नवीन लेखन...

लग्नाची बेडी – Part 1

“राहूल?”

“हां, बोल आई.”

“अरे बोल काय? काय

ठरवलंयस?”

“कसले?”

“कसले? अरे लग्नाचे आणि कसले? तू तिकडे लांब एकटा, परदेशात, आता शिक्षणही पुरे झाले, चांगला जॉब आहे, घर आहे. चांगला सेटल झाला आहेस मग आता लग्नाचे कधी मनावर घेणार आहेस? अरे सगळ्या गोष्टी कशा वेळच्या वेळी झाल्या म्हणजे बरं. आम्हाला इकडे खूप काळजी वाटते, बरं. चटकन येता पण येत नाही. आता एकाला दुसरा जोडीदार हवाच, शिवाय परका मुलूख म्हणून म्हणते. आपलं माणूस हवं.खाण्यापिण्याचेही खूप हाल होत असतील.”

“शंभर!”

“शंभर? कसले शंभर? अरे राहुल मी बोलतेय काय आणि तू काय बोलतो आहेस?”

“अगं शंभर म्हणजे तू मघाशी जी टेपलावली होतीस ना ती शंभरावी!”

“राहुल? चावटपणा पुरे! अरे मी इतके गंभीरपणे सांगते आहे आणि तुला आपला विनोद सुचतोय!” “आई, मी पण यावर तुला तितक्याच वेळा गंभीरपणे उत्तरं नाही का दिली?”

“कसली उत्तरं? इतक्यात लग्न करायचं नाही हेच ना? मग कधी म्हातारपणी करणार आहेस का? काही नाही, आता मीच मुलगी पाहून ठरवून टाकते, नाहीतर, तिकडची एखादी पांढरीपाल पडायची गळ्यात!”

“आई, इथल्या पांढऱ्या पाली अशा सहजासहजी नाही गळ्यात ‘पडत, शिवाय सगळ्याच काही पांढऱ्या नसतात, काळयापण असतात. गळ्यात पडण्यापूर्वी फार विचार करतात, शिवाय त्यांना एवढा घोडा झाला तरी आईच्या पदराखाली राहणारा चम्या तर मुळीच चालत नाही.”

“कळतात बरं तुझे टोमणे?” “पुढचं वाक्य सांगू?” “सांग बरं?” “अरे त्याला आईचं काळीज कळावं लागतं बाबा?” “राहुल? थट्टा करतोस? बरं ठीक आहे.

आता तू विचारल्याशिवाय हा विषय पुन्हा नाही.”

“ठीक आहे. उद्या येईलच फोन!”

“उद्या? कुणाचा?”

‘कुणाचा म्हणजे? तुझाच. विषयही हाच, आपला कधी करतोस लग्नाचा विचार? वगैरे वगैरे!”

“राहूल? अरे कधीतरी जरा गंभीर हो ना रे! तू लग्न कधी करणार? मग आम्ही नातवंड कधी पाहणार? आता आमचे किती दिवस राहिलेत?”

“पुरे! पुरे! आई तुम्ही अजून खूप वर्ष जगणार. अगदी नातवंड, पतवंड पण पाहणार.

“हे बघ राहूल. मी इथे एक मुलगी पाहिली आहे. फार गोऽऽड आहे रे. फार भरलीय माझ्या मनात, शिवाय…”

“आई, मला गोड आवडत नाही माहीत आहे ना तुला? काहीतरी चांगलं तिखट झणझणीत पाहिजे. खूप दिवसात तुझ्या हातचा झुणका नाही खाल्ला!”

“राहुल विषय बदलू नकोस. आता एक चांगला दणकाच घालते तुला!”

“अगं आईगss?”

“काय रे राहूल? काय झालं?”

“अगं आई पाठीतून एकदम कळ आली.”

“अरे मग काही औषध घेतोस की नाही! हज्जारवेळा सांगते त्या कॉम्प्युटरसमोर सतत बसू नकोस म्हणून, पण तिथे तुझ्यावर लक्ष कोण ठेवणार?”

‘अगं आई म्हणून नाही काही?”

“मग?”

“अगं काल एक पांढरी पाल पडली पाठीवर!”

‘राहूल? तुझ्याशीना काही बोलायची सोय नाही!”

“ठीक आहे. ठेवतो फोन”

“ठेव ठेव. आता मीच मुलगी पाहून पसंत करते आणि आम्ही तिला घेऊनच तिकडे येतो. तिकडेच पसंत कर.”

“अगं पण इकडे म्हणजे कुठे?”

“कुठे म्हणजे? तुझ्याकडे!”

“माझ्याकडे? मी तर आता चाललो जर्मनीला. मग जाणार फ्रान्सला, मग दुबईला मला असंच सतत फिरावं लागणार आता.

“राहूल सोड बाबा ती नोकरी. इकडेच ये कसा. इथे काय कमी नोकऱ्या नाहीत. नाहीतर एखादा चांगला धंदा सुरु कर. नको ही फरफट.”

“बरं विचार करतो.”

“कसला?”
“नोकरी सोडायचा आणि कसला?”

“दोन्हींचा कर, नोकरी सोडायचा आणि लग्नाचा, बरं आता ठेवते फोन दरवाजावरची बेल वाजतेय.अच्छा बाय!”

दरवाजा उघडतात, दरवाजात वडके काका.

“या, या वडके काका शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला?”

“का हो वहिनी काय झालं?”

“काका परवा त्या विभावरी कुलकर्णीचे स्थळ तुम्ही सुचविले होते ना, ती मुलगी आमच्या राहूलसाठी फार पसंत आहे आम्हाला. पण हा राहुल बेटा काही मनावरच घेत नाही.”

“वहिनी, अहो ती मुलगी तिच्या आजारी आजीला भेटायला आली होती ती परत गेली सुद्धा!”

“परत गेली? कुठे”

“अमेरिकेला. तिथे ती जॉन्सन अॅन्ड पोलसन कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे.”

“काय सांगता? अहो आमचा राहुलही त्याच कंपनीत आहे सीनियर इंजिनियर, काय योगायोग आहे ना!”

“वहिनी, मग तर छानच झाले. तिच्या आईवडिलांना सांगून त्यांना परस्पर तिकडेच भेटायला लावतो. परस्पर जमले तर बरे!”

“वडके काका तसे नको. हा आमचा राहूल फारच नाकाने कांदे सोलतोय त्याला लग्नाची बेडी ठोकायची ही नामी संधी आलीय. तुम्ही विभावरीला राहूलची फक्त ओळख करून घ्यायला सांगा. तिच्या आईवडिलांनाही सांगा की मला मुलगी पसंत आहे हे राहुलला सांगू नका म्हणावं. पुढचे मी बघते. आता पाहतेच बच्चमजी कसा नाही म्हणतो ते.’

वडकेकाका, राहुलचे आई बाबा. विभावरीचे आई बाबा एक योजना ठरवतात. विभावरीलाही त्यात सामील करून घेतात. त्यानंतर काही दिवसांनी राहुलचा फोन येतो.

“राहुल?”

“हो आई, बोल.”

“बोल काय? तू फोन केलास ना? मग बोल.”

“तो विषय बंद. बोल काय म्हणतेय तुझी ट्रिप? जर्मनी, फ्रान्स, दुबई वगैरे वगैरे?”

“आई तुला एक खूषखबर सांगायची आहे.”

“हं सांग, ऐकतेय.”

“आई आज काय झालंय तुला?”

‘अरे तुझ्या खुषखबरी वेगळ्या, आमच्या वेगळ्या.”

“अगं आई ही तुझीच खुषखबर आहे. अगं इथे आमच्या कंपनीत एक इंडियन मुलगी आहे विभावरी म्हणून. नुकतीच तिची ओळख झाली. फार चांगली आहे.

“छे छे राहुल मला हे पसंत नाही.”

“अगं आई काय बोलतेस? मुलींचे फोटो पाठव म्हणतो तर म्हणतेस इकडे ये आणि प्रत्यक्ष पहा. आता मुलगी पाहून कळवतोय तर नाही म्हणतेस. मला तर काही कळेनासेच झाले आहे.’

“राहुल, अरे एखादी मुलगी एकटीच परदेशी जाते, कोणाची ओळख ना पाळख. तिकडे नोकरी करते. मला बाबा हे नाही पटत.”

“अग आई तू असा बुरसटलेला विचार करतेस? आय कान्ट इमॅजिन! माय ममा? सो ऑर्थोडॉक्स? आई ती फार चांगली आहे. चांगल्या फॅमिलीतून आली आहे.

“राहुल, वरवरच्या देखाव्याला भाळून जाऊ नकोस. काय सांगावं ती सांगते ते खरं का खोटं? ते काही नाही. मी इथे एक मुलगी पाहिली आहे. तू इकडे ये मुलगी पहा. नाही पसंत पडली तर तू म्हणतोस त्या मुलीचा विचार करू.”

“ठीक आहे. मी थोडी रजा घेऊन येतो. शक्य झाल्यास विभाला, म्हणजे त्या मुलीलाही बरोबर आणतो. तुमच्या पसंतीची मुलगी पाहू. तुम्हीही विभाला पहा. सगळ्यांची भेट होईल. खूप दिवसात तुझ्या हातचे धपाटे खाल्ले नाहीत.’

“बरं बरं फार मस्का नको मारूस आपला मतलब साधण्याचं बरं जमतं तुला. तुझे नक्की झाले की कळव, आम्ही येतो न्यायला.”

“कशाला? मला घर माहीत नाही का? शिवाय ते विमानही फार अपरात्री येते. आम्ही थेट घरीच येऊ.

“अगं आम्ही म्हणजे मी आणि विभा!”

“अस्सं? लगेच विभावरीचं ‘विभा’ काय?”

“आई, अगं तस नाही. इथं अमेरिकेत ती पद्धतच आहे.”

“ठीक आहे या, पण एवढा खर्च करुन येणार आणि आम्हाला जर ही ‘विभा’ नाही आवडली तर?”

“नाही तर नाही. ती तिच्या आईवडिलांना भेटेल. ते बंगळूरला असतात. तिला भेटायला येतील मुंबईला, शिवाय त्यांनीही म्हणे तिच्यासाठी एक मुलगा पाहून ठेवलाय तिकडे.”

“अस्सं का? भारीच आतल्या गाठीची दिसतेय ही तुझी विभा? बरं विमानतळावरून निघाल्यावर घरी फोन करा.”

–विनायक अत्रे

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..