मॉरिशसचे माजी राष्ट्रपती व पंतप्रधान अनिरुद्ध जगन्नाथ यांचा जन्म २९ मार्च १९३० रोजी झाला.
तब्बल सहा वेळा पंतप्रधानपद आणि दोन वेळा राष्ट्रपतिपद भूषविलेले जगन्नाथ यांचा, आधुनिक मॉरिशस घडविण्यात मोठा वाटा होता. हिंदी महासागरातील या द्वीपसमूहाचे प्रदीर्घ काळ नेतृत्व करणारे जगन्नाथ यांनी आपल्या कारकीर्दीत भारताबरोबरील संबंध वृद्धिंगत केले. मॉरिशसचे भारताबरोबरील नाते तसे जुने. तेथील उसाच्या मळ्यात मजूर म्हणून काम करण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक भारतीयांना तिथे नेले. त्यात जगन्नाथ यांचे पूर्वज होते. त्यांचे मूळ गाव उत्तर प्रदेशातील अठिलापूर. अनिरुद्ध जगन्नाथ यांचे वडील मॉरिशसला गेले आणि तिथेच स्थायिक झाले. पुढे हेच जगन्नाथ कुटुंबीय मॉरिशसमधील प्रमुख राजकीय कुटुंब ठरले. मॉरिशसमधील शालेय शिक्षणानंतर ते विधी शाखेच्या उच्च शिक्षणासाठी लंडनमध्ये गेले. कायद्याची पदवी घेऊन परतल्यानंतर ते राजकारणात उतरले.
जगन्नाथ यांनी विरोधी पक्षनेता, विकास मंत्री आणि कामगारमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली. १९८२मध्ये दणदणीत विजय मिळवून ते मॉरिशसच्या पंतप्रधानपदी आरूढ झाले. तोपर्यंत गरीब देश मानल्या गेलेल्या मॉरिशसमध्ये त्यांच्या सरकारने आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिवर्तनाचा पाया घातला. औद्योगिकरणाची कास धरून त्यांनी मॉरिशसला विकासाची दिशा दाखविली. त्यांना भारत आणि मॉरिशस यांच्या मैत्रीचे शिल्पकार मानले जाते.
आपली पाळेमुळे असलेल्या भारताशी सहकार्य आणि हिंदी भाषा व साहित्याच्या प्रसारासाठी त्यांना पहिला प्रवासी भारतीय सन्मान मिळाला. दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने त्यांचा ‘पद्मविभूषण’ किताबाने सन्मान केला.
हिंदी ही संयुक्त राष्ट्रांच्या कामकाजातील भाषा व्हावी, यासाठी अटलबिहारी वाजपेयी यांनी हाती घेतलेल्या मोहिमेत जगन्नाथ यांनीही मनापासून साथ दिली. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मॉरिशसमध्ये हिंदी साहित्यिकांची पिढी बहरली.
अनिरुद्ध जगन्नाथ यांनी २०१७ मध्ये मॉरिशसच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे चिरंजीव प्रवीण्ड जगन्नाथ यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
अनिरुद्ध जगन्नाथ यांचे ३ जून २०२१ रोजी निधन झाले.
Leave a Reply