातील संवादांचा सराव करायचो.
प्रश्न :- आपल्याला अभिनयाची आवड होतीच. शाळा महाविद्यालयातून आपण छोट्या मोठ्या भूमिका करीत होता. त्यानंतर नाटकात काम करण्याची सुरूवात कशी केलीस?
सयाजी :- अरविंद व सुलभा देशपांडे यांच्या आविष्कार संस्थेत मला अभिनयाचे काही धडे गिरवता आले. त्यादरम्यान वामन केंद्रे यांची भेट झाली व त्यांनी त्यांच्या नाटकात मला भूमिका दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘झुलवा’ या नाटकातील तृतीयपंथियाची माझी भूमिका खूप गाजली. मी समरसून ती भूमिका वठवली होती व त्यामुळे मला नाव मिळालं. माझ्या अभिनयाबद्दल ऐकल्यावर मनोज वाजपेयी यांनी फोन करून मला हिंदी सिनेमात काम करण्याचा प्रस्ताव दिला.
प्रश्न :- याचा अर्थ असा झाला की, तुम्हाला चित्रपट सृष्टीचे द्वार उघडण्यात आले. तो सुरूवातीपासूनचा तुमचा प्रवास कसा झाला?
सयाजी :- मनोज वाजपेयींनी मला त्याच्या ‘शूल’ या चित्रपटात बच्चू यादवची भूमिका दिली. ही बिहारी व्यक्तीची भूमिका खूप गाजली. ती भूमिका सजीव करण्यासाठी मी बिहारमध्ये गेलो व त्यांची बिहारी भाषा शिकलो. नुसती भाषाच शिकलो नाही तर त्या भाषेचे उच्चारदेखील आत्मसात केलेत. आणि त्याचं मला फळदेखील मिळालं. त्या भूमिकेसाठी मला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट खलनायकाचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर एकापाठोपाठ एक चित्रपट मिळत गेले. हिंदीमधील ‘कुरूक्षेत्र’ या चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. बॉलीवूडमधील माझ्या भूमिका गाजल्यामुळे मला टॉलीवूडचे दरवाजे उघडले गेले. दक्षिणेतील ‘सुब्रह्मण्यम भारती’ या तामीळ कवीची भूमिका साकारण्यासाठी ‘भारती’ या तामीळ चित्रपटात संधी मिळाली. प्रादेशिक कलाकार सोडून मला ही भूमिका मिळाल्यामुळे मला त्या भूमिकेचे सोने करण्याची संधी मिळाली. मग मला दक्षिणेतील चित्रपटांत काम करण्यासाठी भरपूर संधी मिळत गेल्यात आणि त्यामुळे मला तमिळ, कन्नड, तेलगू, मल्याळम या भाषा देखील बोलता येऊ लागल्या. या भाषांमध्ये मी अनेक चित्रपट केलेत. ‘अरूंधती’ या चित्रपटासाठी मला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा तसेच ‘अंधृदू’ साठी तेलगू फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहाय्य अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत रजनीकांतनंतर दुसरा मराठी अभिनेता ठरलो. पंचवीस वर्षाच्या चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीत जवळपास पाचशे चित्रपटात मी काम केले आहे. मराठी चित्रपटात ‘मानसा’, ‘अंबोली’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘कुंकू झालं वैरी’, ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’, ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘जय महाराष्ट्र’, ‘लढाई’, ‘वजीर’, ‘बोकड’, ‘पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा’, ‘ढोलकी’, ‘बाबांची शाल’, ‘शूर आम्ही सरदार’, ‘भिकारी’, ‘लवबेटिंग’, ‘तांडव’ हे चित्रपट केलेत. ‘सखारामबाईंडर’ मधील माझी भूमिका विशेष गाजली. नाटक, मालिका व चित्रपट येथील माझ्या भूमिकांनी मला मराठी रसिकांच्या मनात स्थान मिळवून दिलं.
प्रश्न :- दाक्षिणात्य चित्रपटात काम करतांना आपल्याला भाषेची अडचण जाणवली नाही का?
सयाजी :- नाही. जगातील कोणतीही भाषा अवघड नाही. अवघड म्हटलं तर ते अवघड होऊन जातं. परंतु भाषेवर आपण आपला फोकस ठेवला तर कुठलीही भाषा सहज अवगत होऊ शकते. पण खरं पाहू केलं तर कुठलीच भाषा आपल्याला येत नाही, कारण त्या भाषेच्या व्याकरणाचा आपला अभ्यास नसतो. परंतु भावना महत्त्वाची असते. एक सांगू का कुठलीच भाषा ग्रेट नाही, खरी ग्रेट भाषा असते ती आईची, आपल्या मातृभाषेची, कोणत्याही भाषेतील हजार/ दीड हजार शब्द माहितीचे झालेत की मग हळूहळू आपला शब्दसंग्रह वाढत जातो व आपल्याला ती भाषा चांगली समजू लागते.
प्रश्न :- मराठी नाटक, सिनेमा व त्याशिवाय हिंदी व दाक्षिणात्य भाषिक चित्रपटात आपलं बऱयापैकी बस्तान बसलंच आहे. मग आपण पर्यावरण संवर्धनाकडे कसे वळलात? कारण आपण झगमगीत जगात वावरल्यावर झाडा झुडूपात कसे रमलात?
सयाजी :- माझा जन्मच मुळी सह्याद्रिच्या पर्वतरांगाच्या कुशीत वसलेल्या गावी झालेला आहे. बालपणी निसर्गाच्या सान्निध्यात वाढल्याने माझे पाय मातीकडेच वळतात, आपल्या माणसाकडे जाण्याची ओढ कायम राहाते. म्हणूनच मुंबईच्या गर्दीत माझा जीव गुदमरतो. आताही मला डोंगरावर जाऊन बालपणीच्या आठवणींना उजाळा द्यावासा वाटतो. तुम्ही मला आता सांगा जळगावचे मग तुम्हाला मुंबईत कसं वाटतं?
प्रश्न – आपलं बरोबर आहे. जन्मभूमीची ओढ ही सतत आपले पाय ओढत असतात. चार दिवस जरी तिथे राहिलो तरी मन तृप्त होतं. तुम्ही पर्यावरणाचे दृष्टीने मग काय केले?
सयाजी – महाराष्ट्रात सर्वाधिक कमी पर्जन्यमान असलेल्या माण तालुक्याला दुष्काळाच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी माझ्या सवंगड्यांना सोबतीला घेऊन माझ्या गावाच्या परिसरातील पांढरवाडी, कोळसेवाडी, गोडसेवाडी, देवडी या गावांचा कायापालट करण्यासाठी पुढाकार घेतला. लोकसहभागातून, शासकीय मदतीतून तसेच मिळेल त्यामदतीतून काम सुरू केले. या चार गावात नाला बांधणे, पाझर तलाव, सिमेंट बंधारे, सीसीटी, शेततळी, विहीर पुनर्भरण अशी कामे हाती घेऊन ती पूर्ण केली. त्यानंतर वृक्षारोपण केले त्यामुळे परिणामी उजाड झालेले डोंगर हिरवेगार दिसू लागले. लावलेल्या रोपट्यांची झालेली झाडे हजारांमध्ये आहेत. आज त्याचे चांगले परिणाम दिसू लागलेत. माण हा तालुका आता दुष्काळग्रस्त राहिला नाही. माझे झाडांविषयीचे प्रेम बघून मला झाडवेडा म्हणतात, अर्थात माझे झाडांवर जीवापाड प्रेम आहे. मी नुसती झाडे लावली नाहीत तर ती जगवली देखील. लहानपणी अजाणतेपणी मी एक झाड तोडलं होतं. परंतु त्यानंतर मला खूप वाईट वाटलं. तु त्या भावनावेगात मी कविता लिहिली. अर्थात मी लिहिलेल्या ‘तुंबारा’ या एकपात्री नाटकात ती अंतर्भूत केली आहे. ती अशी –
आता रानात जाऊ या
आता डोंगरात जाऊ या
तिथे एक कोंब, दोन कोंब, कोंबच कोंब
एक आपलं झाड
त्याची तिथेच होणार वाढ
खरखरीत मायाळू कडा
त्याला झाडाचा पडलाय वेढा
दगडाचं झाड विशाल
त्यावर झाडाची एक मशाल
झाड तोडणे म्हणजे महापुरूषांना मारण्यासारंखच मला वाटतं. झाडे लावा असं इतरांना सांगण्यापेक्षा मला स्वत:ला झाडे लावून ती वाढवणेच आवडतं. आपल्याकडे देशी-विदेशी झाडांची एवढी गर्दी झाली आहे की, आपली देशी झाडं कोणती व विदेशी कोणती हे ओळखणं कठीण झालंय. सोनमोहोर, गुलमोहर, सूबाभूळ, काशीद, गिरीपुष्प ही विदेशी झाडं न लावता वड, पिंपळ, चिंच, कडुलिंब, उंबर, कदंब, कांचन ही देशी झाडं लावण्याकडेच माझा प्रयत्न असतो. विदेशी झाडांची पाने जमिनीवर गळून पडतात त्यामुळे पावसाळ्यात झाडाखाली चिखल तयार होतो तर उन्हाळ्यात वाळलेल्या पानांच्या ढिगावर ठिणगी जरी पडली तरी वणवा पेटण्याचा धोका संभवतो. म्हणून आपल्याकडील वातावरणात देशी झाडं लावणंच योग्य आहे. तसेच विदेशी झाडं पर्यावरणासाठी प्रतिकूल असतात. कारण त्या झाडांवर पक्षी घरटं बांधत नाहीत तसेच ही झाडं आसपासच्या झाडांना वाढू देत नाहीत. म्हणून मी लोकांना आवाहन करतो की, आपल्या मुलांच्या हातात मोबाईल देण्यापेक्षा त्यांच्या हातात देशी झाडाचे रोपटे देऊन त्याच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवा. त्यांना तो छंद लागला पाहिजे त्यामुळे त्यांना निर्मितीचा आनंद मिळू शकेल व परिसरात झाडांची संख्या वाढलेली दिसेल.
प्रश्न :- आपण ही रोपं कुठून घेता?
सयाजी:- झाडांची रोपं तयार करण्यासाठी सरकारवर किंवा इतरांवर सामान्यत: लोक अवलंबून राहतात. परंतु सरकारी रोपवाटिकांमधून विदेशी झाडांचीच रोपं बहुतांशी मिळतात. म्हणून प्रत्येकाने आपल्या अंगणात, परसात किमान पाच देशी झाडांची रोपे तयार केली पाहिजेत. व सर्व मोकळ्या जागेवर ती लावली पाहिजेत. झाडं आपल्याला काहीही मागत नाहीत उलट ते आपल्याला देतच असतात मग आपण त्यांना का तोडावे? तुकाराम महाराज म्हणतातच ना-
“वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे”
मग तुम्हालादेखील पटेल की, आपले संत ज्यांना सोयरे म्हणतात त्यांना आपण कसे तोडावयाचे?
प्रश्न – देवराईची कल्पना आपल्याला कशी सुचली? व आपण त्या प्रकल्पासाठी काय केलंय?
सयाजी :- सह्याद्रिच्याच काय पण ठिकठिकाणच्या डोंगरावर झाडांची भरमसाट कत्तल झालेली आहे. परिणामी त्यामुळे सर्व डोंगर बोडके दिसू लागलेत. म्हणून मागच्या पिढीतील लोकांनी केलेली चूक आपण सुधारलीच पाहिजे व याच उद्देशाने प्रेरीत होऊन मी सह्याद्री देवराई या संस्थेची स्थापना केली. सुरुवात माण तालुक्यातील देवडी गावापासून केली. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने व संस्थेच्या सहकार्यातून त्या ठिकाणी हजारो झाडे लावली व ती जोपासली. त्यासोबतच राज्यभर झाडे लावण्याचा उपक्रम सुरु केला आहे. देवस्थानाच्या उजाड झालेल्या जागांवर झाडे लावण्याची सुरुवात केली. बीड जिल्ह्यात खूप झाडे लावली तसेच हिंगोली जिह्यातील टोकाई गडावर देखील वृक्षारोपण केले. माझं ते स्वप्नच आहे की, उजाड डोंगर व गावपरिसर पुन्हा वनांनी फुललाच पाहिजे आहे. कारण झाडे नाहीत तर पाऊस नाही व पाऊस नाही म्हणून झाडे नाहीत. हे दुष्टचक्र कुठेतरी थांबलेच पाहिजे. मी आमजनतेला म्हणून आवाहन करतो की, प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून आपण लावलेल्या 5 झाडांचे संगोपन करून त्यांना वाढवले पाहिजे. म्हणजे दुष्काळाला आपल्या परिसरात शिरकाव करायला वावच मिळणार नाही. चला तर मग तसा आपण संकल्पच करूया व राष्ट्रकार्याला मदत करूया.
संवादक : अमोल नाले.
Leave a Reply