“सकाळी मला जाग आली ती दारावर कुणीतरी जोरजोरात धक्के मारत होते त्या आवाजाने. मी जागी झाले आणि मनात पहिला विचार आला तो ह्यांचा. आम्हा दोघांना एकत्र पाहिले तर आमची धडगत नाही या विचाराने माझा थरकाप झाला. मी चटकन शेजारी सूर्यकांत राजेंना उठवावे म्हणून पाहते तर तिथे कुणीच नाही! या सगळ्या विचारात एखादा क्षण गेला असेल नसेल तो पर्यंत दरवाजा आता मोडतोय की काय असे प्रचंड धक्के बसू लागले. मी घाईघाईने उठून दरवाजा उघडला तो समोर राणीसाहेब, म्हणजे माझ्या सासूबाई! त्यांनी एकदम हंबरडा फोडला आणि माझ्या अंगावर खेकसून ओरडल्या, “ही! ही! चांडाळीण, पांढऱ्या पायाची अवदसा! हिने खाल्ले माझ्या पोराला. चल चालती हो माझ्या घरातून!” असे म्हणून त्यांनी माझा हात धरला आणि मला ओढू लागल्या. लोकांनी त्यांना आवरले. खाली दिवाणखान्यातून प्रचंड रडारडीचा आवाज येत होता. मी अगदी भांबावून गेले. मला कळेना हा काय प्रकार आहे? जिन्यावरून धावत धावत खाली आले तर हॉलमध्ये पांढऱ्या चादरीत सूर्यकांत राजेंना झाकून ठेवलेले! आसपास शिकारीला गेलेली सगळी मंडळी माना खाली घालून उभी!
ते दृश्य पाहून मी सुन्न झाले. मी धावत जाऊन सूर्यकांत राजांच्या अंगावर झेप घेतली आणि मोठ्याने टाहो फोडला! सूर्यकांत राजेंच्या तोंडावर मात्र स्मित हास्य दिसत होते आणि चेहऱ्यावर पूर्ण समाधान! जणू म्हणत होते, “सुमित्रा हे काय करतेस? मी आहे ना तुझ्याबरोबर?’ पण ते जिवंत नव्हते. हे सारे माझ्या मनाचे खेळच होते! मोठ्या मुश्किलीने लोकांनी मला त्यांच्यापासून सोडवले आणि आत नेले. माझे भान हरपले आणि मी बेशुद्ध पडले!!
पुढे सर्व सोपस्कार झाले. प्रेतसंस्कार विधी झाले आणि लगेचच धाकटे बंधुराज चंद्रकात राजे आणि थोरल्या राणीसाहेब यांनी इस्टेटीवरचा माझा हक्क काढून घ्यायच्या हालचाली जोरात चालू केल्या. सूर्यकांत राजे जाऊन काही फार दिवस झाले नव्हते. मग इस्टेटीची एवढी घाई का? मला संशय यायला लागला. सूर्यकांत राजेंना जंगलात शिकार करताना चुकून गोळी लागली का जाणूनबुजून हा डाव खेळला गेला तर नसावा ना? इस्टेटीच्या मालकीसाठी इतक्या झटपट हालचाली चालू झाल्या. यावरून सूर्यकांत राजे अपघाताने नाही तर कपटाने मारले गेले हा माझा संशय बळावत चालला. चंद्रकांत राजेंची एकूण कीर्ती ऐकून तर मी मनोमन समजले हा काय प्रकार असावा ते. हा तर उघडउघड खूनच होता. पण कोणाची बोलायची हिंमत नव्हती. सरकार दरबारी पैसे चोरून अपघात म्हणून प्रकरण मिटवण्यात आले. तोंड दाबून बुक्यांचा मार खाण्यापलिकडे मी काहीच करू शकले नाही. या सर्व घडामोडीत सूर्यकांत राजे त्या रात्री मला भेटले हा मला झालेला भास होता याची मला खात्रीच पडली. पण त्या दिवसांपासून त्यांची आठवण मात्र मला सतत येत रहायची.
असे तीनचार महिले गेले. इस्टेटीच्या वाटणीचे प्रकरण जवळजवळ मिटत आले. माझा रितसर विवाह झालेला असल्यामुळे मला इस्टेटीतला जो काय कायदेशीर वाटा मिळायला पाहिजे होता तो देणे त्यांना भागच होते. एवढ्यात माझी लक्षणे पाहून सासूबाईंना काही संशय आला आणि त्या मला जबरदस्तीने डॉक्टरकडे घेऊन गेल्या. डॉक्टरी तपासणीत मी आई होणार हे स्पष्ट झाल आणि जणू ॲटम बाँबच फुटला! आमचा गर्भदान विधी झालाच नव्हता मग हे कसे शक्य होते? मला पण मोठे कोडे पडले? मी कोणत्याही पुरुषाशी संबंध ठेवला नव्हता मग हे कसे घडले? म्हणजे त्या रात्री सूर्यकांत राजे खरोखरच आले होते का? मग माझ्या जिवाचा भीतीने थरकाप उडाला. याचा अर्थ स्पष्टच होता की मी त्यांच्या आत्म्याशी संबंध ठेवला होता? याशिवाय दुसरी कोणतीही शक्यता नव्हती आणि मी तसे सांगूनही माझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार? फारच अद्भुत! अकल्पित!! मी आलेली परिस्थिती स्वीकारली. मुलाला जन्म देण्याचे ठरवले! माझी प्रचंड बदनामी झाली. इस्टेटीचा वाटा मिळणे तर दूरच पण खूप कोर्ट कचेऱ्या झाल्यावर माझ्या वडिलांनी लग्नात दिले ते दागिने, आहेर म्हणून दिलेली पाचगणीची प्रॉपर्टी आणि पन्नास एकराची स्ट्रॉबेरीची बागायत मिळाली.
तुझ्या जन्मापूर्वीच माझी हकालपट्टी झाली आणि मी संस्थानात पुन्हा पाऊल टाकले ते सूर्यकांत राजेंच्या पन्नासाव्या पुण्यतिथीला. तुझ्याबरोबर गेले तेव्हा! त्यापुढचे तुला सर्व माहीत आहे. माझे काम झाले! मी मुक्त झाले!!”
मी हे सगळं सुन्न होऊन ऐकत होतो. आईने माझ्यावर तिची प्रेमळ नजर रोखली. मी ही तिच्याकडे एकटक पाहू लागलो. तिच्या दोन डोळ्यांच्या जागी मला दोन भोकं दिसायला लागली! मग नाकाच्या जागी आणि मग एक संपूर्ण कवटी आणि अस्थिपंजर!! त्या अस्थिपंजराने आपला हडकुळा हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि आवाज आला, “बाळा, येते मी सुखी रहा!”
तो हात तसाच वर गेला. वरून दुसरा हात आला. त्याच्या मागोमाग दुसरा अस्थिपंजर! त्या दोन्ही अस्थिपंजरांनी एकमेकांचे हात हातात घेतले. एक गिरकी घेतली आणि एखाद्या वावटळीसारखे गिरक्या घेत घेत ते दूर दूर आकाशाच्या ते काळोखात लुप्त झाले. .
“साहेब, साहेब!! म्हणून सखाराम जोरजोरात ओरडत आला तशी माझी तंद्री भंगली! मी एकटाच टेरेसवर होतो! समोरच्या इझीचेअरवर कुणीच नव्हते. सखाराम ओरडतच होता. मी म्हणालो, “काय रे काय झाले? का ओरडतोस?” माझे लक्ष त्याच्याच मागे उभ्या असलेल्या पांडूकडे, माझ्या आईच्या गाडीच्या ड्रायव्हरकडे गेले. तो रडत होता. रडत रडत म्हणाला, “साहेब, पाचगणीहून येता येता बाईसाहेब गाडीतच गेल्या.”
“काय? गाडीतच गेल्या म्हणजे?’
“साहेब, मला वाटले त्यांना झोप लागली नेहमीप्रमाणे. इथं बंगल्यासमोर आल्यावर गाडीचं दार उघडून त्यांना हाक मारली पण त्या उठल्याच नाहीत साहेब!!”
समाप्त.
— विनायक अत्रे.
Leave a Reply