सर्वच अडचणी व प्रश्न एका दमांत सोडविण्याचा प्रयत्न करु नका.
एका वेळी एकच प्रश्न वा अडचणीचे समाधान करा. असे म्हणतात की मानवी जीवन व त्याची दैनंदिनी ही एखाद्या तंबूप्रमाणे (Like a Tent ) असते. मध्यभागी एक उभा खांब आणि सर्व डोलारा निरनिराळ्या दोर्यांनी बांधलेला. दोची ढील वा आवळले जाणे सतत चालते. त्यामुळे तो खांब केव्हांही स्थिर नसतो. मात्र स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. विचारांचे तुफान, परिस्थितीचा मारा, घटनांची वर्दळ ही सारी त्या जीवनतंबूंच्या खांबाचे दोर असतात. ते जीवनाच्या खांबाला अस्थिर वा स्थिर करण्याचा प्रयत्न करतात. मनाच्या ह्या हालचालीच मानसिक तणाव निर्माण करतात. संसारिक प्रश्नांचा तुमच्या जीवनावर पडणारा भडिमार आणि तुम्हाला त्याची करावी लागणारी सोडवणूक, हेच तर तुमच्या जीवनाच्या यशाचे कौशल्य असते. ह्याचे ठोकताळे नाहीत. परंतु एक मार्गदर्शन असते. नेहमी निर्माण झालेल्या प्रश्नांमधून त्वरित एका प्रश्नाची निवड करा. त्याचे उत्तर शोधा. कोणत्या प्रश्नाला प्राधान्य द्यावयाचे, हे ती त्यावेळची परिस्थितीच तुमचे मार्गदर्शन करेल. तुम्ही फक्त मन शांत ठेवून, सारासार विचाराला प्राधान्य देत चला. एका नंतरच दुसरा प्रश्न समोर घ्या. त्याची उकल करा. संभ्रमित होऊ नका. तुमचा आत्मविश्वास, संकल्पना, व धडाडी सारे प्रश्न सुलभ करतील. त्यावेळी तेथे मानसिक तणाव येणार नाही.
एक सुंदर उदाहरण देतो. माझ्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेलो होतो. लग्न समारंभ खूपच चांगला, आनंद व उत्साहाने चालू होता. बराच मित्रपरिवार जमला होता. माझी भेट माझे मित्र श्री एकनाथराव यांच्याशी झाली. गप्पा टप्पा, अभिनंदन झाले. मी सभामंडपांत बसलो होतो. लग्न सोहळा सुरु झाला.
अचानक माझे लक्ष गेले की तेथे एकनाथराव दिसत नव्हते. लग्नाची वेळ आणि मुलीचे वडील कोठे गेले. मी चौकशी केली. मला उत्तर मिळाले नाही. असतील इकडे तिकडे असे मोघम उत्तर मिळत गेले. जशी जशी वेळ जाऊ लागली, मी बेचैन झालो. सारे त्या तगमगीत बघत बसलो. लग्न लागले. अभिनंदन झाले. सर्वांच्या जेवण्याच्या पंगती बसल्या. जेवणे झाली, परंतु एकनाथराव मात्र दिसले नाही. मन शंकाकुशंका करु लागले. लग्नात, वर्हाडी माणसांत काहींतरी बिनसले असेल, हा विचार येऊ लागला. परंतु ना माहिती ना उपाय. शांत बसून मी लग्नसोहळ्यातील कार्यक्रमांना हजेरी देत गेलो. चार तास झाले. श्री एकनाथराव आल्याचे कळले. ते खोलीत बसले होते. मी लगेच त्याना भेटण्यास गेलो.
मजकडे बघून ते किंचीत् हसले. “Any Problem ?” मी त्यांना उत्सुकतेने विचारले. नी शेजारी झोपलेल्या त्यांच्या नातवाकडे बोट दाखविले. च्या पायाचे हाड मोडले होते. Fracture झाले होते. नुकतेच प्लास्टर करुन आणले होते. हा खेळत असताना पडला. त्याचा पाय मोडला.
मुलीचा लग्न समारंभ होता. त्यामध्ये विघ्न निर्माण होऊ लागले होते. एका महत्वाच्या प्रश्नांची ते सोडवणूक करीत होते. प्रासंगीक निर्माण झालेल्या प्रश्नाची तीव्रता ही त्या क्षणी जास्त महत्वाची वाटली. प्रसंग आणि निर्णय हेच जीवनांचे अत्यंत महत्वाचे टप्पे असतात.
तुमच्या यशाचे गमक तुमच्या निजी प्रश्नांची सोडवणूक आणि प्राध्यान्य (Solution and Priority ) यांत असते. योग्य वेळी योग्य विचार हे मानसिक तणावापासून संरक्षण करतात. जेवढे होईल तेवढे दुसर्यास सहकार्य करण्याचा प्रयत्न करुन दुसर्यास सहायक झाल्यास आपण आपली चिंता विसरुन जाल.
स्वभावामध्ये काहीं चांगले गुणधर्म जोपासावे लागतात. ते तुमच्या मनाला आनंदी व समाधानी ठेवण्यास हातभार लावतात. जसे इतरांना सहकार्य करणे. हे प्रासंगिक न बनता, म्हणजे एखाद्या प्रसंगी तुम्ही कुणाची मदत केली असे न होता, मदत करण्याची वृत्ती अंगी बाळगावी. सहाय्य सर्वतोपरी क्षमतेनुसार असावे. तुमची मदत तुमच्या अहंकाराला खतपाणी देणारी न बनता ती तुमच्या समाधान वृत्तीला चेतना देणारी असावी. ह्यासाठी मदत करा व विसरुन जा. वाच्यता नको. ह्यानी तुमची आत्मिक शांतता मात्र सदैव तेवत राहील. कारण हा सहाय्य करणे ईश्वरी गुणधर्म असतो. मानसिक तणाव रहीस हे जगणे असेल.
कित्येक घटनासाठी तुम्ही प्रचंड प्रमाणात प्रयत्न करीत असतात. तुम्हाला यश येत नाही. निराशा मानसिक तणाव निर्माण करते. त्या समस्येकडे बघण्याचा दृष्टीकोन बदला. तुमच साध्य कदाचित् योग्य असू शकेल, परंतु मार्ग चुकीचे निवडले गेले असतील. त्यावर चिंतन करा. सल्ला घ्या. तुमच्या विचारांना गरज वाटल्यास बदला. मीपणा, Ego अहंकार हे विचाराना नेहमी हानीकारक ठरतात. तुमच्यामध्ये विचारांची क्षमता असते. शांत राहून करीत असलेल्या मार्गाना, विचारांना बदला. बदललेला दृष्टीकोन कदाचित् तुमच्या दुःखाचे सुखांत परिवर्तन करु शकेल. ह्यात मानसिक तणाव कमी होइल.
अस म्हणतात की कमळाच्या फुलाभोवती बागडणारा भवरा हा आपल्या आनंदात इतका मग्न होऊन जातो की त्याला रात्र होऊ लागलेली कळत नाही. फुलांच्या पाकळ्या सांजसमयी मिटून जात असतात. भवरा त्यातच अडकून जातो. गुदमरुन प्राण गमवतो. आनंदी वातावरण आणि सभोवताल हे जेव्हां विसरले जाते, जीवनाला ते घातक ठरु शकते. कित्येक चांगली माणसे, थोर समाजसेवक, निस्वार्थी भावनेने इतरांना प्रेम, आनंद, सहकार्य, अशा महान मानवी गुणधर्मांत व्यग्र असतात. सारे सद् हेतूने होत असते. पण मनाला काय चांगल वा काय वाईट. कोणत्याही विचारांचा अतिरेक होऊ लागला की मन तणाव निर्माण करते. आपण देखील अशा थोर व्यक्तींना म्हणतोच प्रकृतीची काळजी घेत चला. धवपळीत व्याधी सुरु होतील. व्याधी ह्या विचारांच्या मार्यामुळे उत्पन्न होत असतात. मग विचार कसेही असोत. स्वभाव अशा विचारांच्या उत्पन्नाला खतपाणी घालत असतात.
एक महान तत्वज्ञान आहे की जी गोष्ट तुम्ही बदलू शकत नाही ती मान्य करा. त्याबद्दल विचार करीत राहून आपला मानसिक तणाव वाढू नका. प्रत्येक घटनावर वेळ हे अप्रतिम श्रेष्ठ औषध असते. प्रचंड दुःखाचे, निराशेचे प्रसंग देखील काळाच्या ओघांत शिथील होऊन विसरले जातात. निसर्गाचे हे वरदान असते. ज्या व्यक्ती ही समज
मनाशी बाळगतात, ते मानसिक तणावापासून बचाव करण्यात यशस्वी होतात. त्यांची समजदार वृत्तीच त्याना सदैव समाधानी ठेवण्यास मदत करते.
कित्येक वेळा आपण काहीं स्वभाव दुर्गुण विनाकारण मनाशी बाळगतो. ती नंतर नैसर्गीक वृत्ती बनते. ज्यांत जरी क्षणिक मानसिक समाधान दिसून आले, तरी ते तुम्हास मानसिक तणावाखाली नेवून ठेवते. तुम्ही ती गोष्ट मुदाम करीत नसतात. पण केवळ वैचारीक ठेवन म्हणून तुम्ही अशा विचारांकडे ओढले जातात. जसे इर्षा, बदला घेण्याची भावना, गैरसमज, तुलनात्मक स्पर्धा करण्याची वृत्ती (Un-healthy Competition) इत्यादी. कित्येकदा हे आपण विनाकारण अंगी बाळगतो. क्षणिक मोठेपणा मिरवण्यासाठी हे कदाचित् होत असेल. ती वेळ निघून जाते, परंतु तुम्हाला अशांत मन करते. तुमच मन खात राहते. तुमचा स्वभाव Guilty Consciousness बनतो. अशा वृत्तीची माणसे सतत निराशेचे एक वलय बाळगुन असतात. असेच मानसिक तणावाला बळी पडतात. वाईट प्रवृत्ती बाळगण्याला कष्ट लागत नसतात. ते सहजतेने होते म्हणून सामान्य त्याकडे झुकतात. चांगले गुणधर्म बाळगणे याला श्रम लागतात. परंतु तेच तुमच्या मनाला शांततेकडे घेऊन जातात. मानसिक तणावरहीत तुमचे जीवन बनते.
जे होत आहे वा होणार आहे- ते चांगल्यासाठीच. महान शक्ती ईश्वरा समोर नतमस्तक, अभिवादन, चिंतन करा.
तुम्ही आस्तिक असाल वा नास्तिक. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक स्वभाव. परंतु एक सत्य सारे जग मान्य करते. ते हे की ह्या जगामधल्या वा विश्वामधल्या सर्व घडामोडी कोणत्या तरी शक्तीमुळे वा उर्जेमुळे होत असतात. त्या शक्तीला मान द्या. मग तो कुणी ईश्र्वर समजून वा निसर्ग संबोधित. कोणत्याही महान शक्तीसमोर तुमचे नतमस्तक, अभिवादन, हे तुमच्या अभिमानी, अहंकारी, मनावर सतत पांघरुण घालेल. तुमच्यात राहिलेला सुक्ष्म अहंकार मानसिक जो असंतुलन निर्माण करतो, त्यावर तुमची सद्सद्- विवेक बुद्धी सतेज ठेवील. तुम्ही चांगले, समजदार, प्रेमळ बनण्यास मदत करेल. सर्वात महत्वाचे म्हणजे मनाच्या चंचलतेवर अंकूश ठेवण्यासाठी हा प्रभावी उपाय असेल. आपल्या सर्व चिंता त्या परमात्म्याच्या चरणी अर्पण करा. दररोज थोडा वेळ ईश्वर चिंतन करा, प्रणायाम करा, योगासने करा, व्यायाम घेत जा, त्यामुळे मानसिक व शारीरिक परिवर्तन होते. तसेच मानसिक तणाव कमी होऊन स्वास्थ्य लाभते.
मानसिक तणाव हा लेख येथे पूर्ण.
धन्यवाद
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail bknagapurkar@gmail.com
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
Leave a Reply