नवीन लेखन...

शिवरायांनी केलेली जगातील सर्वोतम गुंतवणूक

शिवसूत्र – यशस्वी जीवनाचा महामंत्र
ध्येयवेडाने झपाटलेल्या प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून वाचावे असे क्रांतीकारी पुस्तक 

योगेश क्षत्रिय यांच्या ‘शिवसूत्र’ या नव्या-कोऱ्या पुस्तकातील एक प्रकरण.. 

आपण असं शिकायला हवं जणू आपण नेहमीसाठी जगणार आहोत आणि असं जगायला हवं जणू उद्याच मरणार आहोत. विद्येसारखा बंधू नाही. विद्येसारखा मित्र नाही. विद्येसारखे धन नाही, आणि विद्येसारखे सुखही नाही.



एखादा माणूस शेकडो वर्षे लोकांच्या काळजावर अधिराज्य गाजवतो हा योगायोग नसतो. त्यामागे काही सिद्धांत असतात. शिवाजी महाराजांसारखे यशस्वी व्हायचे असेल तर शिवाजी महाराजाचे सिद्धांत समजून घ्यावे लागतील. एका जागतिक कीर्तीचं महान व्यक्तिमत्व कसं घडतं? हे आम्ही समजावून घेतलं पाहिजे. शिवरायांनी शून्यातून निर्माण केलेली वाटचाल त्याचप्रमाणे शून्यातून विश्व कसं उभे केल? हे लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी महाराज पुणे प्रांतात आले. सवंगडी गोळा केले. स्वराज्याची शपथ घेतली आणि स्वराज्य स्थापन झालं, हे सगळं इतकं सहजसोप नक्कीच नव्हतं. शिवाजी महाराजांचं आयुष्य एका स्वप्नाने. एका ध्येयाने प्रेरित होते आणि ध्येयासाठी प्रेरित होऊन माणूस काहीतरी करतात तेव्हा इतिहास घडत असतो. शहाजी राजांनी एक स्वप्नं बघितल होतं की, ‘राजकीय परिस्थितीमुळे मला आदिलशाही, निजामशाही, मुगलशाहीची मनसबदारी करावी लागली, पण माझा मुलगा कोणाचीही चाकरी करणार नाही. तो करेल तर स्वतःचे साम्राज्याच निर्माण करेल. शेकडो वर्ष गुलामीमध्ये पिचलेल्या, दबलेल्या जनतेला स्वतंत्र राज्य बहाल करणाऱ्या या महान स्वप्नाची, या भव्य-दिव्य स्वप्नांची बीज जिजाऊ साहेबांनी शिवबाच्या मनात अगदी बालवयातच रूजवली होती. रामायण आणि महाभारतातील गोष्टी सांगितल्या. ज्याप्रमाणे प्रभुरामचंद्र यांनी दृष्ट अनीतीने वागणाऱ्या रावणाचा वध करून लकेवर विजय मिळवला. भगवान श्रीकृष्णाने पजेचा छळ करणाऱ्या कंसाला ठार मारून प्रजेला त्याच्या जुलूमापासून मुक्त केले. त्याचप्रमाणे ‘शिवबा तुला देखील रयतेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या मोगलांचा सर्वनाश करून गोरगरीब जनतेला ताठ मानेने जगायला प्रेरित करायचे आहे. हा संस्कार जिजाऊ साहेबांनी शिवरायांच्या मनात पेरला. परकियांच्या गुलामीमधून या भूमीला मुक्त करायचे आहे आणि सहादीच्या पठाराची मान इथल्या भूमिपुत्राच्या कर्तृत्वाने उंच करायची आहे. हा ठाम निश्चय शिवाजी महाराजांनी अगदी बालवयातच केला होता.

कुठलीही इमारत उंचच उंच गगनाला भिडलेली दिसते तेव्हा तिचा पाया देखील तितकाच खोल आणि भक्कम असतो, जेव्हा एखादं झाड आकाशाशी स्पर्धा करताना दिसतं तेव्हा त्याची पाळमूळ जमिनीत तितकीच खोल रुजलेली असतात. त्याचप्रमाणे एखादा यशस्वी माणूस त्याच्या क्षेत्रात एका यशाच्या विशिष्ट उंचीवर विराजमान झालेला दिसतो. तेव्हा लक्षात घ्या, त्या क्षेत्रात त्याचा शिक्षणाचा पाया देखील तितकाच खोल आणि मजबूत असतो. हिंदवी स्वराज्याचा असामान्य ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना शिवरायांच्या जीवनात मुख्य पाया कुठला होता तर तो शिक्षणाचा होता. जर आपण शिक्षण घेतले तर जगातील अनेक मार्ग उघडतील आणि शिक्षण नसेल तर आहे ते मार्ग बंद होतील. हे शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व जिजाऊ साहेब आणि शहाजी राजांना जाणून होते. म्हणून एक उत्तम राजा कसा असावा याचे प्रशिक्षण घेण्यासाठी शिवाजी महाराज वय वर्ष सात ते बारा ही पाच वर्षे शहाजी राजांच्या सहवासात कर्नाटक प्रांतातील बंगळूर या शहरात होते. या पाच वर्षांच्या काळात शहाजी राजांच्या तालमीत शिवबाने सर्व प्रकारचे प्रशिक्षण घेतले. वडिलांची नेतृत्व करण्याची क्षमता आणि सत्तेचा वापर जनसामान्यांसाठी कसा करावा याचे धडे गिरवले. शहाजी राजांच्या दरबारात सर्व विषयांत पारंगत साठ ते सत्तर पंडित होते. उत्तम राज्य कारभार कसा करावा? उत्तम व्यवस्थापन कसं असावं? आदर्श युद्धनीती कशी असावी? हे कौशल्य महाराजांनी शहाजीराजांच्या देखरेखीखाली शिकून घेतले. तसेच किल्ले बांधण्याचे अचूक तंत्र, शो चालवणे, विद्या, प्रभावी संवाद कौशल्य, भाषा कौशल्य असे अनेक विषय आणि कौशल्य शिकून घेण्याचे काम शिवाजी महाराजांनी पाच वर्षे केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर बघितला तर शिवाजी आयुष्यभर नवीन शिकतच आले नावीन्यपूर्ण गोष्टीचा ध्यास शिवाजी महाराज नेहमीच घेत असतं. केवळ स्वतः नाही तर आपल्याबरोबर स्वराज्यासाठी खांद्याला खांदा देऊन काम करणाऱ्या सर्वच सहकाऱ्यांना शिवाजी महाराजांनी शस्त्र कसे चालवायचे, युद्धनीती कशी असावी, शत्रूची मानसिकता कशी ओळखावी याचे प्रशिक्षण दिले. म्हणूनच स्वराज्यासाठी काम करणाऱ्या सामान्य माणसांनी देखील असामान्य शौर्य गाजवून स्वराज्याला फार मोठं यश मिळवून दिले याचं कारण म्हणजे योग्य प्रशिक्षण !

शिवरायांचा तेजस्वी इतिहास ओजस्वी बनवण्याचे काम हे पुढे शंभूराजांनी केले. संभाजी राजांना सुद्धा राज्यकारभार विषय, धनुष्यबाण चालवणे, भाला फेकणे, दांडपट्टा चालवणे, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, न्यायव्यवस्था, काव्यअलंकार, शास्रे, पुराण याचे शिक्षण शिवाजी महाराजांनी दिले होते. संभाजीराजे मराठी, हिंदी, इंग्रजी, पाली, संस्कृत, ऊर्दू अशा भाषांचे पंडित होते. वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण ग्रंथ लिहून एका हातात लेखणी आणि दुसऱ्या हातात तलवार घेऊन शस्त्र आणि शास्त्र कसं चालवायचे हे जगाला दाखवून दिले. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित असलेले हेन्री ऑक्सिडेन यांनी जसं डायरीमध्ये शिवरायांच वर्णन केलेले आहे. त्याचप्रमाणे शंभू राजाबद्दल देखील लिहिले आहे तो लिहितो, मी रायगडावर आलो, मी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा बघितला आणि या सोहळ्याच्या वेळी माझी भेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाशी म्हणजे संभाजी राजांशी झाली. त्यावेळी माझ्या  असे लक्षात आले हा संभाजी राजा इथल्या रयतेशी मराठीत बोलतो. उत्तरेतील लोकांशी हिंदी बोलतो. पोर्तुगीजांशी पोर्तुगीजमध्ये बोलतो. आम्हा इंग्रजांशी इंग्रजीमध्ये बोलतो. अरे या शिवाजी महाराजांनी आपल्या मुलाला भाषा शिकवल्या तरी किती? हा प्रश्न त्याला पडला होता. त्याने त्याचे उत्तर आपल्या डायरीत लिहून ठेवले, तो लिहितो संभाजी महाराजांचे चौदा भाषांवर प्रभुत्व होते. पिता कसा असावा याचे उत्तमोत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. बाल शंभू राजेच्या मनात प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम शिवरायांनी केले. शहाजी राजांनी शिवरायांना सर्व शास्त्र, शम्र आणि व्यावहारिक शिक्षण दिले. शिवरायांनी शंभूराजांना घडवले म्हणून शिव शंभू राजांच्या विचारांची मुलं आपल्या घरी घडली पाहिजे असं जर आजच्या पालकांना प्रामाणिकपणे वाटत असेल तर मुलांच्या वेळेची आणि पैशाची गुंतवणूक शिक्षणात, ज्ञानात आणि नवनवीन कौशल्य विकसित करण्यात केली पाहिजे.

आज पालक मुलांसाठी करोडोची संपत्ती कमवायला जीवाचं रान करतात. अनेक पालक आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बँकेत पैशांच्या ठेवी ठेवतात. काही पालक सोन्यामध्ये गुंतवणूक करतात तर काही जमिनीमध्ये गुंतवणूक करतात. एक लक्षात ठेवा. बँकेत केलेली गुंतवणूक कदाचित आपल्याला दामदुप्पट रकमेचा परतावा देईल. सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक कदाचित चारपट परतावा देईल. जमिनीत केलेली गुंतवणूक कदाचित दहापट परतावा देईल. परंतु जगातील सर्वश्रेष्ठ गुंतवणूक कुठली असेल तर ती ज्ञानात केलेली गुंतवणूक आहे. ज्ञानात केलेली गुंतवणूक लाखो पट परतावा दिल्याशिवाय राहणार नाही. तो परतावा तुमच्या मुलांच्या सामाजिक जीवनात मिळेल, तो परतावा आर्थिक जीवनात मिळेल, तो परतावा वैयक्तिक जीवनात मिळेल, सर्वच क्षेत्रांत भरभरून परतावा मिळेल. एक जुन्या संस्कृत श्लोकात सांगितल्याप्रमाणे ज्ञानरूपी धन असे धन आहे जे चोरी करून चोरले जात नाही. राजाकडून हिरावले जात नाही. भावाभावांत वाटले जात नाही. ओझ्याप्रमाणे जड होत नाही आणि खर्च केल्याने वाढतच जाते म्हणून ज्ञानरुपी धन सर्वश्रेष्ठ धन आहे. राजाला फक्त त्याचा राज्यात मान असतो, पण जो ज्ञानी आहे त्याला संपूर्ण जगात मान असतो. आपण कुठल्याही क्षेत्रात असाल. कला, क्रीडा, साहित्य क्षेत्रात. त्यात सर्वोच्च ठिकाणी पोहचायचे असेल तर त्या क्षेत्रातील पूर्ण तर ज्ञान कौशल्य हस्तगत करणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्या क्षेत्रात सर्वोच्च दीर्घकाळ ठिकाणी टिकायचे असेल तर सतत नावीन्यपूर्ण गोष्टीचे शिक्षण घेणे देखील गरजेचे आहे. शिक्षण माणसांच्या क्षमतांना बाहेर काढते. ज्या क्षमतांच्या बळावर तो संपूर्ण विश्व जिंकण्याची धमक ठेवतो. माणसाचे जीवन हे दिव्यासारखे असते. ज्ञान त्या दिव्यातील पेटणाऱ्या वातीसारखे असते. जर माणसाच्या दिव्यासारख्या जीवनात ज्ञानरुपी पेटणारी वात सतत तेवत ठेवली तर मानवी जीवन यशाच्या प्रकाशाने उजाळल्याशिवाय राहणार नाही.

दुःखाची बाब ही आहे. लोकं पन्नास लाखांचे घर बांधतात. घरात वीस वीस हजारांचे चार मोबाईल असतात. भिंतीवर एक लाखाचा एलईडी टीव्ही असतो. पण पन्नास रुपयाचे एक पुस्तक घरात नसते. कारण वडील वाचत नाही, आई वाचत नाही तर मुले कुठून वाचणार? माणसाचे घर एखादी साधी झोपडी असेल पण ज्या घरात पुस्तक आहे ती वाचली जातात. त्या घरात श्रीमंती यायला वेळ लागणार नाही. “शिकाल तर टिकाल’, ‘वाचाल तर वाचाल’ हे ब्रीदवाक्य जीवनाचे अत्यंत महत्त्वाचे सार आहे. एकदा व्यक्ती पाच वर्षाने कुठे असणार हे केवळ दोनच गोष्टींवर अवलंबून असते. एक तो कुठली पुस्तके वाचतो आणि दुसरे तो कुठल्या माणसांच्या सहवासात राहतो. याच्या व्यतिरिक्त माणसाच्या आयुष्यात बदल घडेल अशी जगाच्या पाठीवर दुसरी गोष्ट नाही. ज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी पुस्तक वाचा आणि जगाचा अनुभव घेण्यासाठी चांगल्या माणसांना संगत धरा. हाच खरा शिवविचार आत्मसात करा, आयुष्य उन्नत होऊन जाईल.

शिवाजी महाराजांची राजमुद्रेचा खरा अर्थ समजून घेतला तर आयुष्यच बदलून जाईल.

संपूर्ण शिक्षण घेतल्यानंतर स्वराज्य निर्माण करण्याचे उदात्त स्वप्न उराशी बाळगून प्रत्यक्ष ते स्वप्न साकार करण्यासाठी शिवाजी महाराज हे माँसाहेब जिजाऊंसोबत परत शहाजी राजांची जहागिरी असलेल्या पुणे प्रांतात आले. परत पाठवताना शहाजी राजांनी शिवाजी महाराजांच्या बरोबर सावली सारखी राहतील अशी उच्च विद्याविभूषित पंडित, काही युद्धकुशल सेनानी, विश्वासू आणि अनुभवी माणसं दिली. त्यागाचे प्रतीक असलेला भगवा झेंडा शिवरायांच्या हाती दिला होता. जो भगवा झेंडा प्रभू रामचंद्रांच्या राज्याचा होता. कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या ज्या रथाचे सारथ्य करीत होते त्या रथावर भगवा झेंडा होता. गौतमबुद्ध जे वस्त्र वापरायचे त्याला चिवर असे म्हणतात. जे त्या चिवराचा रंग देखील भगवा होता. भगवा झेंडा हा वारकरी संप्रदायाचा आहे. म्हणजेच भगवा हा रंग त्यागाचं, समतेच प्रतीक आहे. शिवाजी राजांना जे राज्य निर्माण करावयाचे आहे ते स्वातंत्र्य, समता, बंधुता, त्याग या मूलभूत तत्त्वांवर आधारलेले असले असे स्पष्ट संकेतच दिले होते. आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिवाजी महाराजांच्या जवळ दिली ते म्हणजे आयुष्यात काय करायचं आहे ते जीवनाच ध्येय. शिवरायांकडे हे ध्येय लिखित स्वरुपात दिले आहे. हे ध्येय होते शिवाजी महाराजांची राजमुद्रा. काय होती राजमुद्रा?

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णूविश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषां मुद्रा भद्राय राजते

ही मुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याचे प्रतीक आहे. राजमुद्रेच्या या दोन ओळी, सात शब्द, ३२ अक्षर. ज्याला कळाले त्याचं भाग्य लख्ख उजळल्याशिवाय राहणार नाही. हे शब्द जेवढे स्फूर्तीदायक वाटतात तितके विस्मयकारक देखील आहे. शिवचरित्राचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात येते, आतापर्यंत पहिल्यांदा राज्य स्थापन होते आणि नंतर राज्याची राजमुद्रा तयार केली जाते. परंतु जगाच्या पाठीवर शिवरायांचे राज्य असे एकमेवाद्वितीय राज्य आहे जिथे पहिल्यांदा राजमुद्रा तयार करण्यात आली आणि नंतर राज्य निर्माण झाले. या राजमुद्रेवर प्रेम करणारी लाखो करोडो जनता या महाराष्ट्राच्या पराक्रमी मातीत आहे. अनेक लोक असतील जी गाड्यावर अष्टकोनी असलेली राजमुद्रेच प्रतिमा लावतात. राजमुद्रेची बॅनर छापणारे देखील अनेक लोकं आपल्याला मिळतील. राजमुद्रेच्या अंगठ्या घालणारे कितीतरी लोक सहज दिसतील. गळ्यात लॉकेट घालणारेही कितीतरी लोक आपल्याला भेटतील. इतकंच नव्हे राजाची राजमुद्रा हातावर गोंदवून घेणारेही अनेक असतील. परंतु राजमुद्रेतील खरा अर्थ समजून घेणारे लोकं १२ कोटीच्या महाराष्ट्रामध्ये खूप शोधूनही केवळ बोटावर मोजण्याइतकेच सापडतील. मी आपणास अत्यंत महत्वाची एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की, आपल्या राजांची राजमुद्रा आहे राजमुद्रेचा आपल्या सगळ्यांना अभिमान जरूर असावा. परंतु या राजमुद्रेचा खरा अर्थ जर आम्हाला कळाला तर आमच्या राजाला देखील आमचा अभिमान वाटेल. इतकं मोठं यशाचं गुपित सांगणारं तत्त्वज्ञान या राजमुद्रेत दडलेले आहे. म्हणून शिवाजी राजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने राजमुद्रेचा अर्थ समजून घेतला पाहिजे.

राजमुद्रेचा शब्दशः अर्थ घ्यायचा झाला तर ‘प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विश्वाला वंदनीय शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे’ असा होतो. परंतु राजमुद्रेचा व्यापक मतितार्थ नेमका काय आहे? तो व्यापक अर्थ घ्यायचा झाला तर तो असा होतो की, शिवरायांना स्वराज्याची सुरुवात प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे करायची आहे. प्रतिपदेचा चंद्र म्हणजे अमावस्येनंतर दुसऱ्या दिवशी उगवते तो छोटीशी चंद्रकोर. याचा अर्थ असा होतो की स्वराज्य निर्माण करताना शिवरायांकडे असणारे भांडवल खूप कमी असेल. शस्रास कमी असतील, माणसं खूप कमी असेल, शिवरायांकडे असलेली साधन संपत्ती खूप कमी असेल, कदाचित मिळणारा वेळ देखील कमी असेल तरीदेखील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर हे राज्य उभं करायचे आहे. हे राज्य जरी शून्यातून निर्माण करायचे असेल. तरीदेखील जसा प्रतिपदेपासून चंद्र जसा हळूहळू वाढत जातो आणि तो पौर्णिमेला सर्व विश्वाला वंदनीय होतो. त्याप्रमाणेच हे स्वराज्य हळूहळू वाढत जाऊन केवळ महाराष्ट्रात नव्हे, केवळ देशात नव्हे, तर संपूर्ण विश्वात वंदनीय असलं पाहिजे. इतके मोठं स्वप्न शिवरायांच्या या राजमुद्रेमध्ये मुद्रित होतं. राजमुद्रेचा तिसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे, हे राज्य विश्ववंदनीय असेलच पण ते केवळ शिवाजी शहाजी भोसले यांच्या मालकीचे नसेन तर ते मुद्रा भद्राय राजते असेल. राजाने स्वतःच्या सुखोपभोगासाठी मिळवायचे नाही तर स्वतः दुःखाचे चटके सहन करून रयतेच्या डोहीवर सुखाचे छत्र धरण्यासाठी निर्माण करायचे असते. हे राज्य सर्वसामान्य जनतेच राज्य असेल. जनतेच्या हिताचं राज्य असेल. जनतेच्या कल्याणाचं राज्य असेल, खऱ्या अर्थानं लोककल्याणकारी राज्य असेल या राज्यातील प्रत्येक रयतेच्या मनामध्ये हे राज्य माझं स्वतःचं राज्य आहे ही भावना निर्माण होईल, असं राज्य निर्माण करायचे हा स्पष्ट उल्लेख राजमुद्रेत आहे. असा शिवरायांच्या राजमुद्रेचा उदात्त अर्थ होता आणि हेच शिवरायांचा आयुष्याचं सर्वोच्य ध्येय होतं. इतकी उदात्त आणि अर्थपूर्ण राजमुद्रा जगाच्या पाठीवर कुठेही दिसत नाही. शिवचरित्र म्हणजे अथांग सागरासारखे आहे. ज्याप्रमाणे समुद्र सर्वांसाठी सारखाः असतो. काहीजण फक्त पाय ओले करतात. काहीजण त्यातून मासे घेतात. तर काही खोल तळाशी जाऊन त्यातून मोती घेऊन येतात तर त्याच प्रमाणे शिवचर्चा सगळ्यांसाठी सारखेच आहे. ह्या अथांग सागरातून काय घ्यायचे ते आपल्या अवलंबून आहे. जो जो ज्या-ज्या दृष्टिकोनातून शिवाजी महाराजांना बघतो. त्याला तर तसे शिवाजी महाराज समजतात. शिवचरित्रातील केवळ राजमुद्रेच्या तीन गोष्टी लक्षा आल्या तरी तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल त्या क्षेत्रात शिखर वैभवाला जाण्यापासून तुम्हाला कुठलाही सामर्थ्य रोखूच शकत नाही ही ताकद राजमुद्रेत आहे. त्या तीन गोष्ट म्हणजे

१. आपल्या जीवनात एक ठाम ध्येयं असायला हवे.

२. आपल्या जीवनामध्ये असणारे ध्येयं चार लोकांपेक्षा वेगळं हवं.

३. हे ध्येयं जगापेक्षा भव्य दिव्य फार मोठे असायला हवे.

ते कसं असावं हे शिवसूत्र चार, पाच आणि सहा या प्रकरणांत काळजीपूर्व वाचा. नक्कीच उज्ज्वल भविष्याचा प्रशस्त महामार्ग या शिवविचारातून निर्माण होईल ही शंभर टक्के खात्री तुम्हाला देतो.

ज्याच्या आयुष्याला ध्येय आहे त्याच्या जीवनातील प्रत्येक क्षणाला अर्थप्राम होतो. त्याचे पडणारे प्रत्येक पाऊल ध्येयाच्या दिशेने असते. आपला जन्म काहीतरी असामान्य घडवण्यासाठी झाला आहे असं ज्याला वाटत ने आपल्या वैयक्तिक सामाजिक, व्यावसायिक जीवनात भव्य-दिव्य बदल करू शकतात.

– योगेश क्षत्रिय

प्रकाशक : अक्षरबंध प्रकाशन, नाशिक

मूल्य : रु.250/-

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..