भारतीय महिला बॉक्सिंगपटू मांगते चुंगनेजंग मेरी कोम उर्फ मेरी कोमचा मणिपूरमधील दुर्गम खेड्यात, कांगथेईमध्ये १ मार्च १९८३ रोजी, एका गरीब कुटुंबात जन्म झाला.
मुलांना शिकवण्याइतकीही आई-वडिलांची परिस्थिती नव्हती. बँकॉकच्या आशियाई स्पर्धांमध्ये मणिपुरी बॉक्सर डिंको सिंग यांनी सुवर्णपदक पटकावल्याचे कळताच, मेरी कोमलाही आपण बॉक्सिंगच्या रिंगणात का उतरू नये, असे वाटू लागले. घरचा विरोध असतानाही २००० साली १७ व्या वर्षी मेरी कोमने बॉक्सिंग रिंगमध्ये पहिले पाऊल टाकले. दोन आठवड्यांत ती बॉक्सिंगचं बेसिक शिकलीसुद्धा आणि २००० सालीच मेरी कोमने राज्यस्तरीय स्पधेर्चं जेतेपद मिळवले; वर्तमानपत्रात नाव-फोटो झळकले आणि घरी मेरी कोमच्या यशाची कल्पना आली. पण बॉक्सिंगबद्दल मेरी कोमची ओढ पाहून त्यांचा विरोधही मावळला.
सातव्या ईस्ट इंडिया महिला बॉक्सिंग स्पधेर्त मेरी कोमने सुवर्णपदक पटकावले आणि त्यानंतर पुढच्या पाच वर्षांत सर्व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी बजावली. हिस्सार इथे झालेल्या दुसऱ्या आशियाई महिला बॉक्सिंग स्पर्धेत.आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पहिल्या सुवर्णपदावर मेरी कोमने आपले नाव कोरले. तैवानमध्ये तिनं विजयाची पुनरावृत्ती केली आणि मग तिचा सुरू झाला जागतिक स्पधेर्मधील विजेतेपदांचा सिलसिला सुरू झाला.
अर्थात,अमेरिकेतील पहिल्या जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेत तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले, पण बहुधा त्यातच पुढच्या यशाचे गमक दडले होते. २००३ साली मेरी कोमला अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. २००४ साली नॉवेत, २००५ मध्ये रशियात आणि २००६ला दिल्लीत झालेल्या जागतिक स्पर्धेत तिने अजिंक्यपद पटकावले. तिचा फिटनेस जबरदस्त होता. प्रतिस्पर्ध्याला रिंगमध्ये जास्तीत जास्त पळवून त्याची दमछाक करण्याचे तिचे तंत्र आहे.
दोन मुलांची आई झाल्यानंतरही, २००८ मध्ये तिने चीनमध्ये चौथे जागतिक जेतेपद जिंकले होते. मेरी कोमने महिला जागतिक अव्यावसायिक बॉक्सिंग अजिंक्यपद पाच वेळा जिंकले असून २०१२ लंडन ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली ती एकमेव भारतीय महिला बॉक्सर होती. ह्या स्पर्धेमधील फ्लायवेट प्रकारामध्ये कोमने कांस्यपदक मिळवले. २०१४ इंचॉन आशियाई स्पर्धेमध्ये कोमने सुवर्णपदक मिळवले. २०१३ साली कोमने अनब्रेकेबल नावाचे आत्मचरित्र लिहिले.
२०१४ साली तिच्या जीवनावर आधारित मेरी कोम ह्याच नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने मेरी कोमची भूमिका केली आहे.
भारत सरकार ने पद्मभूषण, अर्जुन पुरस्कार, पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असे अनेक पुरस्कार देऊन मेरी कोमचा गौरव केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
ही व इतर पोस्ट माझ्या फेसबुक पेजवर पाहू शकता.
Leave a Reply