नवीन लेखन...

सुगन्धिं पुष्टिवर्धनम्

“फुकट रे तुझं नवरेपण” माईचे अगतिक शब्द भाऊला उद्देशून. कारण भाऊला वास येत नाही– हे एक न्यूनच म्हणायचे, अगदी जन्मापासूनच. वैद्यकीय परिभाषेत याला ‘अॅनॉसमिया’ म्हणतात. मोगऱ्याचा स्वच्छ, टपोऱ्या फुलांचा, श्वेत-सुवासिक  गजरा बायकोच्या केसात माळणे यातला धुंद, दरवळता प्रणय भाऊला त्यामुळे कधी कळलाच नाही, असेच माईला सुचवायचे होते. ‘तुला वास नाही आला तरी तू बायकोच्या केसात गजरा माळणे सोडू नकोस कारण वासाचं वावडं  तुला आहे, तिला  नाही’ असेही कदाचित तिला सुचवायचे असेल.

असो. विषय वासाचा आहे. नाकाला सुगंध न येणे हे कानाला संगीत न कळण्या  इतकेच दुर्दैवी आहे. आणि हे दोन्ही एका व्यक्तीत एकवटणे म्हणजे दुर्दैव-परमावधीच म्हणायची. सकारात्मकच बोलायचे असेल तर वास न येणे याचेही वेगळे फायदे असतातच. असो. पण विषय (सु)गंधगप्पांचा आहे. मूलतः ‘सुगन्धिं पुष्टिवर्धनम्’ हा शब्द समुच्चय महा-मृत्युंजय मंत्रातील महेश्वराला उद्देशून असला तरी मोठा मौलिक आणि मानवी मनाला मोहविणारा, जवळचा आहे हे त्रिकालाबाधित सत्य –  म्हणूनच केवळ हा गंध पुराण-प्रपंच.

कानाने ऐकू न येणाऱ्या एका नवजात अर्भकाला डॉक्टरांनी श्रवणयंत्र लावल्यानंतर त्या बालकाचे डोळ्यातील भाव आणि त्याचा आनंद चित्रित करणारा एक विडियो मी पाहिला. एक विचार डोकावला – असेच एखादे गंधयंत्र विकसित होऊन भाऊला गंधानुभवाचा आनंद मिळावा आणि तो आनंद त्याच्या कुटुंबाला  पाहता यावा असे फार प्रकर्षाने वाटते. किती मोठ्या स्वर्गसुखाचे दरवाजे उघडतील त्याच्यासाठी ! असो.

तसे पाहता ‘गंध’ हा नुसत्या गप्पांपर्यन्त मर्यादा असणारा सीमित विषय नाही. त्याचे आपले एक साम्राज्य / विश्व  आहे – गंधविश्व (गंध-ब्रह्मांड म्हणावे ) –  आणि आपण सारे त्याचे सच्चे लाभार्थी, पाईकच म्हणा, आहोत. या विश्वाचे, स्वर्गलोक  आणि नरकलोक हे जसे दोन लोक आहेत (कपोलकल्पित असले तरी) तसेच गंध-ब्रह्मांडाचेही ‘सुगंध’ आणि ‘दुर्गंध’ हे लोक आहेत – ते मात्र कपोलकल्पित नाहीत. सुगंध, सुवास, स्वर्ग-सुख धरेवर आणील तर दुर्गंध नरकाची वाट दाखवेल. त्रिशंकु अवस्था म्हणजे गंध नसणे, शून्य गंध किंवा ना चांगला ना वाईट असा वास. परंतु आपण सुगंधाचा मार्गच जवळ करणार आहोत.  कारण,

चालता ‘सुगंध’वाटे, काटे न कुणा लाभती,
सेवेस सदा असती, ‘गंध’र्व जोडुनी हाती.

नवे कोरे पुस्तक, पिकलेला हापूस आंबा, कढीपत्ता, कोथिंबीर, गर्द वनराई, कापूर, चंदन, कस्तुरी, व्हॅनिला, अवघी सुगंधी फुले आणि फळफळावळ जमात, आंबेमोहोर / बासमती तांदूळ – या यादीतील एकेका सुवासावर एखादा सर्जनशील माणूस प्रबंध लिहू शकेल इतकी ताकद प्रत्येक सुगंधात आहे हे अगदी निश्चित. सुगंधाचे जनक आणि दाते, स्वर्गीय-सुखाचा सातत्याने अनुभव देणारे, सदा सेवेसी असणारे हेच ते ‘गंध’र्व. या मार्गावर चालणाऱ्याला नेहमीच हे ‘गंध’र्व (संगीत नव्हे, सुगंधदान करणारे) स्वर्ग-सुखाचा अनुभव देतात.

सुवासिक सफर ही दुमार्गी – नैसर्गिक व कृत्रिम. मानवाने कितीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी निसर्गाशी दोन हात करणे शक्य नाही, कृत्रिम सुगंध निर्मितीच्याही बाबतीत तो उणाच पडतो. नाही जमत माणसाला, पावसाच्या थेंबाने उद्दीपित होणाऱ्या  मृद्-गंधाला (ज्याला इंग्रजीत Petrichor या सौदर्यशाली सुगंधित शब्दप्रयोगाने संबोधिले आहे) किंवा रातराणीच्या सुगंधाला प्रयोगशाळेत निर्मिणे. प्रथम पावसाने येणाऱ्या मातीचा सुगंधाने,  त्याच्या प्रभावाने न वेडावणारा मानवी जीव या भूतलावर नाही. कोण अभागा या बेभानणाऱ्या सुवासिक (खरे तर सुवास हा शब्दच जिथे खुजा वाटतो) स्वर्गसुखापासून स्वतःला वंचित ठेवू  शकेल ? सुखाचे दुसरे नाव मृद्-गंध.

काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रभूषण, शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाले. तेव्हा लहानपणीच्या खूप हव्याहव्याशा आठवणी जाग्या झाल्या. तेव्हा  कै. बाबासाहेब पुरंदऱ्यांची (ज्यांनी शिवप्रेम अक्षरशः आमच्या अंगी भिनविले, मुरविले, संस्कारक्षम वयात शिव-संस्कारांची समृद्धी दिली) छत्रपती शिवाजी महाराजांवरील व्याख्याने दर

वर्षी दादरच्या अमर हिंद मंडळाच्या मोकळ्या प्रांगणात होत असत, जी आम्ही कधीही चुकविली नाही. अमर हिंद मंडळामध्ये प्रवेश करतानाच असणारी, अवघा आसमंत दरवळून शिव-भारीत करून टाकणारी रातराणी आजही माझ्या नाकात भिनभिनत असते. अगदी आज सुद्धा कुठेही रातराणीचा सुगंध आला म्हणजे त्या अमर हिंद मंडळातल्या व्याख्यानाच्या, बाबासाहेबांनी जिवंत केलेल्या शिवचरित्राच्या, अलौकिक शिवपर्वाच्या आठवणींना उजाळा मिळतो. केवळ याचसाठी आजही आम्ही आमच्या घरात रातराणी लावली आहे, अगदी तस्साच संस्कारसमृद्धीचा सुगंध देणारी.

सुमन सुरभीचा, मोगऱ्याच्या मंद गंधाचा, अनुभव देणारे ते ज्ञानदेवांचे समर्थ, सुकुमार शब्द (फुलें वेचिता बहरू कळियांसी आला, मोगरा फुलला, मोगरा फुलला ) असोत वा घरात घातलेली हापूस आंब्याची घमघमाट देणारी आढी (आंब्याची कोपऱ्यातली आढी, करी सर्वांस गंध वेडी) असो. यत्रतत्रसर्वत्र सुगंधानुभव सारखाच. गंध दालने वेगळी पण, स्वर्गानुभव तोच.                                                                                        भाजी घेऊन घरात प्रवेश करणाऱ्या आईला छोटी निमू विचारते, “आई, पिशवीत चिकू आणलायस ना?”, “कसं गं ओळखलस, बेटा?” – आई.

निमूसारख्या काहींची घ्राणेंद्रिये फारच संवेदनशील आणि तीक्ष्ण असतात.

एखाद्याला एखादा  वास आवडेल तर दुसरा त्यालाच नाक मुरडेल, उदा. लसूण, कांदा, पेट्रोल, फटाक्याची दारू.

वेगवेगळ्या गंधीत वस्तूंच्या सुगंधावर प्रबंध लिहिता येईल असे मी वर म्हटले तसे ‘गंध’ या एका शब्दावर संपूर्ण चित्रपटच नाही तर एखादा सर्जनशील लेखक एखादी वेब सिरिजही काढू शकेल. एका मानवाच्या असाधारण गंध सामर्थ्यावरचा असाच एक चित्रपट माझ्या पाहण्यात आला – ‘द् पर्फ्यूम’, वेगळ्या धर्तीचा इंग्रजी चित्रपट.

माझ्या एक मित्राला त्याच्या कार मध्ये एअर फ्रेशनर म्हणून कापूर ठेवायला आवडतं. “पूजामे बैठा ऐसा लगता है” म्हणे. पण मग लगेच माझ्यातला सेफ्टी व्यावसायिक जागा झाला – म्हणालो, “धूपमे रखी गाडीमें कापूर मत रखा करो, आग पकड सकता है.”

एवढे स्वर्गानुभव  देणारे मानवी नाक, जिव्हा या इंद्रियाशी फार जवळचे नाते जपून आहे. म्हणजे असे की, नाकाने येणाऱ्या स्वादामुळे जठराग्नि चेतविला जातो आणि अन्नाच्या  चवीला ‘चार चाँद’ लागतात. बासमती तांदूळाच्या शिजणाऱ्या भाताच्या घमघमाटाने  पोटामध्ये झोपलेले कावळे नुसते जागे नाही तर अवेळी ओरडायलाही लागतात. त्या भातावर वरण आणि साजूक तुपाची धार पडताच आधी त्याचा भूक उद्दीपित करणारा सुवास येतो आणि मग आपोआपच सुगंधित भोजनाने ब्रम्हानंदी टाळी लागते. मांसाहारी मंडळींचा तर हा नेहमीचा अनुभव आहे – मसाल्याच्या नुसत्या वासानेच विकेट जावी. अशा वेळी सर्दीने नाक बंद झाले म्हणजे साराच मजा किरकिरा होतो. मानवी जीभ (त्यातील रुचिकलिका) केवळ आंबट, गोड, कडू , तिखट आणि खारट या चवीच ओळखते. बाकी साऱ्या चवी, अन्नाला येणाऱ्या  स्वादावरच अवलंबून असतात. म्हणजे स्वादाचे  किती अनन्य साधारण  महत्व आहे ते ध्यानात येईल. थोडक्यात, वासाविना / स्वादाविना अन्न म्हणजे आत्म्याविना शरीर. अनेक पदार्थांमध्ये उदाहरणार्थ साबण, सिगरेट, भिन्न भिन्न  खाद्य पदार्थ, पेये यांत कृत्रिम सुवास, स्वाद घालून ग्राहकाला आकर्षित केले जाते.  एकूण काय, तर ‘हृदयाचा मार्ग पोटातून आणि पोटाचा मार्ग नाकातून जातो’

तसा वासाचा संबंध वर उल्लेखिल्याप्रमाणे स्मरणशक्ती, भाव-भावना, काळ-वेळ, वातावरण निर्मिती, उत्पादकता या साऱ्यांशीच घनिष्ट आहे. उदा. उदबत्ती, फुले, एअर फ्रेशनर ने वातावरणातील आल्हाददायकता / पोषकता वाढविणे, ग्राहकांना आकर्षित करणे. कॉर्पोरेट ऑफिसात कर्मचाऱ्यांना सुगंधित वातावरणाने कामासाठी प्रवृत्त / उल्हसित करणे हे अगदी हमखास अंमलात आणले जाते. पंचतारांकित हॉटेलांमध्ये फुलांचा, एअर फ्रेशनरचा अत्यंत कलात्मक रित्या आणि कुशलतेने वापर केला जातो. ज्यामुळे ‘फील गुड’ फॅक्टर वाढतो. अशा अनेक हॉटेलस्, मॉलस्, विमानतळ वा इतर सार्वजनिक ठिकाणी अगदी वॉश-रूम आणि टॉयलेट मध्येही सुवासच येईल याची खातरजमा करण्याची व देखभालीची जबाबदारी पार पाडण्यासाठी समर्पित खाते नेमलेले असते, हे काही नवीन नाही.

आदिम काळापासूनच सुगंधाकर्षणाचे उद्योग मानव करीत आला आहे. ३२८० कोटी अमेरिकन डॉलर्सची प्रचंड उलाढाल असणारा जागतिक परफ्यूम उद्योग केवळ ‘गंधनिर्भरता’ या एका शब्दावर  चालतो. आणि जगातला यच्चयावत स्त्री-पुरुष वर्ग या परफ्यूमच्या जोरावर एकमेकांना आकर्षित करत आला  आहे –  याचे अनेक  पौराणिक, ऐतिहासिक दाखलेही मिळतात.

महाभारतामध्ये द्रौपदीच्या कायेला अतिशय मोहक नैसर्गिक नील-कमलाचा सुगंध कित्येक योजने दूरपर्यंत (म्हणून ‘योजनगंधा’) येत असे; तसेच राणी सत्यवतीच्या कायेला माशाचा वास (मत्स्यगंधा) येत असे, असा उल्लेख आहे. राजा शांतनू याच सत्यवतीच्या रूपावर आणि शरीर सुगंधावर भाळला होता. इतर हिंदू धर्मग्रंथांमध्ये लक्ष्मी देवतेला पद्मगंधिनी / कमला – अंगाला कमळाचा सुवास येणारी, श्री ललिता हिला दैवी सुवास असणारी ‘पुण्यगंधा’ असे संबोधिले गेले आहे.  या साऱ्या, निसर्गदत्त  सुगंधाचं लेणं अंगांगावर लेवूनच आलेल्या दैवी-ललना. मुद्दा हा की पुराण काळापासून सौंदर्याचा एक हिस्सा, आकर्षणबिन्दू म्हणून – स्त्री पुरुषांना एकमेकांजवळ आणण्याची जबाबदारी ईश्वराने मोठ्या चतुराईने आणि कल्पकतेने या सुगंधावर सोपविली आहे.

वासाचे जे इतर उपयोग आहेत त्यात धोक्याची (गॅस गळती, आग, विजेचे शॉर्ट सर्किट वगैरे) पूर्वसूचना मिळणे हाही एक महत्वाचा पण थोडा वेगळा विषय आहे. रुग्णाला शस्त्रक्रिये पूर्वी बेशुद्ध करण्यासाठी मानवाने याच गंध गुणधर्माचा भूत-काळी वैद्यकशास्त्रात उपयोग केला आहे.

गंधगप्पांच्या ओघात सुगंधाचेही  पैसे वसूल करण्याची इच्छा असणाऱ्या बेकरी मालकाची कथा आठवली.

एका गरीब, दयाळू माणसाचे बेकरी शेजारी घर होते. दररोज शिळे अन्न भक्षण करताना बेकरीतून ताज्या पावाचा सुगंध दरवळत असे. या सुगंधाने गरीब माणसाला शिळे अन्न ताजे झाल्याचा आभास होई आणि तो आनंदाने दोन घास खाई. हे पाहून बेकरी मालकाला वाटे की हा माणूस माझ्या बेकरीच्या वासामुळे सुखाने जेवतोय तर या सुवासाचे पैसे का वसूल करू नये. या विचाराने त्याने न्यायालयाचे दार ठोठावले. सुनावणी आधी गरीब माणसाला जजसाहेबांनी चार नाणी घेऊन यायला सांगितले. दोन्ही बाजूचे आरोप प्रत्यारोप ऐकल्यानंतर जजसाहेबांनी गरीब माणसाला विचारले , “तुला बेकरीतून वास येतो?”

“हो”

“ तुला तो वास आवडतो?”

“हो”

आता जजसाहेबांनी गरीब माणसाला चार नाण्यांचा हातातल्या हातात आवाज करायला सांगितला. नंतर बेकरी मालकाला विचारले, “तुला हा नाण्यांचा आवाज आला?”

“हो”

“आवाज आवडला?”

“हो”

“ बस, झाली तुझ्या सुगंधाची किंमत वसूल. जा. चल निघ आता.”

खरोखरच अशी सुगंधाची किंमत द्यावी लागली असती तर या विश्वात काय गोंधळ उडाला असता !

इंटरनेट वर सर्वोत्तम सुवासिक गोष्टींची यादी पाहिल्यास त्यातील बहुतेक साऱ्या नैसर्गिक आहेत हे जाणवते. या यादीत ताजी दळलेली कॉफी, बेकरी, वितळलेले चॉकलेट वगैरे मोजकेच सुगंध मानव-निर्मित आहेत. आश्चर्य म्हणजे कोणतेही अत्तर वा पर्फ्यूम यात नाही. आंबेमोहोर तांदूळ आणि हापूस चा सुवासही या यादीत नाही आणि नव्या कारच्या सुगंधाला मात्र या यादीत स्थान दिले आहे. मग कसली ही डोंबलाची यादी म्हणायची. खरे तर नव्या गाडीत येणाऱ्या वासाला ‘सु’ उपसर्ग लावणे जरा धारिष्टयाचेच वाटते. वस्तू (गाडी) नवीन म्हणून त्याचा वास चांगला हे अंमळ अतीच झाले. ते असो. पण आंबेमोहोर  / बासमती तांदूळ आणि हापूसला यादीत स्थान न देणे हे अक्षम्यच की.

गंधजनक ई-उपकरणे आणि संशोधन  

डिजिटल ओलफॅक्टरी सेंट तंत्रामध्ये डिजिटल मिडिया (वेब-साइट, विडिओ गेम , चित्रपट, संगीत वगैरे)  द्वारे सुवास प्रसारित करून वापरकर्त्याला त्याचा अनुभव दिला  जातो.

१९९९ साली, डिजी सेंटस नावाच्या कंपनीने एखादी वेबसाइट किंवा इमेल उघडताच आय सेंट नावाचे १२८ प्रकारचे सुवास पसरविणारे इलेक्ट्रॉनिक उपकरण बनविले होते. २०२० साली AR/VR हेडसेटला जोडता येणारे, सुगंधाचा आगळा अनुभव देणारे एक सॉफ्टवेअर ही बनविले. या साऱ्यांमध्ये  एक मोठा अडसर म्हणजे  हे कृत्रिम सुवास, मानवी घ्राणेंद्रियांना घातक असण्याची शक्यता असते कारण या साऱ्या उपकरणांमध्ये ओलफॅक्टोमीटर आणि अन्य प्रसंगी घातक इलेक्ट्रॉनिक गोष्टींचा वापर केला जातो.

मेसॅचुसेट्स मधील काही कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉक्टरांनी मानवाच्या नाकात छोटे इलेक्ट्रोड घालून मेंदूच्या विशिष्ट (ओलफॅक्टरी बल्ब)  भागातील मज्जातंतूमध्ये विद्युतीय उत्तेजना निर्माण करून गंध संवेदना निर्माण करण्यात यश मिळविले आहे. त्यामुळे भविष्यात भाऊ सारख्या व्यक्तींना (जगात अशी ‘अॅनॉसमिया’ बाधित ३% ते ५% माणसे आहेत असे इंटरनेट सांगते. कोविड मुळे यात भरच पडली आहे ) अशा काही उपकरणाद्वारे गंधानुभवाचे धनी होण्याचे (आणि पर्यायाने गजरा माळण्याचे) स्वप्न पुरे करता येऊ शकेल असा  विश्वास वाटतो. असो.

ही सारे असूनही पाच मानवी संवेदना श्रवण, वास, दृष्टी, चव, स्पर्श, मध्ये अग्र स्थान ‘दृष्टी’ आणि सर्वात शेवटचे स्थान ‘वास’ याला दिले गेले आहे.

साऱ्या जगाला वेठीला धरणाऱ्या कोविड साथीची एक गोष्ट मला अति त्रासदायक वाटते ती म्हणजे यात इन्फेक्शन वाढले तर वास येत नाही. सर्दी, खोकला, ताप आणि वासही नाही म्हणजे काय?  हे म्हणजे ‘चित भी मेरी और पट भी मेरी’ असेच झाले. असो. पण सारे जग आता हळू हळू का होईना करोनाच्या कराल पकडीतून बाहेर पडते आहे आणि आपल्या गंधयात्रेला  ‘पुनश्च हरी ॐ’ म्हणते आहे, ‘सुगन्धिं पुष्टिवर्धनम्’ म्हणते आहे. कारण एकच, तो सर्वशक्तिमान, महामृत्युंजय, महादेव आहे ना आपले साकडे ऐकायला, गंध संवेदनेला अबाधित ठेवायला.

 

 

— राजेश कुलकर्णी

संदर्भ लिंक :

https://en.wikipedia.org/wiki/Digital_scent_technology

https://www.sciencedaily.com/releases/2018/11/181127092549.htmhttps://www.nbcnews.com/mach/science/digital-smell-technology-could-let-us-transmit-odors-online-chats-ncna940121

Contact Rajesh Kulkarni – HSEQ Consultant, Writer (Mob 9969379568 Email: rajkk31@gmail.com)

 

 

राजेश कुलकर्णी
About राजेश कुलकर्णी 5 Articles
मी एक निवृत्त मेकॅनिकल इंजिनीयर आणि सेफ्टी इंजिनीयर असून काही कंपन्यांचा सल्लागार म्हणून कार्यरत आहे. लिखाण, संगीत, लोगो डीजाईन, पेंटिंग वगैरे मध्ये मला रूची आहे. क्वालिटी, आरोग्य, औद्योगिक सुरक्षितता व पर्यावरण या क्षेत्रातील एक जाणकार अभ्यासक, विश्लेषक आणि कंपनी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. (संपर्क भ्रमण ध्वनि – ९९६९३७९५६८)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..