जनसंघाचे संस्थापक, महामंत्री पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म २५ सप्टेंबर १९१६ रोजी उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यातील नागला चंद्रभान या गावी झाला.
पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.
वयाची तीन वर्षे पूर्ण करण्याच्या आधीच त्यांचे वडील आणि वयाची आठ वर्षे पूर्ण करण्याच्या आधीच त्यांची आई हे जग सोडून गेले. त्यानंतर त्यांचे संगोपन सिकर येथे त्यांच्या मामांनी केले. सिकर येथूनच त्यांनी दहावीची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण केली. या यशानंतर सिकरच्या महाराजांनी त्यांना दरमहा १० रुपये शिष्यवृत्ती आणि अन्य खर्चासाठी २५० रुपये दिले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पिलानी, कानपूर आणि आग्रा येथे झाले.
कानपूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्याशी भेट झाली. त्यानंतर संघाचे ज्येष्ठ प्रचारक बाबासाहेब आपटे, दादाराव परमार्थ, बापू महाशब्दे यांच्याशीही त्यांचा संबंध आला. नंतरच्या काळात राजकीय क्षेत्रात त्यांचे सहकारी राहिलेले सुंदरसिंग भंडारी कानपूर येथे त्यांचे सहाध्यायी होते. १९४२ साली ते रा. स्व. संघाचे प्रचारक म्हणून काम करू लागले. उत्तर प्रदेशचे सह प्रांतप्रचारक म्हणून जबाबदारी सांभाळत असतानाच जनसंघाच्या स्थापनेचा निर्णय झाला आणि त्यांना जनसंघाचे काम करण्यासाठी सांगण्यात आले. जनसंघाची स्थापना प्रथम उत्तर प्रदेशात झाली. त्यावेळी त्याचे प्रथम महामंत्री म्हणून त्यांना जबाबदारी सोपवण्यात आली. त्यानंतर काहीच महिन्यात पक्षाला अखिल भारतीय रूप देण्यात आले तेव्हा जनसंघाचे अखिल भारतीय महामंत्री म्हणून त्यांच्याकडे काम सोपवण्यात आले. जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा उजवा हात होऊन ते काम करू लागले. त्यावेळी त्यांचे वय अवघे ३५ वर्षे होते. मात्र त्यांचा कामाचा झपाटा आणि समज पाहून डॉ. मुखर्जी उद्गारले होते- `मला दोन दीनदयाळ द्या, मी देशाचा राजकीय चेहरा बदलून टाकीन.’
जनसंघ बाल्यावस्थेत असतानाच १९५३ साली डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे काश्मिरात कारागृहात संशयास्पद अवस्थेत अकाली निधन झाले. त्यानंतर पक्षाचा सगळा भार दीनदयाळजींच्या खांद्यावर आला. ११ फेब्रुवारी १९६८ रोजी रेल्वे प्रवासात गाडीतच त्यांची रहस्यमय हत्या झाली. त्यांचे वय त्यावेळी फक्त ५१ वर्षे होते. मात्र त्यांना मिळालेल्या उण्यापुऱ्या १५ वर्षांच्या काळात त्यांनी जनसंघाची अतिशय मजबूत पायाभरणी केली. पक्षाला अखिल भारतीय रूप देणे, पक्षाचे संघटन मजबूत करणे, हजारो ध्येयसमर्पित कार्यकर्ते उभे करणे, निवडणुकीच्या राजकारणात पक्षाचे प्रतिनिधी निवडून आणणे आणि या साऱ्याहून महत्वाचे म्हणजे पक्षाला सुदृढ वैचारिक अधिष्ठान मिळवून देणे ही सारी कामे त्यांनी त्या १५ वर्षात केली. त्यांनी पक्षासमोर आणि समाजासमोर मांडलेला `एकात्म मानववाद’ कालातीत असून लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, भांडवलशाही, मार्क्सवाद, व्यक्तिवाद, विज्ञानवाद अशा सगळ्या विचारांच्या उलटसुलट खंडनमंडनाच्या वावटळीत भारतीय विचार परंपरेवर आधारित निश्चित दर्शन समोर ठेवणारा आहे. शास्त्रे, धर्मग्रंथ, आणि तात्त्विक ग्रंथांचे चिंतन मननातून त्यांनी ‘एकात्ममानववाद’ हा मांडला व सिद्धांत भारतीय समाजाला अर्पण केला.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली.
— श्रीपाद कोठे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply